दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
अली फजलची हॉलिवूडवारी…
बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत की, त्यांचा अभिनय कितीही चांगला असला तरी त्यांना फारशी चांगली संधी हिंदी चित्रपटात मिळाली नाही. अशा अभिनेत्यांना ओटीटी माध्यमांनी सहारा दिला. आणि हॉलिवूडमध्येही त्यांना चांगली संधी मिळाली. अशाच अभिनेत्यांमध्ये अली फजलचे(Ali Fazal) नाव येते. थ्री इडियट सारख्या चित्रपटात भूमिका करणा-या अली फजलला हिंदी चित्रपटात हवी तशी संधी मिळाली नाही. मात्र हाच अली फजल मिर्झापूर सारख्या वेबसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांचा आवडता झाला. त्याचा अभिनय बघता त्याला हॉलिवूडमध्येही संधी मिळाली…आता पुन्हा हाच अली फजल(Ali Fazal) चर्चेत आला आहे, तो हॉलिवूडमधील आणखी एका चित्रपटातील भूमिकेसाठी. अफगाण ड्रीमर्स नावाचा हॉलिवूडपटात अली फजल महत्त्वाची भूमिका साकारणार असून अली फजल चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी मोरोक्कोमध्ये रवानाही झाला आहे.
अली फजलच्या या नव्या हॉलिवूड प्रोजेक्टचे नाव अफगाण ड्रीमर्स असे असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दोन वेळा ऑस्कर विजेते दिग्दर्शक बिल गुटेनटाग करत असल्यानं अली फजलला ही मोठी संधी मिळाल्याची चर्चा आहे. आता अली फझलची हिंदी चित्रपटसृष्टीतील ओळख मिर्झापूर या वेब सीरिजच्या माध्यमातून अधिक झाली आहे. या सिरीजमध्ये अली फजलच्या(Ali Fazal) अभिनयाचे अनेक दिग्दज्जांना कौतुक केले आहे. अर्थात, असे असले तरी त्याला बॉलिवूडमध्ये फारशी चांगली संधी मिळाली नाही. पण अली फजलच्या अभिनयाची छाप हॉलिवूडवर पडली आहे. गेल्या वर्षी अली फजलला कंधार या चित्रपटाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. कंधारमध्ये अली जेरार्ड बटलर सोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहे. दरम्यान, अलीला त्यापाठोपाठ दुसराही हॉलिवूडपट मिळाला आहे. अफगाण ड्रीमर्स हा चित्रपटही अलीला मिळालेली मोठी संधी असल्याचे मानण्यात येत आहे.
अफगाण ड्रीमर्सचे शूटिंग सुरू झाले असून या चित्रपटाचे शेड्यूल 50 दिवसांचे असेल. चित्रपटाचे शूटिंग मोरोक्कोमध्ये सुरू झाले आहे. अफगाण ड्रीमर्स चित्रपटाचा बराचसा भाग मोरोक्को व्यतिरिक्त बुडापेस्टमध्ये शूट केला जाणार आहे. अली फजल(Ali Fazal) हा दुसरा हॉलिवूडपट मिळाल्यानं खूश आहे. अफगाण ड्रीमर्स ही कथा उत्कठावर्धक असून दिग्दर्शक बिल गुटेनटाग यांच्यासोबत काम करणं हा मोठा अनुभव असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.अफगान ड्रीमर्स चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. अफगाण तंत्रज्ञान उद्योजक, रोया मेहबूब यांनी 2017 मध्ये सुरू केलेल्या मोहिमेच्या आसपास ही कथा आहे. अफगाणिस्तानमध्ये पुरुषप्रधान समाज असतानाही विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी रोया मेहबूब यांनी तरुणींना मोठी मदत केली होती. त्यांनी जगभरात प्रवास केला आणि स्पर्धांमध्ये भाग घेऊन मीडियाचे लक्ष वेधून घेतले. चित्रपटात रोयाची भूमिका निकोल बुशेरी ही अभिनेत्री साकारणार आहे. निकोल द बोल्ड टाइप या नाटकातील तिच्या अभिनयामुळे प्रसिद्ध झाली आहे.
दिग्दर्शक बिल यांच्या ‘यू डोन्ट हॅव टू डाय’ आणि ‘ट्विन टॉवर्स’ या दोन चित्रपटांनी प्रतिष्ठित अकादमी अवार्ड जिंकले आहे. आता अफगाण ड्रीमर्ससाठी ते घेत असलेली मेहनत बघून हा चित्रपटही आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करु शकतो, असा अंदाज समिक्षक व्यक्त करीत आहेत.असे झाल्यास अली फजलासाठीही ही एक चांगली संधी असेल.
======
हे देखील वाचा : शाहरुख खानने ‘हा’ चित्रपट अजुन पाहिलेला नाही…
======
लखनौमध्ये जन्मलेल्या अली फजलने आपल्या फिल्मी कारकिर्दीची सुरुवात इंग्रजी चित्रपट ‘द अदर अँड द लाइन’ पासून केली. त्यानंतर तो अमेरिकन टेलिव्हिजन मालिका, बॉलीवूड हिरोमध्ये दिसला. अली फजलने 2009 च्या सुपरहीट थ्री इडीयटपासून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले 2011 मध्ये अली ऑलवेज कभी कभी चित्रपटात दिसला. फुक्रे, बात बन गई, बॉबी जासूस, सोनाली केबल, खामोशियां सारख्या चित्रपटात भूमिका केल्या. अमेरिकन चित्रपट फ्युरियस 7 मध्ये त्याच्या अभिनयाचे कौतुक झाले. हा अलीचा पहिला हॉलीवूड चित्रपट होता. फजलनं ब्रिटिश-अमेरिकन चित्रपट व्हिक्टोरिया अँड अब्दुलमध्ये देखील काम केले आहे. राणी व्हिक्टोरिया आणि तिचा विश्वासू भारतीय नोकर अब्दुल करीम यांच्यावर आधारित चित्रपटाचा खास शो व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला होता. एकूण हिंदी चित्रपटात जरी अली फजलला खास संधी मिळाली नाही तरी त्याला हॉलिवूडपटात मात्र चांगल्या भूमिका मिळत आहेत.
सई बने