अनंत धर्माधिकारी यांनी चित्रपट सृष्टीत इतिहास घडवणारी ही नवीन पद्धत सुरू केली…
मराठी चित्रपट सृष्टीत 5 दशकाहून अधिक काळ आपल्या कर्तुत्वाची मोहर उमटविले संकलक म्हणजे कै. अनंत जगन्नाथ धर्माधिकारी. मूळचे ते कोल्हापूरचे. 9 जुलै 1932 साली त्यांचा जन्म झाला.
शाळेत जायची त्यांना आवड होती. परंतु परिस्थिती गरिबीची असल्यामुळे शिक्षण बेताचेच झाले. नादारी मध्ये शिकतात त्या पद्धतीने जेमतेम सहावी पर्यंत शिक्षण झाले. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांची मोठी बहीण त्यांना शिक्षणासाठी वर्ध्याला घेऊन गेली. तिच्या मिस्टरांनीच सगळे शिकवलं. बहिणीने मिस्टरांना सेवाग्राम येथे शिक्षणासाठी घेऊन जायला सांगितले. सेवाग्राम येथे पुस्तकी ज्ञानापेक्षा, ग्रामोद्योग शिकतात. त्यामुळे त्यातून शिकून बाहेर पडणारी व्यक्ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. सुतारकाम, शेतीकाम यासारखे कोणतेही काम करू शकते.
सेवाग्राम ते पवनार 5 मैल अंतर. पवनार येथे विनोबा भावे हे दर शुक्रवारी प्रार्थना घ्यायचे. याबाबत आठवण म्हणजे प्रार्थना म्हणताना उभे कसे राहायचे याबाबत विनोबाजी म्हणायचे की प्रार्थना म्हणताना डोळे बंद करायचे नाहीत, का तर झोप येते. डोळे उघडे ठेवायचे नाहीत, का तर लक्ष विचलित होते. मग काय करायचे तर एक छोटासा दगड घेऊन त्यावर लक्ष केंद्रित करायचे, एक नजरेने बघत राहायचे व प्रार्थना म्हणायची त्यामुळे एकाग्रता वाढते.
परंतु आनंतरावांचे देवाचे करण्यात मन रमले नाही. एकाग्रता झाली नाही. त्यांची एकाग्रता काम करण्यात होती. दिवस-रात्र काम करण्यात स्वतःला झोकून द्यायचे.
सेवाग्राम सोडल्यानंतर ते पुण्यात आले. तेव्हा त्यांचे मोठे बंधू कै. दत्ता धर्माधिकारी हे ‘अल्हाद चित्र’ नावाची चित्र संस्था स्थापन करून ‘बाळा जो जो रे’ हा चित्रपट काढणार होते. यांना पिक्चर ची आवड लहानपणापासून असल्यामुळे त्यांनी लगेच दत्ता धर्माधिकारी यांना विचारले की मी येऊ का? तेव्हा त्यानी ‘नको रे बाबा’ आमचा धंदा भयंकर वाईट आहे. तुझं सगळं व्यवस्थित चालल आहे. त्याच वेळी त्यांचे मोठे भाऊ – भाऊ धर्माधिकारी यांनी, त्यांच्यासाठी कोल्हापूर जवळच्या खेड्यात नोकरी बघितली होती. खेड्यात जाऊन तेथील मुलांना रानात घेऊन जायचे व शिकवायचे याचे त्यांना पन्नास रुपये महिन्याला मिळणार होते नोकरीसाठी जाणार मग आईने सत्यनारायणाची पूजा करायचं ठरवले. पूजा करायला बसले. आणि तेवढ्यात पुण्याहून पत्र आलं होत. त्यांना पुण्याला बोलावले होते. भावाने विरोध दर्शविल्यामुळे नाराजी आली मात्र वहिनींच्या विनंती ने त्यांना संस्थेत प्रवेश मिळाला. या चित्रपटासाठी त्यांनी सहाय्यक दिग्दर्शकाचं काम केले. आणि तो चित्रपट यशस्वी सुद्धा झाला. अशा तऱ्हेने चित्रपट सृष्टीत त्यांचा प्रवेश झाला.
