Taath Kana Movie Trailer: जिद्द आणि संघर्षाची उत्कंठावर्धक कथा दाखवणाऱ्या

Amitabh Bachchan च्या सुपर स्टारडमच्या काळात फ्लॉप झाला होता ‘हा’ सिनेमा!
अमिताभ बच्चन यांच्या सुपरस्टार डमच्या काळामध्ये बहुतेक सिनेमे बम्पर हिट होत असताना काही चित्रपट मात्र हिट ठरले नाहीत. त्याची वेगवेगळी कारणे आहेत; पण अमिताभचा जो लोकप्रियतेचा झंजावात चालू होता त्यामध्ये अडथळे अशा चित्रपटांमुळे येत होते हे नक्की. त्यातच एक चित्रपट आला होता ज्यात अमिताभची नायिका हेमा मालनी होती, दिग्दर्शक प्रमोद चक्रवर्ती होते पण हा सिनेमा फ्लॉप ठरला. आज अमिताभचा हा सिनेमा कोणाला आठवण्याची सुतराम शक्यता देखील नाही पण हा चित्रपट जेव्हा फ्लोअर वर गेला होता तेव्हा त्याची मोठी हवा झाली होती. कोणता होता चित्रपट? आणि काय होती नेमकी स्टोरी?

१९७३ साली आर के फिल्म्सचा ‘बॉबी’ बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक यशस्वी सिनेमा होता. त्याला टक्कर देणारे पुढचे दोन सिनेमे होते यश चोप्रांचा राजेश खन्ना नायक असलेला ‘दाग‘ आणि प्रमोद चक्रवर्तीचा धर्मेंद्र नायक असलेला ‘जुगनू’. पण चार नंबरवर असलेल्या प्रकाश मेहरा यांच्या ‘जंजीर’ने भले बॉक्स ऑफिसवर चौथा क्रमांक मिळवला असला तरी या ऑल टाइम सुपर हिट सिनेमावर सर्व मिडीयाचा फोकस होता. त्यामुळे या वर्षी सर्वाधिक चर्चा झाली अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन यांची. बॉक्स ऑफिसमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे चित्रपटांच्या दिग्दर्शक अनुक्रमे यश चोप्रा आणि प्रमोद चक्रवर्ती हे देखील अमिताभच्या प्रेमात पडले आणि अमिताभला घेऊन सिनेमा काढायचे त्यांनी ठरवले.
यश चोप्रा यांनी लगेच ‘कभी कभी’, ‘दिवार’ आणि ‘त्रिशूल’ हे सिनेमे अमिताभ सोबत साइन केले. ‘दिवार’ १९७५ साली प्रदर्शित झाला आणि सुपरहिट देखील झाला. अमिताभ बच्चन यांची अँग्री यंग मॅनची इमेज लार्जर दॅन लाईफ इतकी मोठी झाली. अमिताभच्या या चित्रपटातील विजय वर्मा या कॅरेक्टरमध्ये अनेक कॅरेक्टर लपलेली होती. या चित्रपटात तो नास्तिक दाखवला होता. देवा वर चिडलेला, मंदिरात प्रवेश न करणारा. याच त्याच्या ‘नास्तिक’ कॅरेक्टरला घेऊन प्रमोद चक्रवर्ती यांनी एक चित्रपट काढायचे ठरवले आणि चित्रपटाला टायटल दिले ‘नास्तिक’. १२ मे १९७५ या दिवशी या ‘नास्तिक’चा मुहूर्त झाला. अमिताभ आणि हेमा हि जोडी तो सुपरस्टार पदावर आरूढ झाल्यानंतर पहिल्यांदाच एकत्र येत होते. या मुळे मिडीयात या सिनेमाची मोठी हवा निर्माण झाली.

