जेव्हा ऋषी कपूरच्या सांगण्यावरून अमिताभला सिनेमातून काढून टाकले!
बॉलीवूडमध्ये चित्रपट बनताना अनेक गमती जमती होत असतात. कुणाची तरी अनपेक्षितपणे एन्ट्री होते तर कुणाला चित्रपटातून ड्रॉप केलं जातं! या मनोरंजक गोष्टी आज इतक्या वर्षानंतर वाचल्या किंवा ऐकल्या तर मजा येते. असाच प्रकार १९७५ साली झाला होता. जेव्हा अभिनेता ऋषी कपूरने (Rishi Kapoor) चक्क अमिताभ बच्चनला एका चित्रपटातून काढून टाकण्याचा सल्ला दिला होता. निर्मात्याने देखील ऋषी कपूरच्या सांगण्यावरून चित्रपटातून अमिताभ बच्चन यांना घेतलेच नाही आणि त्या जागी शशी कपूरची एन्ट्री झाली! कोणता होता तो चित्रपट आणि काय होता? हा नेमका किस्सा?
हि घटना आहे १९७५ सालची. अभिनेता ऋषी कपूर यांचा एक जिवलग मित्र होता बिट्टू आनंद. तो टिनू आनंदचा भाऊ. बिट्टू आनंद एक चित्रपट तयार करणार होता आणि टिनू त्याचे दिग्दर्शन करणार होता. सिनेमा होता ‘दुनिया मेरी जेब में’ टिनू आनंद यांचा हा डायरेक्शनला डेब्यू असलेला सिनेमा होता. या सिनेमाची स्टोरी त्याचीच होती. या सिनेमा बाबत जेव्हा बिट्टू आनंद याने ऋषी कपूर सांगितले तेव्हा ऋषी कपूर (Rishi Kapoor) खुश झाला. आपला मित्र पहिल्यांदा चित्रपट काढतो आहे असे म्हटल्यानंतर त्याला सांगितले, ”या सिनेमाचा मी हिरो असेल आणि या सिनेमात काम करण्यासाठी एक पैसा ही तुझ्याकडून घेणार नाही!”
आनंद बंधूना हे ऐकून खूप आनंद झाला. कारण त्यांची फायनान्शिअल कंडिशन तेवढी चांगली नव्हती आणि ऋषी कपूरसारखा स्टार आपल्या सिनेमात एक पैसा न घेता काम करतो हे ऐकून ते खूष झाले. ऋषी कपूरचा (Rishi Kapoor) त्या काळात मोठा बोलबाला होता कारण ‘बॉबी’ सिनेमा देशभर सुपरहिट झाला होता. तसेच ‘जहीरीला इंसान’ आणि ‘खेल खेल में’ हे दोन सिनेमे सुपरहिट झाले होते. त्यामुळे ऋषीचा भाव मार्केटमध्ये जोरात होता. यातील दुसऱ्या भूमिकेसाठी टिनूच्या डोक्यात अमिताभ होता कारण त्याची ‘सात हिंदुस्तानी‘ पासून दोस्ती होती.
टिनू आनंद यांनी सिनेमाची स्टोरी ऋषीला सांगितली. ऋषीला कथा आवडली. टिनू म्हणाला, ”या चित्रपटात तुमच्यासोबत अमिताभ बच्चन भूमिका करणार आहे!” ऋषी कपूर (Rishi Kapoor) आणखी खुश झाला आणि तो म्हणाला, ”उद्याच आपण पेपर्स साइन करून टाकू.” त्या दिवशी संध्याकाळी ऋषी कपूर एका पार्टीला गेला होता. त्याचा ‘जिंदादिल’ नावाचा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. त्याच सिनेमाची पार्टी होती. या पार्टीमध्ये त्याची मुलाखत छायाचित्रकार सुदर्शन नाग यांच्याशी झाली.