त्यानंतर तब्बल ५० वर्षाहून अधिक (दरवर्षी सरासरी एक) चित्रपटांचे संकलन त्यांनी केले
सुरुवातीला त्यांनी लेबल लावणं, कटिंग शोधणे या प्रकारचे अनेक कामे केली. पण स्थिर झाले ते संकलक म्हणूनच. ‘पतिव्रता’ चित्रपटाच्या वेळी ‘अल्हाद चित्र’ संस्थेची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्या मोठ्या भावाने संकलन करशील का? असे विचारले तेव्हा त्यांनी पटकन होकार दिला. या परिस्थितीत त्यांनी प्रोडक्शन व एडिटिंगची जबाबदारी घेतली. रश प्रिंट एडिट करणे ऐवजी डायरेक्ट निगेटिव कापून एडिटिंग चे काम करून अनंत धर्माधिकारी यांनी चित्रपटसृष्टीत एक नवा इतिहास घडवला. त्या काळात जर गिनीज बुक लिमका बुक असते तर त्याची नोंद झाली असती. याचा सगळ्यात जास्त आनंद त्यांचे भाऊ दत्ता धर्माधिकारी यांना झाला. ज्याला त्याला ते आनंदाने सांगत होते की माझ्या अनंताने डायरेक्ट निगेटिव्ह कापली.
अनंतराव नेहमी म्हणायचे काम महत्त्वाचे. आपली वाट दुसरा कोणीतरी पाहतोय म्हणून आपण वेळ पाहिली पाहिजे. यावर त्यांचा सदैव कटाक्ष असे. स्वतःला कामात झोकून देणे हा त्यांचा स्वभाव.
त्यानंतर त्यांची अनंत माने यांच्याकडे सहाय्यक संकलक म्हणून प्रवेश झाला. अनंतरावाना हा बदल सुखकारक ठरला तो अनंत माने यांच्या मुळेच. त्यांना संकलक म्हणून जे काही यश मिळालं त्यामध्ये त्यांचे बंधू, अनंत माने आणि सुप्रसिद्ध संकलक पांडुरंग खोचीकर यांच्यामुळेच. अनंत माने व पांडुरंग खोचीकर यांना ते गुरुस्थानी मानत होते.
ते कधीही त्यांच्या कामाचे पैसे मागत नसत. एकदा त्यांचे दिग्दर्शक एम. एस. अब्बास त्यांना म्हणाले, अरे न मागता पैसे देणारा अजून पृथ्वीवर या क्षेत्रात निर्माण झाला नाही. तू पैसे मागितले पाहिजेत.
दिग्दर्शक पी. एल. संतोषी आणि अनंतराव यांचे खूप जमायचे. एकदा कोलकत्यात संकलनासाठी गेले असताना त्या चित्रपटातील गाणी इतकी उत्कृष्टपणे संकलित झाली होती की सर्वजण त्यांचे अभिनंदन करू लागले. पी. एल. संतोषिनी तर त्यांना घट्ट मिठी मारली. तेव्हा अनंतराव सहजपणे पी. एल. संतोषी ना म्हणाले मेरा हाथ खाली है, तेव्हा खरंच अनंत रावांच्या हातात घड्याळ नव्हते. पी. एल. संतोषिनी झटकन आपल्या हातातील घड्याळ काढून त्यांच्या हातात घातले. हे लांबून निर्माता पाहत होता. दिग्दर्शक या मुलाला इतका मानतो म्हणून त्या निर्मात्याने अनंत रावांची खास बडदास्त ठेवली.
अनंतरावांनी मराठी, हिंदी, भोजपुरी, गुजराती, तमिळ असे अनेक चित्रपट केले. पण दामू अण्णा यांचा किस्सा गमतीशीर आहे. एकदा गावात दामू अण्णा यांच्या ‘राम राम पाव्हण’ या चित्रपटाचे शूटिंग होते म्हणून अनंतराव शूटिंग बघायला सहज म्हणून गेले. त्यावेळी ते चित्रपट क्षेत्रामध्ये नव्हते इतक्यात कोणीतरी दामू अण्णा यांची नक्कल केली तेव्हा ते अनंत रावांवर काठी घेऊन धावले. हाणली देखील. तेव्हा दामुअण्णा मालवणकर यांना वाटले याच मुलाने आपल्याला चिडवले. पुढे चित्रपट क्षेत्रात आल्यावर हा किस्सा दामू अण्णा यांना सांगितला तेव्हा त्यांच्या खास आवाजात ते हसले. ‘पतिव्रता’ चित्रपटाच्या वेळी दामू अण्णा यांना काम द्यायचे ठरले तेव्हा प्रश्न होता दामू अण्णांच्या मानधनाचा. कारण दुसऱ्या एका चित्रपटात लहान कामासाठी त्यांनी हजार रुपये घेतले होते. अनंतरावांनी दत्ता धर्माधिकारी यांना बजेट विचारले असता, त्यांनी 1200 रुपये सांगितले. अनंतराव दामू अण्णा यांना भेटले. जवळ जवळ दोन तास त्यांच्याकडे होते. त्यांनी अण्णांना सांगितले की मी तुम्हाला एकही पैसा देणार नाही. पण तुम्ही मला माझ्या चित्रपटात हवे आहात. जोपर्यंत तुम्ही हो म्हणत नाही तोपर्यंत मी जाणार नाही आणि शेवटी सर्वकाही अवघ्या 500 रुपया वर ठरले. 500 रुपयांचा आकडा ऐकून दत्ता धर्माधिकारी थक्क झाले. हे सगळं सांगत असताना त्यांचा स्वर ओलावला होता. ते म्हणाले मी दामू अण्णांवर अन्यायच केला. कारण त्या 500 रुपयांपैकी, त्यांचे 150 रुपये द्यायचे राहिले याची खंत त्यांच्या मनात होती.
