दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
एका चुंबनाभोवती फिरणारा खुसखुशीत चित्रपट
“आपल्या जोडीदाराला एखादी गोष्ट आपल्याला सांगायची नसताना आपण मुद्दाम त्याबद्दल माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या हाती काहीही लागत नाही.” अगदी या ओळीभोवतीच ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ (Alibaba Aani Chalishitale Chor) या चित्रपटाची कथा फिरते. तसं बघायला गेलं तर आदित्य इंगळे दिग्दर्शित हा चित्रपट जुन्या नाटकावर बेतलेला आहे. तसं हे नाटक येऊन बरीच वर्षं उलटली पण चाळीशीतील लोकांच्या आयुष्यामध्ये तसुभरही फरक पडलेला नसल्याचं ठसवण्यात आणि पटवून देण्यात दिग्दर्शकाला यश मिळालं आहे हे मात्र नक्की. उलट एक पाऊल पुढे जाऊन सध्याच्या शहरी भागातील नातेसंबंधावर, लग्न अन् त्याबरोबर येणाऱ्या जबाबदऱ्या यावर अन् एकूणच वयाच्या चाळीशीनंतर येणाऱ्या मिडलाईफ क्रायसिसबद्दल हा चित्रपट फार प्रगल्भतेने भाष्य करतो, कदाचित यातले काही मुद्दे प्रत्येकाला पटतीलच असं नाही, पण त्यावर विचार करायला मात्र हा चित्रपट भाग पाडतो. खासकरून चाळीशीच्या जवळ आलेल्या लोकांसाठी तर सिनेमा अत्यंत रिलेटेबल वाटतो.
सात मित्र-मैत्रिणींचा एक ग्रुप ज्यात ३ जोडपी अन् एक सिंगल असे सगळे मिळून त्यापैकीच एका मित्राच्या फार्महाऊसवर एका पार्टीनिमित्त भेटतात. धमाल मजा, मस्तीबरोबरच सगळेच थोडी थोडी घेऊन पार्टी एंजॉय करत नाचत असतात. अशातच अचानक फार्म हाऊसवरील लाइट जातात अन् अंधाराचा फायदा घेत कुणीतरी कुणाचेतरी बळजबरी चुंबन घेतल्याचा अन् पाठोपाठ कानाखाली वाजवल्याचा आवाज ऐकू येतो. बास ती पार्टी तिथेच आटोपती घेऊन सगळे आपापल्या घरी निघतात अन् अचानक दुसऱ्या दिवशी सगळ्यांना एका ब्लॉगस्पॉटची लिंक येते अन् त्यावर त्या रात्री नेमके कुणी कुणाचे चुंबन घेतले याचा आठ दिवसांत छडा लावण्यासाठीची एक शोधमोहीमच सुरू होते. आता नेमके कुणी कुणाचे चुंबन घेतले? नेमके या ग्रुपमध्ये आणखी कोणती सीक्रेट्स दडली आहेत? या सगळ्यांना ब्लॉगवर व्यक्त होण्यास कोण भाग पाडतं अन् त्यामागचा नेमका हेतू काय? अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं हा चित्रपट पाहताना उलगडत जातात.(Alibaba Aani Chalishitale Chor)
वरवर जरी ही एक धमाल कॉमेडी कथा वाटत असली तरी या कथानकाच्या माध्यमातून मॉडर्न नातेसंबंध, शहरी भागात राहणाऱ्या लोकांचे लग्नाकडे अन् विवाहबाह्य संबंधाकडे बघायचा दृष्टिकोन, यातून निर्माण होणारे मतभेद, हा प्रकार म्हणजे व्यभिचार की मानवाची गरज अन् मुळात म्हणजे चाळीशीनंतर सगळं काही उपभोगून झाल्यानंतर छोट्या छोट्या आनंदासाठी कित्येक वर्षांची नाती बिघडवणारे आपण अशा वेगवेगळ्या पण गंभीर मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. कथा, पटकथा आणि संवाद यांच्या माध्यमातून विवेक बेळे यांनी हे काम चोख बजावलं आहे. यातले संवाद हे त्या परिस्थितीपुरते जरी तुम्हाला हसवणारे असले तरी त्यातून सध्याच्या मॉडर्न लाईफस्टाईलचे दुष्परिणाम व नवरा बायको या नात्यातील हरवलेलं ग्लॅमर अधोरेखित करणारे आहेत.(Alibaba Aani Chalishitale Chor)
आजवर हिंदीत या विषयावर बरेच वेगळ्या धाटणीचे काही विनोदी तर काही अश्लाघ्य असे चित्रपटही आले आहेत, पण मराठीत अशा गंभीर विषयावर इतक्या सहजतेने अन् मार्मिक कोपरखळ्या मारून टोचन देणारं लिखाण या नजीकच्या काळात झालेलं नाही. यासाठी लेखक विवेक बेळे यांच्याबरोबरच निर्माते नितीन वैद्य, वैशाली लोंढे अन् संदीप देशपांडे यांचेही कौतुक करायलाच हवे. सध्या ज्या प्रकारचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ पैसा कमावत आहेत त्यांच्या गर्दीत एक असा चित्रपट निर्माण करणं अन् तितक्याच ताकदीने त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं हे प्रत्येकालाच जमेलच असं नाही. एकूणच निर्मिती, दिग्दर्शन अन् लेखन या तीनही बाबतीत अत्यंत उत्तम जमून आलेला हा चित्रपट हलका-फुलका तर आहेच पण त्यापलीकडेही तो प्रेक्षकांना बरंच काही देऊन जाणारा ठरतो.(Alibaba Aani Chalishitale Chor)
