अलका याज्ञिकला पहिले फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले!
गायिका अलका याज्ञिक (alka yagnik) यांना पहिले फिल्मफेअर मिळवून देणारे गीत आणि त्या गाण्याच्या मेकिंगचा किस्सा जबरदस्त आहे. गंमत म्हणजे हे गीत गायला अलका त्या दिवशी तयारच नव्हती कारण तिला त्या दिवशी टॉन्सिल्सचा खूप त्रास होत होता. घसा खूप दुखत होता अशा कठीण परिस्थितीत तिने ते गाणे गायले आणि ते तिचे सिग्नेचर सॉंग बनले. आज चाळीस वर्षानंतर देखील या गाण्याची क्रेझ कायम आहे. कोणते होते ते गाणे? आणि काय होता तो किस्सा?
गायिका अलका याज्ञिक (alka yagnik) यांचा जन्म २० मार्च १९६६ ला कलकत्ता येथे एका गुजराती परिवारात झाला. तिची आई शोभा याज्ञिक यादेखील गायिका होत्या. त्यामुळे घरातच गाण्याचं बाळकडू त्यांना मिळालं होतं. वयाच्या सहाव्या वर्षापासून कलकत्ता रेडिओवर त्यांनी गायला सुरुवात केली होती. त्यांचे एक फॅमिली फ्रेंड होते अनिल देसाई. जे कलकत्त्यामध्ये आर के फिल्मचे डिस्ट्रीब्यूटर होते. एकदा अलकाला घेऊन ते अनिल देसाई यांच्याकडे गेले होते. तेव्हा अलकाने त्यांना एक गाणे गाऊन दाखवले. देसाई यांना तिचा आवाज खूपच आवडला आणि ते म्हणाले हिच्या आवाजाचे खरे चीज व्हायचे असेल तर तुम्हाला मुंबईला जायला लागेल.
त्यांनी लगेच एक चिठ्ठी राज कपूर यांच्यासाठी लिहून दिली आणि मुंबईला त्यांना भेटायला सांगितले. अलका (alka yagnik) त्यांच्या कुटुंबीयांसमवेत मुंबईला राज कपूर यांना भेटली. राज कपूर यांना देखील तिचा आवाज आवडला. राज कपूर यांनी तिला संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याकडे पाठवले. एलपींना देखील तिचा आवाज आवडला त्यांनी दोन पर्याय दिले. पहिला पर्याय तिने डबिंग आर्टिस्ट म्हणून काम सुरू करावे किंवा आणखी काही दिवस थांबावे आवाज थोडासा मॅच्युअर्ड होऊ द्यावा आणि नंतरच पार्श्वगायनाला सुरुवात करावी. अलकाच्या कुटुंबीयांनी दुसरा पर्याय स्वीकारला आणि काही वर्षानंतर या क्षेत्रात यायचा निर्णय घेतला.
राजश्री प्रोडक्शनच्या पायल की झंकार (१९८०) या चित्रपटात पहिल्यांदा अलकाने पहिल्यांदा पार्श्वगायन केले (संगीत-राजकमल) त्यानंतर प्रकाश मेहरा यांच्या ‘लावारिस’ या चित्रपटातील ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है’ या गाण्याने त्यांना खरी लोकप्रियता मिळाली. नंतर हळू हळू सर्वच संगीतकारांकडे अलका याज्ञिक हिने भरपूर गाणे गायले. आता येऊ मूळ किस्स्याकडे.
१९८७ साली दिग्दर्शक एन चंद्रा माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांना घेऊन ‘तेजाब’ हा चित्रपट बनवत होते. या चित्रपटातील एक गाणे अलका याज्ञिक (alka yagnik) यांच्याकडून एलपी यांना गाऊन घ्यायचे होते. हे गाणे जावेद अख्तर यांनी लिहिले होते. गाण्याचे बोल होते एक दोन तीन… या गाण्याच्या भरपूर रिहर्सल झाल्या. पण ज्या दिवशी रेकॉर्डिंग करायचे होते त्या दिवशी अलकाची तब्येत बरी नव्हती. त्या दिवशी तिला टॉन्सिल्सचा खूप त्रास होत होता. गाताना, बोलताना तिला खूप त्रास होत होता.
त्यामुळे तिने एल पी याना यांना सांगितले की, ”दादा आज रेकॉर्डिंग नको. मी गाऊच शकणार नाही. माझा घसा खूप दुखतो आहे.” त्यावर लक्ष्मीकांत म्हणाले, ”आपल्याला असं करून चालणार नाही. एक तर आज रात्रीपासूनच म्युझिशियनसचा बेमुदत संप सुरू होत आहे आणि उद्यापासून शूटिंग शेड्युल आहे. आपण गाणे आजच रेकॉर्ड करू. जर तुला खराब वाटले तर आपण नंतर डबिंग करू. आता फक्त शूटिंग पुरते गाणे रेकॉर्ड करूत.” नाही हो करत करत अलका (alka yagnik) गायला तयार झाली. मेहबूब स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग होते. तब्बल पन्नास कोरस सिंगर्स तिच्यासोबत होते. अलका याज्ञिकवर खूप दडपण आले होते. पण लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी तिला, ”तू बिनधास्त गा.” असे सांगितले आणि अलकाने डोळे मिटून परमेश्वराची आराधना केली आणि गायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य एका टेक मध्ये ते लांबलचक गाणे पूर्णतः व्यवस्थित रेकॉर्ड झाले!
=========
हे देखील वाचा : देखा है पहली बार साजन कि आंखो प्यार…..
=========
रेकॉर्डिंग नंतर सर्वांनी ते गाणे ऐकले सर्वांना खूप आवडले. परंतु अलकाला वाटले की हे गाणे तितकेसे चांगले झाले नाही आपण पुन्हा डबिंग करूयात. त्यावर लक्ष्मीकांत म्हणाले, ”अजिबात नाही. गाणे चांगले झाले आहे.” त्यावर अलका म्हणाली, ”दादा माझा गळा आज खराब होता.” त्यावर लक्ष्मीकांत प्यारेलाल म्हणाले, ”जर तसं असेल तर अशा खराब गळयानेच तू सर्व गाणे गात जा! कारण मला जो इफेक्ट या गाण्यांमध्ये हवा होता तो परफेक्ट या गाण्यात उतरला आहे. त्यामुळे नो फरदर रेकॉर्डिंग. दिस इज फायनल.“
नंतर हे गाणे माधुरी दीक्षितवर चित्रीत करण्यात आले. तब्बल १७ दिवस सरोज खान यांच्यासोबत तिने या गाण्याच्यासाठी डान्स प्रॅक्टिस केली होती. माधुरी तशी कथ्थक शिकलेली होती. पण इथे इंडो वेस्टर्न डान्स होता. माधुरी आणि अलका या दोघींसाठी हे गाणं म्हणजे यशाची दारं उघडणारी होती. कारण दोघींच्याही आयुष्यातील हे पहिले सुपरहिट सॉंग होते. ‘तेजाब’ या चित्रपटाच्या सुरुवातीलाचे गाणे येतं आणि या गाण्यापासूनच हा सिनेमा प्रेक्षकांची पकड घेतो. या गाण्यासाठी अलका याज्ञिक (alka yagnik) हिला त्यावर्षीचे फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट गायिकेचे अवार्ड मिळाले!