Kiran Mane किरण मानेंची क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीदिनी खास पोस्ट
Amit Kumar : ‘ही’ गाणी अमित कुमारकडून कुमार सानूकडे कशी गेली?
संगीतकार राहुल देव बर्मन (R. D. Burman) यांना आपल्यातून जाऊन आता जवळपास तीस-पस्तीस वर्षे झाली असली तरी त्यांच्या संगीताची आणि त्यांनी त्यांच्या संगीतात केलेल्या प्रयोगांची चर्चा आज देखील समाज माध्यमावर होत असते. एकाच वेळी विशुध्द भारतीय संगीत आणि त्याच वेळी पाश्चात्य संगीत यांचा सुरीला मेळ राहुल देव बर्मन यांच्या संगीतात आपल्याला दिसून येतो. एकीकडे ‘चिंगारी कोई भडके…’ सारखं गाणं असतं तर दुसरीकडे ‘दम मारो दम…’ सारखं पाश्चात्य रिदमच गाणं असतं. (Amit Kumar)
एकीकडे ‘तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही… ’सारखं अभिजात गाणं असतं तर दुसरीकडे ‘प्यार मे दिल पे मार दे गोली ले ले मेरी जान’ सारखं फडकतं गाणं असतं. थोडक्यात राहुल देव बर्मन यांच्या संगीताने सर्व वयोगटातील रसिकांना सारखाच आणि तितकाच भरभरून आनंद दिला. भारतीय चित्रपट संगीतामध्ये ऐंशीच्या दशकात संगीताची लय बिघडली होती. या काळात राहुल देव बर्मन यांच्या चित्रपटांना देखील फारसे यश मिळत नव्हतं. तरी ज्या ज्या वेळेला त्यांना चांगले चित्रपट चांगले बॅनर मिळाले त्यावेळेला त्यांनी आपल्या संगीताची जादू दाखवलीच. ऐंशीच्या दशकामध्ये मासूम, सागर, जीवा, लिबास, नमकीन, बेताब, रॉकी, इजाजत या चित्रपटातील त्यांची गाणी आज देखील रसिकांच्या स्मरणात आहे. (Amit Kumar)
पण एकूणच या दशकात चित्रपट संगीताने पातळी दर्जाच्या दृष्टीने खाली गेली होती हे नक्की. त्यामुळे राहुल देव बर्मन देखील वैतागले होते. पार्श्वगायक किशोर कुमार देखील या काळात भयंकर अस्वस्थ होते. ते म्हणायचे, “हे सगळं सोडून मी आता खंडव्याला जाऊन आराम करतो!” १३ ऑक्टोबर १९८७ या दिवशी Kishore Kumar यांचे हृदयविकाराने निधन झाले आणि राहुल देव तथा पंचम एकटे पडले. त्यांचा संगीतातील इंटरेस्ट संपला होता. तरीही या काळात त्यांनी अनेक चित्रपटात संगीत दिले. पण तरी त्यांच्या चित्रपटांना पाहिजे तेवढ यश मिळत नव्हतं. त्यांची गाणी देखील पूर्वी इतकी लोकप्रिय होत नव्हती.
या काळात पंचमचे हक्काचे जे निर्माते दिग्दर्शक होते त्यांनी देखील पंचमची साथ सोडली होती. नासिर हुसेन साठ, सत्तर आणि ऐंशीच्या दशकात कायम पंचम यांचं संगीत घेत असत. पण १९८८ साली आलेल्या ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटात त्यांनी म्हणून गीतकार मजरूह सुलतानपूरी यांना घेतलं संगीत मात्र आनंद मिलिंद यांना दिलं. पंचम यांना कुठेतरी हा मोठा धक्का होता. (Amit Kumar)
याच काळात त्यांना विधू विनोद चोप्रा यांचा ‘परिंदा’ (१९८९) हा चित्रपट मिळाला. या चित्रपटातील ‘तुमसे मिलके ऐसा लगा तुमसे मिलके…’ हे आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेले गाणं पुन्हा एकदा पंचमच्या जुन्या परंपरेला साजेसे होतं आणि त्या गाण्याला चांगले यश मिळालं. विधू विनोद चोप्रा यांनी पंचम यांना ‘परिंदा’ नंतरचा त्यांचा महत्त्वकांक्षी चित्रपट ‘१९४२: अ लव्ह स्टोरी’ हा चित्रपट संगीत बद्ध करण्यासाठी दिला.
पंचमने या मूव्हीला संगीत देताना सिनेमाचा कालखंड लक्षात घेऊन फार सुंदर संगीत दिले. या चित्रपटातील सर्वच गाणी प्रचंड लोकप्रियता ठरली. खरंतर या चित्रपटातील सर्व गाणी राहुल देव बर्मन अमित कुमार (Amit Kumar) यांच्याकडून गाऊन घेणार होते. याचं कारण असं होतं की या चित्रपटातील ‘रूठ न जाना तुमसे कहो तो…’ या गाण्याचे ओरिजिनल बंगाली व्हर्जन अमित कुमार आणि सपना मुखर्जी यांनी गायलेले होते. हा चित्रपट प. बंगालमध्ये १९९० साली प्रदर्शित झाला होता आणि प्रचंड यशस्वी झाला होता.
प्रभात रॉय दिग्दर्शित ’शेत पाथोरेर थाला’ या बंगाली भाषेतील चित्रपटाला पंचम यांचे संगीत होते. या सिनेमातील एका गाण्याच्या ट्यूनवर त्यांनी ‘रूठ न जाना तुम से कहो तो…’ हे गाणं बनवलं होतं. खरं तर या चित्रपटातील सर्वच गाणी अमित कुमार (Amit Kumar) यांनी गावी अशी पंचमची इच्छा होती. त्यांनी त्या पद्धतीनेच गाण्याची सुरवात केली होती.
==============
हे देखील वाचा : H. S. Rawail : ‘या’ चित्रपटाचे गीतकार आनंद बक्षी कसे झाले?
==============
पण त्या काळात कुमार सानू यांच्या आवाजाला प्रचंड डिमांड आले होते. साजन, सडक, दिल है की मानता नही हिट झाल्यानंतर त्यांच्या स्वराला देशभरातून मान्यता मिळाली होती. त्यामुळे विधू विनोद चोपडा यांनी कुमार सानू यांच्या नावाचा आग्रह धरला आणि कुठेतरी पंचमवर देखील दबाव होताच. त्यामुळे त्यांनी १९४२ : अ लव्ह स्टोरीची ही गाणी कुमार सानू यांच्याकडून गावून घेतली. कुमार सानूने चांगलीच गायली पण मला नक्की वाटतं की अमित कुमार या सर्व गाण्यांसाठी अगदी योग्य गायक कलाकार होता. कुमार सानू यांचं करिअर या गाण्यापासून अगदी उंचावर गेलं पण दुर्दैवाने अमित कुमार (Amit Kumar) यांच्या करिअरचा ग्राफ मात्र खाली खाली येऊ लागला!