‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
अमिताभ अक्षरश: रडकुंडीला आला!
काही सिनेमांचं गारूड रसिकांच्या मनावर वर्षानुवर्षे कायम असतं! याच प्रकारात चपखल बसेल असा सिनेमा म्हणजे मेहमूदचा ’बॉम्बे टू गोवा’! १९७२ साली आलेल्या या सिनेमाची जादू आजही अबाधित आहे.
हा सिनेमा अनेक अर्थाने महत्वपूर्ण असा होता. अमिताभ बच्चनचा नायक म्हणून एक फुल लेन्थ भूमिका असलेला आणि सुपर हिट झालेला पहिलाच सिनेमा होता. महमूदने या सिनेमातून अमिताभला ब्रेक देवून त्याची कारकिर्द घडविण्याचा शुभारंभ केला.
वस्तुत: हा सिनेमा १९६६ साली आलेल्या ’मद्रास टू पॉंडेचरी’ या तमीळ सिनेमाचा रीमेक होता.
हा तमीळ सिनेमा थिरूमलाइ महालिंगम यांनी दिग्दर्शित केला होता जे ’बॉम्बे टू गोवा’ या सिनेमाचे दिग्दर्शक एस रामनाथन यांचे गुरू होते. हा सिनेमा अमिताभला मिळाला कसा?
मेहमूद हा कायमच ’स्ट्रगलरस’ च्या मागे उभा रहायचा तसेच त्याला कलावंतातील कलागुण फार आधी दिसायचे. (पंचम तथा आर डी ला संगीताची पहिली संधी ’छोटे नवाब’ मध्ये त्यानेच दिली होती) या सिनेमाच्या नायकाकरीता तो नव्या चेहर्याच्या शोधात होता.
एक दोन डान्स, थोडासा रोमान्स आणि जराशी हाणामारी अशी माफक अपेक्षा होती कारण सिनेमाचा मुख्य नायक ’कॉमॆडी’चं होता! महमूदला त्याच्या भावाला अन्वर अलीला देखील लॉंच करावयाचे होते. अन्वर अली आणि अमिताभ या दोघांचा ’सात हिंदुस्तानी’ हा पहिला सिनेमा होता ज्यात त्यांना के ए अब्बास यांनी पहिला ब्रेक दिला होता.
हेही वाचा : “मेरे पास माँ है!”
महमूद एकदा अन्वरला म्हणाला ’क्यूं न हम इस सिनेममें ये लंबे घॊडे को ले लॆ?’ दोघांच एकमत झाल्यावर नायकाची निश्चिती झाली पण कुणी नायिका अमिताभ सोबत काम करायला तयारच होत नव्हती. सगळी कडून नकारघंटा ऐकल्यावर महमूदने अरूणा इराणीला विचारलं. तेंव्हा ती देखील ’कारवां’ मुळे लोकप्रिय झाली होती. पण महमूद व अरूणाची लव्ह स्टोरी तेंव्हा रंगात असल्याने आपल्या घरचेच प्रॉडक्शन असल्याने ती तयार झाली. शत्रुघ्न सिन्हा त्या वेळी स्ट्रगलर होता. अमिताभने त्याला काम करण्याचा आग्रह केला.बाकी महमूदची इतर कॉमेडी गॅंग तयारच होती. बसमधला हा विनोदी प्रवास जबरदस्त रंगला.
अमिताभच्या सिनेमाची,अभिनयाची आणि नृत्याची जादू आजही अबाधित आहे. पण या सिनेमातील ’देखा ना हाय रे सोचा ना’ या गाण्यावर नृत्याभिनय करताना अमिताभ अक्षरश: रडकुंडीला आला होता, कंप्लीट नर्व्हस झाला होता हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल नं? पण हे खरं आहे.
पहिल्या दिवशी तो अक्षरश: चुका मागून चुका करीत होता. काही केल्या तो नाचू शकत नव्हता. शेवटी महमूदने पॅक अपचा आदेश दिला. दुसर्या दिवशी सकाळ पासूनच मोकळ्या बस मध्ये अमिताभची रिहर्सल कोरीयोग्राफर पी एल राज यांनी सुरू केली. महमूदने बसमधील इतर प्रवासी कलावंताना विश्वासात घेवून सांगितले ’आज अगर आप अमितको कोऑपरेट नही करोगो, उसकी हिंमत की दाद नही दोगे तो बेचारा कभी खडा नही हो पायेगा.’ मग काय कलाकारांनी शूटींगच्या वेळी अमिताभला एवढं चिअर अप केलं की तो सहजतेनं नाचू शकला गाऊ शकला.महमूदच्या प्रयत्नाला यश आलं. सलीम जावेद यांनी हाच सिनेमा पाहून ’जंजीर’ करीता त्याचं नाव सुचवलं.