प्रवीण जहागीरदार यांचं संकलनही (एडिटिंग) उत्तम झालं आहे, चित्रपटाची लांबी पाहता कोणताही फाफटपसारा न दाखवता चित्रपट थेट मुद्द्याला हात घालतो अन् त्याला जे दाखवायचं आहे तेच तो लोकांपुढे मांडतो, काही ठिकाणी आपणही थोडेसे गोंधळून जातो की नेमकं कोणाचं कोणाबरोबर अफेअर आहे, पण ती गोष्ट तशी दुर्लक्षित केली जाऊ शकते. अजित परब आणि अॅग्नेल रोमन यांचं पार्श्वसंगीतही चित्रपटाच्या कथेला अत्यंत साजेसं अन् प्रसंगातील गांभीर्य अधोरेखित करणारंच आहे. अशा चित्रपटात गाणी, संगीत यांना फारसा वाव नसला तरी या संगीतकारांनी व वैभव जोशीसारख्या जाणकार गीतकाराने दोन मोजक्या गाण्यांच्या माध्यमातून नेमकं चित्रपटाचं सार मांडायचा उत्तम प्रयत्न केला आहे.(Alibaba Aani Chalishitale Chor)
अभिनयाच्या बाबतीत तर प्रत्येकानेच चौकार आणि षटकार मारले आहेत. प्रत्येक कलाकाराच्या वाट्याला आलेली भूमिका त्याने चोख बजावली आहे. मुक्ता बर्वेने साकारलेली सुमित्रा, सुबोध भावेने साकारलेला पराग, आनंद इंगळेने साकारलेला वरुण, उमेश कामतने साकारलेला अभिषेक, मधुरा वेलणकरने साकारलेली शलाका, श्रुती मराठेने साकारलेली अदिती अन् अतुल परचुरेचा डॉक्टर सगळ्यांनी लाजवाब कामं केली आहेत. यातील प्रत्येक कलाकार हा चाळीशी ओलंडलेला तरी आहे किंवा चाळीशीच्या जवळपास आलेला आहे त्यामुळेच कदाचित त्या भूमिकांमध्ये त्यांची निवड अन् त्यांनी केलेलं काम हे अभिनय वाटतच नाही इतका त्यांच्या पडद्यावरचा वावर सहज आणि थक्क करणारा आहे. अशाप्रकारच्या कथानकांमध्ये कथा आणि अभिनय या दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी असतात अन् या दोन्हीची उत्तम भट्टी जमून आल्याने एक भन्नाट चित्रपट प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.(Alibaba Aani Chalishitale Chor)
==========
हे देखील वाचा : ‘मी अनेकदा स्वतला…’ अजिंक्य राऊतचा खुलासा
===========
खासकरून मुक्ता बर्वेने साकारलेली सुमित्रा, श्रुतीची अदिती अन् अतुल परचुरेने साकारलेला डॉक्टर ही पात्र मनात घर करून बसतील. एका सीनमध्ये मुक्ता तिच्या मुलाला फोन लावते अन् त्याला दोन वाक्यात आपण एकटे पडलो आहोत ते सांगते त्यामध्ये मुक्ताच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून आपणही गहिवरून जातो, सुबोधने साकारलेला पराग जेव्हा अदितीचा सगळ्यांसमोर अपमान करतो त्यानंतर पूर्णपणे अस्वस्थ झालेल्या अदितीची भूमिका श्रुतीने अगदी लाजवाब वठवली आहे. मधुरा वेलणकरने साकारलेल्या शलाकाचा कधीकधी आपल्याला रागही येतो तर कधी तीच योग्य वागतीये असं जाणवतं. अतुल परचुरे हा कसला ताकदीचा नट आहे हे यातील त्याची भूमिका पाहून स्पष्ट होते, अतुल परचुरेला आणखी अशा भूमिका मिळायला हव्यात. बाकी चित्रपटात उमेश कामतचा आणखी उत्तमरित्या वापर करता आला असता, या सगळ्यांच्या मानाने त्याचे पात्र हे थोडे फिके वाटले इतकंच. बाकी सध्या बॉक्स ऑफिसववरील ॲक्शनपट, बायोपिक आणि प्रोपगंडा चित्रपटांच्या गर्दीत ज्यांना खरंच मनमुराद हसायचंय पण त्याबरोबरच काहीतरी घेऊन घरी जायचंय त्यांनी ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर'(Alibaba Aani Chalishitale Chor) हा चित्रपट अवश्य चित्रपटगृहात पहावा.
बायलाईन : अखिलेश विवेक नेरलेकरचित्रपट : अलिबाबा आणि चाळीशीतले चोर
कलाकार : सुबोध भावे, मुक्ता बर्वे, आनंद इंगळे, मधुरा वेलणकर, उमेश कामत, अतुल परचुरे, श्रुती मराठे
निर्माते : नितीन वैद्य, वैशाली लोंढे, संदीप देशपांडे
लेखन : विवेक बेळे
दिग्दर्शन : आदित्य इंगळे
गीत : वैभव जोशी
संगीत : अजित परब, ॲग्नेल रोमन
संकलन : प्रवीण जहागीरदार
रेटिंग : ३.५ स्टार
अखिलेश नेरलेकर