मर्मबंधातली ठेव ही!
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘स्वामिनी’ या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा आपल्या लक्षात राहणारी आहे. या मालिकेतून तर अनेक कलाकारांनी आपल्या मालिकेतील करिअरची सुरुवात केली आहे. या मालिकेत ‘पार्वतीबाई’ ही भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे उमा पेंढारकर. तिचे वडील प्रसिद्ध चित्रकार आणि आई शिक्षिका. लहानपणापासून घरात अर्थातच अभ्यासाला महत्व देणारे वातावरण होते. एस एन डी टी महाविद्यालयातून तिने समुपदेशन या विषयात एम ए देखील केले आहे. उमाने शुभदा दादरकर यांच्याकडे नाट्यसंगीताचा डिप्लोमा केला आणि त्यात तिने सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला. ती कत्थक विशारद देखील आहे. कत्थकचे प्रशिक्षण तिने ज्योती शीधये यांच्याकडुन घेतले आहे. तसेच पंडित मधुकर जोशी यांच्याकडून तिने गायनाचे प्रशिक्षण घेतले आहे. सुप्रसिद्ध गायक अभिनेते ज्ञानेश पेंढारकर यांची ती सून. म्हणजेच ललितकलादर्शचे संस्थापक असणारे ज्येष्ठ गायक अभिनेते भालचंद्र पेंढारकर हे तिचे आजे सासरे. उमाचा नवरा ऋषिकेश हा आर्किटेक्ट असून सध्या परदेशात पुढील शिक्षण घेत आहे. अशा कलाप्रेमी सासरी सुद्धा अर्थातच तिच्या कलेला प्रोत्साहन, पाठिंबा मिळतोच.
उमाच्या जीवनातील पहिला टर्निंग पॉईंट आला तो जेव्हा तिला सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी ‘संगीत संशयकल्लोळ’ नाटकातील ‘रेवती’ च्या भूमिकेसाठी विचारले तेव्हा! उमाने विचारले की अश्विनशेट ची भूमिका कोण करणार आहे? तेव्हा तिला आणखी एक सुखद धक्का बसला. सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे अश्विनशेठ साकारणार होते. अभिनय आणि गायन अशा तिच्या दोन्ही कलांना या नाटकातून उत्तम संधी मिळाली. संगीत संशयकल्लोळ या नाटकाला शंभर वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आले होते. लंडन येथील बी एम एम साठी सुद्धा हे नाटक सादर झाले. या नाटकाकरिता उमा सर्वोत्कृष्ट गायिका अभिनेत्री च्या राज्य पुरस्काराची मानकरी ठरली.
‘स्वामिनी’ च्या मालिकेतील पार्वतीबाई या भूमिकेबद्दल बोलताना ती म्हणते, “मी पार्वतीबाई या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती, या ऑडिशनचे मला दिग्दर्शक विरेंद्र प्रधान यांच्याकडून कळले. मग लूक टेस्ट झाली. जेव्हा मला कळले की माझी या भूमिकेसाठी निवड झाली आहे, तेव्हा आनंद तर झालाच, पण टेन्शनही आलंच. दिग्दर्शक विरेंद्र प्रधान यांच्या मनात जसा ‘पार्वतीबाई’ या भूमिकेचा आलेख होता ,तो मी समजून घेतला. मी ‘शिकस्त’ ही कादंबरी वाचली. या भूमिकेसाठी विरेंद्र प्रधान ,कल्पेश कुंभार यांचे मला कायम मार्गदर्शन लाभते. तसेच कलर्स वाहिनी आणि निर्माते विरेंद्र प्रधान, आरव जिंदाल यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्यासाठी मी त्यांची आभारी आहे. ही भूमिका साकारताना मी आधी पेशव्यांची वंशावळ लिहून काढली. म्हणजे त्यातील नेमकी नाती लक्षात आली. शिवाय वाचनाची आवड असल्याने या गोष्टी सोप्या झाल्या. पण कॅमेरा माध्यमाला मी प्रथमच सामोरी जात होते. ते तंत्र शिकून घेणे गरजेचे होते.”
आणखी एक गोष्ट ही भूमिका करताना उमा साठी महत्वाची होती, की आपण पेशव्यांच्या घराण्यातील सुनेचे काम करत आहोत, म्हणजे सेटवर बोलताना सुद्धा इंग्लिश शब्द येऊ द्यायचे नाहीत, हे लक्षात ठेवायचे होते. शिवाय नऊवारी नेसून पूर्ण वेळ वावरणे,दागिने परिधान करून वावरणे आणि खोपा घातलेला असल्याने पूर्ण वेळ अशा गेट अप मध्ये वावरणे हे सुद्धा आव्हान
होतेच. ही सर्व आव्हाने पेलत उमाने साकारलेल्या पार्वतीबाईंच्या भूमिकेला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. ‘स्वामिनी’ मालिकेची निर्मिती पिकोलो फिल्म्स आणि युफोरिया प्रॉडक्शन्स यांची आहे.