================================
हे देखील वाचा : अमिताभने केली चक्क हेमा मालिनीच्या भावाची भूमिका !
=================================
प्रमोद चक्रवर्तीकडे अमिताभ पहिल्यांदाच काम करत होता. पण या काळात अमिताभ बच्चन प्रचंड बिझी झाला एका पाठोपाठ एक त्याचे सिनेमे येत होते. त्यामुळे प्रमोद चक्रवर्तीच्या ‘नास्तिक’चे शूट लांबत गेले. आपण निवडलेला प्लॉट बरोबर आहे की नाही याची देखील प्रमोद चक्रवर्ती यांना शंका येत होती. ते कन्फ्युज होते. कारण तो काळ अमिताभ बच्चन यांच्या ॲक्शन ड्रामा सिनेमाचा होता. त्यात त्याचा ‘नास्तिक’ तेचा अँगल चालेल की नाही याची त्यांना शंका होती. ‘दिवार’ चित्रपटांमध्ये भले अमिताभला नास्तिक जरी दाखवलं असलं तरी क्लायमॅक्स ला अमिताभची मानसिकता स्पष्ट करणारा शॉट होता आणि शेवटी तो मंदिरात प्रवेश करतो असे देखील दाखवले होते. यातून सलीम जावेद त्यांनी देशातील सामाजिक मानसिकता लक्षात घेऊन हा बदल केला होता. प्रमोद चक्रवर्ती यांच्या देखील असे लक्षात आले की केवळ ‘नास्तिक’ हा अँगल घेऊन आपण चित्रपट यशस्वी करू शकत नाही म्हणून त्यांनी पुन्हा एकदा स्क्रिप्ट लिहिली आणि नव्याने शूटिंग सुरू केले. यामुळे शूटिंग लांब गेले इतके 1980 ला हा सिनेमा पुन्हा एकदा नव्याने शूट करायला सुरुवात झाली.
या काळात अमिताभचे अनेक सिनेमा येत होते सुपरहिट होत होते त्यामुळे ‘नास्तिक’ च शूटिंग कासव गतीने चालू होतं. त्या काळात एकदा एका पत्रकार परिषदेमध्ये अमिताभ बच्चन यांना पत्रकारानी ‘नास्तिक’ हा सिनेमा कधी पूर्ण होणार? असा प्रश्न विचारला त्यावेळेला अमिताभने आपल्या शेजारी बसलेल्या छोट्या अभिषेक बच्चनकडे पाहत म्हणाले “माझा मुलगा अभिषेक जेव्हा मोठा होईल त्यावेळेला तोच कदाचित हा सिनेमा तो पूर्ण करेल!” अमिताभने उत्तर वैतागून दिले होते की विनोदाने दिले होते माहित नाही पण यातून हा चित्रपट किती लांबत होता हे लक्षात येतं. शेवटी कसाबसा हा सिनेमा १९८२ साली पूर्ण झाला. पण त्याच वर्षी २६ जुलै ला अमिताभला ‘कुली’ सिनेमाच्या सेटवर एक्सीडेंट झाल्यामुळे या सिनेमाचे डबिंग रखडले. नंतर यथावकाश हा सिनेमा पूर्ण झाला आणि १८ फेब्रुवारी १९८३ या दिवशी असे प्रदर्शित झाला. त्या काळात अमिताभचा सिनेमा कसा जरी असला तरी पहिले दोन आठवड्या हाऊसफुल असायचा. कारण त्यावेळेला प्रेक्षकांना अमिताभला पडद्यावर पाहण्याची इतकी ओढ असायची की सिनेमा काय क्वालिटीचा आहे याकडे त्यांचे लक्ष नसायचे.

दोन आठवड्यानंतर मात्र सिनेमाची गर्दी कमी होऊ लागली आणि हा सिनेमा थेटर मधून लवकर उतरवावा लागला. (नास्तिक सिनेमाचे एक वैशिष्ट्य होतं यामध्ये जुन्या काळातील अभिनेत्री नलिनी जयवंत यांनी अमिताभ बच्चन यांच्या आईचा रोल केला होता. १९५४ साली आलेल्या ‘नास्तिक’ या आय एस जोहर यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात नलिनी जयवंत यांनी नायिकेची भूमिका केली होती.) या चित्रपटात हेमामालिनी अमिताभची नायिका होती. हा या जोडीचा शेवटचा सिनेमा. यानंतर तब्बल वीस वर्षानंतर ‘बागबान’ या चित्रपटात हे दोघे एकत्र आले होते.
================================
हे देखील वाचा : Vinod Khanna : जेव्हा अमिताभ बच्चन यांचं यश विनोद खन्ना यांच्या डोळ्यांत खुपत होतं….
=================================
चित्रपटाची गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली होती तर संगीत कल्याणजी आनंदजी यांचे होते. चित्रपटाच्या दिरंगाईमुळे पटकथा अत्यंत विस्कळीत झाली होती. हा चित्रपट आठ वर्षे निर्मिती अवस्थेमध्ये असल्यामुळे चित्रपटाच्या कंटिन्युटी मध्ये देखील खूप फरक पडला होता. एकूणच अमिताभच्या लोकप्रियतेच्या झंजावातात हा सिनेमा फ्लॉप सिनेमा म्हणून लक्षात राहिला. रिपीट रनला देखील हा सिनेमा पुन्हा रिलीज झाल्याची आठवत नाही. टीव्हीवर देखील हा सिनेमा कधी पुन्हा एकदा दाखवल्याचे स्मरणात नाही. एकूणच अमिताभच्या फ्लॉप सिनेमांमध्ये याचा समावेश करावा लागेल!