त्यांनी ऋषीला विचारले, ”आता नवीन काय?” तेव्हा ऋषी कपूरने सांगितले की, ”आजच माझे एका निर्मात्याशी बोलणे झाले आहे आणि मी त्यांच्या चित्रपटात काम करणार आहे आणि माझ्यासोबत या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन काम करणार आहे.” त्यावर सुदर्शन नाग यांनी विचारले, ”ही तीच तर स्क्रिप्ट नाही ना ज्यामध्ये दुसऱ्या नायकाला अपंगत्व येते आणि संपूर्ण चित्रपट तो व्हील चेअरवर असतो?” त्यावर ऋषी कपूर (Rishi Kapoor) म्हणाला, ”हो तशीच काहीतरी स्टोरी आहे.” त्यावर सुदर्शन नाग म्हणाले, ”तसे जर असेल तर हा चित्रपट तू करू नकोस. कारण प्रेक्षकांची सगळी सहानुभूती दुसऱ्या पात्राला जाणार आहे. तू फक्त नावाला हिरो असशील. दुसरं पार्ट मात्र प्रेक्षकांची सिम्पथी घेऊन जाईल!” ऋषी कपूरचा चेहरा आता पडला. दिवसभर ज्या जोशात होता तो आनंद चटकन गायब झाला. ऋषीने विचार केला ‘हि भूमिका अशा कलाकाराला द्यायची जो सिनेमात आपल्या वरचढ होणार नाही. आणि आपल्याला फुटेज वाढवून घेता येईल.!’
=========
हे देखील वाचा : बॉब क्रिस्टो हा खलनायक आठवतो का?
=========
दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्याची भेट बिट्टू आनंदसोबत झाली. तेव्हा त्याने सांगितले, ”मी सिनेमात काम करायला तयार आहे. एक पैसा ही न घेता. पण माझी अट आहे. या सिनेमातील दुसरी भूमिका अमिताभ बच्चन करणार नाही. त्यालाही भूमिका तुम्ही देऊ नका. अमिताभ असेल तर मी काम करणार नाही!” बिट्टू आनंदला खूप आश्चर्य वाटले पण ऋषी कपूरला (Rishi Kapoor) त्यांनी कारण विचारले नाही. ऋषी कपूर त्यांच्या सिनेमात एक पैसे न घेता काम करणार होता. बिट्टू आनंदने आपला भाऊ टिनू आनंदला ऋषी कपूरची ती अट सांगितली. दोन्ही आनंद बंधूंचे फायनान्शिअल कंडिशन फारशी चांगली नसल्याने त्यांना ऋषी कपूरची अट मान्य करण्यापासून पर्याय नव्हता.
नंतर त्या दोघांनी ऋषी कपूर (Rishi Kapoor) विचारले, ”जर अमिताभ बच्चनला घ्यायचे नाही तर ती भूमिका आम्ही कोणाला द्यायची?” त्यावर ऋषी कपूर म्हणाले, ”ही भूमिका तुम्ही शशी कपूरला द्या.” अशा पद्धतीने शशी कपूरचा या चित्रपटात प्रवेश झाला. १९७६ साली या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले त्या काळात शशी कपूर आपल्या स्वतःच्या एका निर्मितीमध्ये (जुनून) व्यस्त असल्यामुळे हा चित्रपट तब्बल तीन वर्षांनी १९७९ साली प्रदर्शित झाला आणि सुपरफ्लॉप झाला. आज ‘दुनिया मेरी जेब मे’ हा चित्रपट कोणी आठवा म्हटलं तरी आठवला जाणार नाही. पण ऋषी कपूरच्या हट्टाने अमिताभ बच्चनला या चित्रपटातून बाहेर पडावे लागले होते हे नक्की. गमंत म्हणजे ऋषी आणि शशी यांचे परस्परांशी नाते काका पुतण्याचे होते पण या सिनेमात शशी कपूर ऋषीचा मोठा भाऊ दाखवला होता!