आनंदघन – लता मंगेशकर यांची अविस्मरणीय आठवण
गायिका म्हणून स्वरांवर असलेली हुकूमत लता मंगेशकर यांच्या सुरेल गळ्यात जितकी पक्की होती तितक्याच त्या संगीतकार म्हणूनही रसिकमनांवर कोरल्या गेल्या आहेत.
लता मंगेशकर उर्फ ‘आनंदघन’ यांनी जेव्हा संगीत दिग्दर्शनात स्वत:ला आजमावलं होतं, तेव्हा त्यातही सुरांसाठी निष्ठा होतीच, पण त्याला संगीताच्या जाणकारीची, मातीच्या गंधाची आणि चिंतनाच्या खोलीचीही अपूर्व साथ होती. म्हणूनच लताबाईंचा पार्श्वगायिका म्हणून लागणारा स्वर जितका उच्च प्रतीचा होता, तसाच ‘आनंदघन’ म्हणून आकारास आलेला संगीतकाराचा स्पर्शही सुरेल होता.
गायिका म्हणून त्या सर्वश्रेष्ठ आहेतच, पण त्यांनी संगीतकार म्हणूनही मोठे योगदान दिले आहे. ‘आनंदघन’ या नावाने त्यांनी संगीतकार म्हणून केलेला छोटासा, पण प्रतिभावान प्रवास चिरस्मरणीय ठरला आहे. चालींमधील वैशिष्ट्यपूर्ण माधुर्यामुळे त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी मराठी रसिकांच्या ओठी आजही रुळताना दिसत आहेत. लता मंगेशकरांनी संगीतकार या नात्याने पाच सिनेमांना संगीत दिले. यातील प्रत्येक गाणे कमालीच्या गोडव्याने भारले आहे. अशी गाणी काळजाच्या कोपऱ्यात जाऊन कायमची विसावतात, त्या वेळी त्या संगीताची, संगीतकाराची महती लक्षात येते.
१९५० मध्ये आलेल्या दिनकर पाटील यांच्या ‘रामराम पाव्हणं’ या सिनेमानं लतादीदींमधील संगीतकाराचा प्रवास सुरू झाला होता. सुरूवातीला त्यांनी यावेळी त्यांनी आपल्या नावानेच संगीत दिले होते. हा तमाशापट होता. ‘माझ्या शेतात सोनं पिकतंय’ हे गाणे त्यांनी नामवंत संगीतकार सी.रामचंद्र तसेच बहीण मीना मंगेशकर यांच्या साथीने गायले होते. ‘शपथ दुधाची या आईच्या’, ‘तू गुपित कुणाला सांगू नको’ या सिनेमातील आणखी दोन गाण्यांशिवाय ‘कशी जडली सांग तुझ्यावरती माझी प्रीती’ तसेच ‘राया गालात खुदकन हसा…’ ही तमाशातील संगीताच्या चालीने दिलेली गाणी लाजवाब होती.
प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांच्या सिनेमांना लतादीदींनी दिलेले संगीत हा एक सांगीतिक अभ्यासाचा विषय होऊ शकतो. मोहित्यांची मंजुळा (१९६३), मराठा तितुका मेळवावा (१९६४), साधी माणसं (१९६५) आणि तांबडी माती (१९६९) असे लागोपाठ चार सिनेमांतील एकापेक्षा एक सरस गाणी एक संगीतकार म्हणून बाई किती श्रेष्ठ दर्जाच्या होत्या, हे दाखवून देते.
=====
हे देखील वाचा: संगीत क्षेत्रातील एका सुरेल नक्षत्राचा अंत: लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड
=====
भालजींना आपल्या सिनेमातून रसिकांना काय द्यायचे आहे, हे संगीतकार म्हणून लताजींना अचूक गवसले होते. हे चार सिनेमे इतिहासपट आणि सामाजिक जाणिवा दृढ करणारे होते. त्यातील प्रत्येक गाणे नीट ऐकले, तर लक्षात येते की ते आपल्या मराठी मातीशी घट्ट नाते सांगणारे असून, तांबड्या मातीच्या नादमाधुर्याने ते तनामनाला भारावून टाकणारे आहे. आनंदघन संगीतकार म्हणून दिग्गज का आहेत, हे यावरून सहज पटते. सहा दशके उलटून गेल्यानंतरही त्या काळातील गाणी अजरामर आहेत आणि त्यात आनंदघन यांच्या संगीताचा अनमोल वाटा आहे.
१९५० च्या आधीपासून लतादीदींचा पार्श्वगायिका म्हणून सुरू झालेला प्रवास ६० आणि ७० च्या दशकांत प्रतिभेच्या सर्वोच्च उंचीवर पोहोचला होता. याच दरम्यान त्यांनी आपल्यातील संगीतकारालाही पारखून घेण्याचा प्रयत्न केला असावा आणि भालजी पेंढारकर यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकाच्या जोडीने त्यांच्यातील संगीतकार असामान्य कामगिरीने फुलला असावा.
