‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
अमिताभ बच्चन यांनी श्रीदेवीला चक्क ट्रक भरून फुले पाठवली!
हिंदी सिनेमाचे इतिहासात अमिताभ बच्चन यांनी सुपरस्टार पदाची मोठी खेळी खेळली. १९७३ सालच्या प्रकाश मेहरा यांच्या ‘जंजीर‘ पासून सुरू झालेला त्यांचा सुपरस्टार पदाचा प्रवास थेट नव्वदच्या दशकाच्या मध्यापर्यंत चालला. त्यानंतर अमिताभ बच्चन कॅरेक्टर रोल करू लागले परंतु या चरित्र भूमिका देखील चित्रपटात मध्यवर्ती भूमिका असायच्या. त्यांच्या या भूमिकांनी देखील प्रेक्षकांच्या मनावर मोठी जादू केली. अमिताभ बच्चन यांच्या सुपरस्टार पदाच्या कालावधीतच अभिनेत्री श्रीदेवी (sridevi) हिचे रुपेरी पडद्यावर आगमन झाले. भले हिंदी सिनेमात तिने सत्तरच्या दशकातच पदार्पण केले असले तरी तिचा पहिला लोकप्रिय चित्रपट होता १९८३ सालचा ‘हिम्मतवाला’. त्यानंतर मात्र श्रीदेवीने कधीच मागे वळून बघितले नाही.
अतिशय दमदार अभिनय करत तिने एकाहून एक सरस अशा भूमिका पडद्यावर साकारल्या आणि लेडी सुपरस्टार म्हणून तिने तिचे नाव सिद्ध केले. जेव्हा दोन कलाकारांची कारकीर्द समांतर चालू असते त्यावेळेला त्या दोघांनी एकत्र केलेल्या चित्रपटांची देखील चर्चा होते. अमिताभ बच्चन आणि श्रीदेवी या दोघांना एकत्रित घेऊन चित्रपट बनवण्याचे अनेक प्रयत्न झाले परंतु या दोघांचे केवळ तीनच चित्रपट आहेत! खरंतर पहिल्या दोन चित्रपटानंतर श्रीदेवीने अमिताभ बच्चनसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला होता. पण नंतर अमिताभने श्रीदेवीने (sridevi) आपल्या चित्रपटात काम करावे म्हणून चक्क ट्रक भरून तिच्याकडे फुले पाठवली होती आणि तिला सिनेमात काम करायला राजी केले होते! काय होत हा नेमका किस्सा? आणि श्रीदेवी का तयार नव्हती अमिताभ बच्चन सोबत काम करायला?
श्रीदेवी आणि अमिताभ बच्चन यांचा पहिला चित्रपट १९८४ साली प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचं नाव होतं ‘इन्कलाब’. हा एका साउथ मूवीचा हिंदी रिमेक होता. कथानक जबरदस्त होता. पण चित्रपटाला अपेक्षित यश मात्र नाही मिळालं. १९८६ साली आलेल्या ‘आखरी रास्ता’ या चित्रपटात हे दोघे पुन्हा एकत्र आले. या सिनेमात अमिताभ बच्चन यांचा डबल रोल होता. यात जयाप्रदा आणि श्रीदेवी (sridevi) अशा दोन नायिका होत्या.
पण त्या काळातील प्रथेप्रमाणे अमिताभ बच्चनच्या चित्रपटात कॅमेऱ्याचा संपूर्ण फोकस हा अमिताभ बच्चन यांच्यावरच असायचा. त्यामुळे चित्रपटातील नायिका आणि इतर कलाकारांचे स्थान हे दुय्यमच असायचे. नायिका तर फक्त ‘तोंडी’ लावण्यापुरत्या असायच्या. याच कारणामुळे या पुढे श्रीदेवीने (sridevi) अमिताभ बच्चन सोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. खरंतर ‘आखरी रास्ता’ सुपरहिट सिनेमा झाला होता. अनेक निर्माते या दोघांना एकत्र घेऊन चित्रपट तयार करणार होते. परंतु श्रीदेवीने या काळात एक मोठा निर्णय घेतला ‘अमिताभ बच्चन यांच्या सोबत यापुढे काम करायचे नाही!’
‘आखरी रास्ता’ चित्रपटानंतर तब्बल सहा वर्षांनी जेव्हा मुकुल आनंद ‘खुदा गवाह’ हा चित्रपट निर्माण करणार होते. तेव्हा पुन्हा सर्वांना या सिनेमात श्रीदेवीची भूमिका असावी असे वाटले. श्रीदेवीने चक्क नकार दिला. त्यावर अमिताभ बच्चन यांनी एक आयडिया केली. श्रीदेवी (sridevi) एका दुसऱ्या सिनेमाचा शूट करत होती तिथे अमिताभने एक पुष्पगुच्छने भरलेला ट्रक तिच्याकडे पाठवला. सोबत सॉरी कार्ड देखील पाठवले ! अमिताभ बच्चन यांच्या या कृतीचे श्रीदेवीला मन पालटले.
तिने सिनेमाचे कथानक ऐकायला होकार दिला. मुकुल आनंद यांनी जेव्हा चित्रपटाचे कथानक तिला ऐकवले तेव्हा तिने चित्रपट स्वीकारला. परंतु काही अटी शर्ती सांगितल्या. त्यात पहिली अट अशी होती की चित्रपटाचे संपूर्ण स्क्रिप्ट अमिताभ बच्चन यांच्या सहीनिशी श्रीदेवीकडे पाठवले जाईल आणि त्यामध्ये काडीमात्र देखील बदल होणार नाही ! दुसरी अट अशी होती की, या चित्रपटात श्रीदेवीच्या मुलीची भूमिका पुन्हा श्रीदेवीच करेल. म्हणजे श्रीदेवीचा या चित्रपटात डबल रोल असेल (बेनजीर आणि मेहंदी ).
=========
हे देखील वाचा : ‘स्वदेस’मधील या गाण्याचे रेकॉर्डिंग हॉटेलच्या एका रूममध्ये केले होते!
=========
थोडक्यात अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटात तितकीच मोठी आणि महत्त्वाची भूमिका तिला साकारायची होती. त्या पद्धतीने तिच्या सर्व अटी शर्ती मान्य झाल्या. ‘खुदा गवाह’ हा चित्रपट ८ मे १९९२ या दिवशी प्रदर्शित झाला आणि सुपरहिट झाला. परंतु या चित्रपटानंतर देखील अमिताभ आणि श्रीदेवी (sridevi) पुन्हा एकत्र कधीच आले नाही. २०१३ सालच्या ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटात श्रीदेवीसोबत त्यांनी एक कॅमिओ रोल केला तेवढेच !