मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
सर्व चित्रपट निर्मात्यांनी सार्दुल क्वात्रांच्यावर टाकला बहिष्कार..
खुदा का नेक बंदा म्हणून ज्यांचा सिनेमाच्या विश्वात आजही उल्लेख होतो त्या मोहम्मद रफी यांची जन्मशताब्दी काल २४ डिसेंबर पासून सुरु झाली आहे. त्या निमित्ताने एक वेगळा किस्सा ! अतिशय नेक दिल, सर्वांशी प्रेमाने वागणारा, कुठेही व्यावहारिक दृष्टिकोन न ठेवता प्रत्येकाला मदत करणारा, अशी त्यांची प्रतिमा होती. ते गायक म्हणून जितके श्रेष्ठ होते त्याहून अधिक ते एक व्यक्ती म्हणून श्रेष्ठ होते. मोहम्मद रफी अनेक छोट्या संगीतकाराकडे अक्षरशः नाममात्र पैसे घेऊन तर कधी कधी तर अक्षरशः एक पैसाही न घेता ते गाणे गात होते. पैसा हा त्यांच्यासाठी कधीच महत्त्वाचा नव्हता. (Sardul Kwatra)
संगीत हे त्यांच्यासाठी इबादत होते. माणुसकी, आत्मियता, प्रेम, आपुलकी आणि दुसऱ्याविषयी वाटणारा सन्मान हे मोहम्मद रफी यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू होते. पण अशा देवदूताला देखील एका संगीतकाराने प्रचंड त्रास दिला होता. अक्षरशः मोहम्मद रफी यांना पोलीस आणि कोर्ट कचेरीचे चक्कर काटावे लागले होते. स्वतःचा काहीही दोष नसताना रफींच्या वाट्याला हा त्रास आला होता. कोण होता हा संगीतकार ? काय होत हा किस्सा ?
पन्नासच्या दशकामध्ये मोहम्मद रफी यांनी मुंबईला जागा घेऊन एक चांगला बंगला बांधला होता. या बंगल्याच्या वर त्यांनी दोन-तीन खोल्या देखील बांधल्या होत्या. पुढे चालून आपल्या मुलाचे लग्न झाल्यानंतर त्याला त्याचा उपयोग होईल म्हणून त्या खोल्या बांधल्या होत्या. याच काळामध्ये पंजाब मधून एक संगीतकार हिंदी सिनेमांमध्ये आले होते. या संगीतकाराचे नाव होतं सार्दुल कात्रा. त्यांनी पंजाबी चित्रपटांना संगीत देऊन सिनेमे यशस्वी करून दाखवले होते. मुंबईत आल्यानंतर त्यांनी काही चित्रपटांना संगीत दिले.(Sardul Kwatra)
पन्नासच्या दशकात सार्दुल क्वात्रा यांनी ‘क्वात्रा प्रोडक्शन’ या फिल्म कंपनीकडून काही चित्रपट देखील निर्माण केले. सुरुवातीला काही काळ ते संगीतकार हंसराज बहल यांचे असिस्टंट होते. जगजीत कौर आणि आशा भोसले सुरुवातीला त्यांच्या चित्रपटातून गात होत्या. नंतर रफी त्यांच्याकडे गाऊ लागले. लता मंगेशकर यांनी देखील त्यांच्याकडे काही चित्रपटात गाणी गायली.
एकदा रेकॉर्डिंग झाल्यानंतर मोहम्मद रफी यांना सार्दुल क्वात्रा म्हणाले,” सध्या माझी मुंबईत राहायची व्यवस्था नाही. मी ऐकले आहे की, तुमच्या बंगल्यावरच्या दोन खोल्या रिकाम्या आहेत. जर तुम्ही मला त्या भाड्याने राहायला दिल्या तर माझ्यावर आणि माझ्या कुटुंबीयांवर अनंत उपकार होतील. तुम्ही ज्या क्षणी मला सांगाल त्या क्षणी मी त्या खोल्या रिकाम्या करून तुम्हाला देईल. परंतु आज मला या मुंबई नगरीत विसाव्याच्या ठिकाण द्या.” रफी दर्यादिल इंसान होते. त्यांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि क्वात्रा राहायला आले. काही वर्षानंतर रफी यांना त्या रूम्स हव्या होत्या म्हणून त्यांनी सार्दुल क्वात्रा यांना तसेच सांगितले. (Sardul Kwatra)
परंतु सार्दुल क्वात्रा यांनी आता घर खाली करायला नकार दिला आणि ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ त्या न्यायाने पोलीसा मध्ये तक्रार दिली की ‘ रफी आणि त्यांचे कुटुंबीय माझ्यावर अन्याय करत आहेत. घर खाली करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकत आहेत. मला रोज शिव्या देत आहेत!’ रफीने किंवा त्यांच्या कुटुंबीयाने यातला कुठल्याही प्रकार केला नव्हता. परंतु सार्दुल क्वात्रा ने तसा कांगावा केला. पुढे वर्ष दीड वर्ष हे भांडण चालू राहिलं.
=========
हे देखील वाचा : ‘जाने भी दो यारो’ हा चित्रपट बनवताना दिग्दर्शक वैतागला ?
=========
शेवटी रफी सार्दुल क्वात्रा यांच्या विरुद्ध कोर्टात गेले. पोलीस, कोर्ट कचेरी हे शब्द रफी पासून कोसो दूर होते. परंतु सार्दुल क्वात्रा ने त्यांना तिथे जायला भाग पाडलं. रफीची चित्रपटसृष्टीतील इमेज खूप चांगली होती. सार्दुल क्वात्रा (Sardul Kwatra) च्या या वर्तनाची बातमी सिने इंडस्ट्रीत पोहोचायला वेळ लागला नाही, सर्व चित्रपट निर्मात्यांनी सार्दुल क्वात्रा यांच्यावर अक्षरशः बहिष्कार टाकला. त्यांना कुठलेही काम मिळत नव्हते. शेवटी मजबूर होवून त्याना घर सोडायला लागले आणि रफीच्या डोक्याची कटकट गेली. सार्दुल क्वात्रा तिथून पंजाब मध्ये गेले. तिथे देखील त्यांना काम मिळेना . शेवटी मुलाकडे अमेरिकेत गेले आणि वयाच्या ७७ वर्षी २००५ साली त्यांचे अमेरिकेतच निधन झाले. गुजराती लेखक रजनीश पांड्या यांनी त्यांच्या ‘आपकी परछाईया’ पुस्तकात सार्दुल क्वात्रा यांचा हा प्रताप विस्ताराने लिहिला आहे.