‘बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला’, ‘झाला साखरपुडा’, ‘निळ्या आभाळी’, ‘सोन सकाळी सर्जा…’ ही १९६३ मध्ये आलेल्या मोहित्यांची मंजुळामधील गाणी आणि त्यानंतर वर्षभराने आलेल्या ‘मराठा तितुका मेळवावा’ या सिनेमातील शूर आम्ही सरदार, नाव सांग सांग गाव सांग, रेशमाच्या रेघांनी, अखेरचा हा तुला दंडवत, मराठी पाऊल पडते पुढे… ही गाणी शिवकालीन काळ डोळ्यासमोर आणतातच, पण दगडाच्या देशा, कणखर देशाच्या राकटपणाबरोबर मराठी मातीच्या पराक्रमाचीही महती गाताना दिसतात. याशिवाय शिवाजी महाराजांच्या जोडीने स्वराज्यासाठी लढणाऱ्या मावळ्यांच्या जोडीदारांच्या मनाची ओढ, व्यथा अशा काही शब्दात सांगून जातात, की आपण त्या सिनेमाशी आणि गाण्यांशी आयुष्यभर जोडले जातो.
बाई बाई मनमोराचा पिसारा, निळ्या आभाळी, अखेरचा हा तुला दंडवत या गाण्यांच्या चालींबरोबरच एक गायक म्हणून स्वत: लतादीदींचा लागलेला स्वर काळजात कायमचा विसावतो. बाईंबरोबरच आशा भोसले व हदयनाथ मंगेशकर यांनी याच सिनेमांमध्ये गायलेली गाणी ही सोन्याहून लखलखणारी ठरलीत. ‘शूर आम्ही सरदार’ हे घोड्यांच्या टापांबरोबर हदयनाथांच्या आवाजात पुढे जाणारे गाणे असो की ‘रेशमाच्या रेघांनी’ हे आशाबाईंनी गायलेले गाणे… स्तुती करण्यासाठी शब्द कमी पडतील, इतकी ती भारावून टाकतात. याशिवाय नाव सांग सांग गाव सांग : आशा व हृदयनाथ आणि मराठी पाऊल पडते पुढे : लता व हृदयनाथ अशी ड्युएट गाणीही अविस्मरणीय ठरली आहेत.
=====
हे देखील वाचा: लता मंगेशकर म्हणजे फक्त सात शब्द, सात सूर, सप्तरंगी वाटचाल इतकेच नव्हे तर बरेच काही आहे.
=====
मोजकेच सिनेमा देऊनही ‘आनंदघन’ यांचे संगीत खूप वरच्या दर्जाचे ठरले त्याला गावाकुसांतील माणसांची भाषा बोलणाऱ्या साधी माणसे व तांबडी माती या सिनेमातील गाणी कारणीभूत ठरलीत. वाट पाहूनी जीव शिणला, राजाच्या रंग महाली, नको देवराया, ऐरणीच्या देवा तुला, मळ्याच्या मळ्यामंधी ही साधी माणसंमधील गाणी ऐकली तर जीव शांतसुखांत होतो. एक आत्मिक आनंद लाभतो आणि लताबाईंनी संगीतकारांसाठी घेतलेले ‘आनंदघन’ हे नाव सार्थ ठरते! ऐरणीच्या देवा तुला या अजरामर गाण्यासाठी आनंदघन यांनी हरीप्रसाद चौरासिया यांच्या बासरी वादनाचा अप्रतिम असा उपयोग केला होता.
‘साधी माणसं’या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार तर मिळालाच, पण राज्य पुरस्काराबरोबर आनंदघन यांना सर्वोत्तम संगीतकार तसेच लतादीदींना सर्वोत्तम पार्श्वगायिकेचा पुरस्कार मिळाला. १९६९ मध्ये आलेल्या तांबडी मातीच्या गाण्यांनी तर कमाल केली. मागते मन एक काही, अपर्णा तप करीते काननी, माझ्या कपाळीचे कुंकू, जा जा रानीच्या पाखरा, डौल मोराच्या मानेचा, जिवा शिवाची बैल जोड या गाण्यांनी आनंदघनच्या नावाआडून लतादीदीमधील संगीतकाराची प्रतिभाच अधोरेखित केली. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि त्यात आनंदघनाच्या संगीताचा मोलाचा वाटा होता. डौल मोराच्या मानेचा, जीवा शिवाची बैल जोड ही हदयनाथ यांनी गायलेली गाणी आजही सांगितिक कार्यक्रमांचा एक अविभाज्य भाग आहेत.
मराठी सिनेमाचे साठचे दशक आनंदघन यांच्या गाण्यांनी गाजले. पण पुढे त्यांच्या संगीताचा परिसस्पर्श मराठी सिनेजगताला होऊ शकला नाही. अर्थात, तांबड्या मातीशी आत्मीय नाते असल्यामुळेच त्यांच्या संगीताचे गारुड रसिकांवर आजही कायम आहे…