सेवाग्राम मध्ये ग्रामोद्योगाचे शिक्षण घेत असताना स्वतःला सतत व्यग्र ठेवण्याची सवय अनंतरावांनी लावून घेतली ती त्यांना संपूर्ण आयुष्यभर उपयोगी पडली.
पतिव्रता, सौभाग्य, अबोली, एक धागा सुखाचा, सावली प्रेमाची, येडा की खुळा, धमाल बाबल्या गणप्याची, संत गजानन शेगावीचा, आहुती यासारख्या कितीतरी चित्रपटांचे संकलन अनंतरावांनी केले. त्यांना त्यांच्या पूर्ण कारकीर्दीत उत्कृष्ट संकलनाचे अवॉर्ड मिळाले ते मधुसूदन कालेलकर यांच्या मुलाने अनिल कालेलकर याने लिहिलेल्या ‘आहुती’ या चित्रपटासाठी. महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवा तर्फे 1992 साली उत्कृष्ट संकलनाचा पुरस्कार ‘आहुती’ या चित्रपटासाठी मिळाला.
अनंत धर्माधिकारी हे चित्रपटसृष्टीतील एक सहदिग्दर्शक आणि कुशल संकलक होते. तसेच ते कालेलकर यांच्या नाटक कंपनीचे व्यवस्थापक, ध्वनी संयोजक ही होते. या अनेक माध्यमातले एक अनोखे लोकप्रिय व्यक्तिमत्व आणि कालेलकर यांच्या जीवनातले एक अत्यंत खास मित्र. ते कालेलकरांचे मित्र नाही तर कालेलकर कुटुंबाचे मामा ‘अंता मामा’. अनंत धर्माधिकारी आणि कालेलकर कुटुंबीयांचे संबंध इतके जवळचे आहेत की सर्वांना असंच वाटायचे की शांताराम हे कालेलकर कुटुंबियांचे खरंच मामा आहेत. कालेलकर यांनी एखादे लिखाण केल्यानंतर ते अनंत रावांना दाखवत मग चर्चा होत असे.
दत्ता धर्माधिकारी, राजाभाऊ नेने, दत्ता केशव, कुमार सोहनी, एम. एस. अब्बास, पी. एल. संतोषी, शिबू मित्रा यांसारख्या नामवंत दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केले.
दत्ता केशव आणि अनंतराव यांनी अनेक चित्रपटांसाठी एकत्र काम केले. व्यावसायिक आयुष्यातील दिग्दर्शक – संकलकाची जोडी व्यक्तिगत आयुष्यातही जय – वीरू ची जोडी होती. सुरूवातीला काही वर्ष ते दोघेही दत्ता धर्माधिकारी यांच्याकडे एकत्र राहत होते. या जोडीला वयाच्या 75 व्या वर्षी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने चित्रकर्मी पुरस्कार देऊन गौरविले.
अनंत रावांच्या आयुष्यातील योगायोगच म्हणावा लागेल की त्यांना वयाच्या 60 व्या वर्षी उत्कृष्ट संकलनाचे व वयाच्या 75 व्या वर्षी चित्रकर्मी पुरस्काराने गौरवण्यात आले.
घरात बसून राहणे त्यांच्या स्वभावातच नव्हते. म्हणून वयाच्या 73 वर्षापर्यंत ते काम करत राहिले. त्यांचे लाखोंनी पैसे बुडाले तरी आयुष्याच्या शेवटी ते समाधानी होते. लौकिक अर्थाने जी संपत्ती म्हणजे पैसा, लक्ष्मी त्यांच्याकडे नव्हती तरी आपण बरच काही केल्याचं प्रचंड समाधान त्यांना होते.
-वसुधा पत्की.