महाराष्ट्राचे महानायक अशोक सराफ ‘अशोक मा.मा.’ च्या निमित्ताने छोटा पडदा
निवेदनातील प्रकाशमान सरस्वती अनघा मोडक
ती कुठेतरी बघून वाचतेय, तिच्या हाताजवळ कागद असणारच त्याशिवाय एवढ कसं बोलेल…. एका कार्यक्रमातील रसिकांमध्ये सुरु असलेली कुजबुज… कार्यक्रमाचा निवेदक किंवा निवेदिका म्हटल कि माईकबरोबरच भरपूर कागदांचा ढीग, प्रसंगी नकोसं वाटणार निवेदन आणि कंटाळवाणा सूर अशी प्रचिती येते. पण याला अपवाद ठरणार सध्याचं आघाडीचं नाव म्हणजेच अनघा मोडक. आजारामध्ये दृष्टी गमावल्यानंतरही जिद्दीने तीने आपले कार्य सुरूच ठेवले असून सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये निवेदनामध्ये धनश्री लेले, सुधीर गाडगीळ आणि अनेक मान्यवर निवेदकांच्या पंक्तीमध्ये आज अनघाचे नाव आदराने घेतले जाते.
डोंबिवलीमध्ये रंगलेला शब्दसूरत्रिवेणी हा कार्यक्रम. आजही हा कार्यक्रम रसिकांच्या आठवणीमध्ये आहे तो या कार्यक्रमाच्या निवेदनामुळे. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच टाळ्यांचा कडकडाट आणि दाद मिळत होती. पण विशेष म्हणजे ही दाद होती अनघाच्या निवेदनाला. एरव्ही गाण्याला दाद देणारे रसिक गाण्याबरोबरच अनघाच्या निवेदनालासुद्धा दाद देत होते. हे तर एक उदाहरण झालं, अशा अनेक कार्यक्रमांच्या आठवणी अनघाच्या निवेदनामुळे आणि तिच्या अद्वितीय वाणीमुळे रसिकांच्या स्मरणात आहेत. शांत, धीरगंभीरपणे रंगमंचावर बसणारी अनघा ज्यावेळी अभ्यासपूर्ण निवेदन करते त्यावेळी त्या कार्यक्रमाचे यश निश्चितच असते. दुर्दैवाने डेंग्यूच्या आजारामुळे तिचे डोळे तिने गमावले. मात्र त्यानंतरही तिचा प्रवास थांबला नाही. उलट एवढ्या मोठ्या संकटावर मात करत आज अनघा अधिक सक्षमपणे उभी आहे आणि अनेक तरुणांसाठी आदर्श म्हणून काम करत आहे.
२०१४ ची गोष्ट, डेंग्यूच्या तापाचे निमित्त झाले आणि या आजाराने अनघाने दृष्टी गमावली. क्षणभर अनघालासुद्धा या आजाराचा धक्का बसला, मात्र त्याने अनघा कोलमडून गेली नाही. घरातले मंडळी, नातेवाईक, मित्रमंडळी या सगळ्यांसाठी हा एक मोठा धक्का होता. आता पुढे काय होणार असा प्रश्न सगळ्यांनाच होता पण अनघा मात्र शांतपणे या सगळ्याला सामोरी गेली. खूप बाहेरच जग अनुभवलस आता जरा आतमध्ये डोकावून बघ या तिच्या गुरूंनी दिलेल्या सूचनेच पालन तिने केलं आणि तिथपासून सुरु झाला एक नवा आणि कलाटणी देणारा प्रवास. जितक्या लवकर या धक्क्यातून बाहेर येणार तितक्या लवकर पुढचा प्रवास सुकर होईल हे अनघाने ओळखल आणि तिने आपली नवी वाट निवडली. यामध्ये तिचे कलाकार मित्र, मित्र मैत्रिणी, कुटुंबिय यांचा आधारसुद्धा मोलाचा होता.
अनेक लोकांना जन्मतःच दृष्टी नसते, त्यापेक्षा आपण भरपूर नशीबवान आहोत असा सकारात्मक विचार करत अनघाने पुढची वाट पकडली. यावेळी तिला मदत झाली ती तिच्या महाविद्यालयीन आणि शालेय जीवनातील साहित्य आणि कलेच्या व्यासंगाची. त्यातूनच तिने निवेदनाची वाट धरली. आजच्या घडीला काही मोजक्या सर्वोत्कृष्ट निवेदकांमध्ये अनघाची गणना केली जाते.
रंगांची आणि भटकंतीची प्रचंड आवड अनघाला होती. कॉलेजमध्ये असतानाच बाईक चालवण, गाडीने सफर करण हा तर तिचा आवडीचा उद्योगच. मात्र दृष्टी गमावल्यानंतर हालचालींवर आलेली मर्यादा आणि थांबलेल्या इतर गोष्टी अनघाने अत्यंत सकारात्मक पद्धतीने झेलल्या. रंगमंचावर निवेदक म्हणून गेल्यावर समोरचं दिसत नसेल तरीही रसिकांची दाद त्यांच्या शब्दांमधून आणि टाळ्यांच्या आवाजातुन ऐकता येते आणि यातच स्वतःला भाग्यवान समजून अनघाने आपली वाटचाल पुढे सुरु ठेवली.
अनघाने साहित्य विषय घेऊन रुपारेल महाविद्यालयातून बीएची पदवी घेतली. पत्रकारितेचा डिप्लोमा तिने केला, त्याचबरोबर फोटोग्राफीचा डिप्लोमापण केला. त्यानंतर पुण्यातील मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालयातून तिने पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. तिने गांधर्व महाविद्यालयातून गायनाचेही शिक्षण घेतले आहेत. काही काळ विविध वृत्तपत्रांमध्येही ती कार्यरत होती. सध्या मुंबई आकाशवाणीच्या एफएम गोल्ड वाहिनीवर निवेदक म्हणून कार्यरत आहे. त्याशिवाय ती अनेक कार्यक्रमांसाठीही निवेदन करते. विविध विषयांवर व्याख्याने देते. वक्तृत्वकलेची तिला लहानपणापासूनच आवड आहे. तिला पद्यवाचनात विशेष रस आहे. ती स्वतःही कविता करते. डबिंग आर्टिस्ट म्हणूनही तिने काम केले आहे. मराठी, हिंदी, इंग्रजीसह गुजराती आणि संस्कृत भाषेचेही तिला उत्तम ज्ञान आहे. भविष्यात उर्दू, जर्मन यांसारख्या भाषांवरही प्रभुत्व मिळवण्याची तिची इच्छा आहे. यापुढे विवध विषयांवर व्याख्याने द्यायचा आणि वैविध्यपूर्ण निवेदन करण्याचा तिचा मानस आहे. आतापर्यंत तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. एकंदरीत, तरुणांना, सातत्याने अडचणींचा पाढा वाचत पळवाट काढणाऱ्यांना आणि शारीरिक व्यंगाचा बाऊ करून सहानुभूती मिळवणाऱ्या सर्वांसाठीच अनघाचे व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रेरणादायी असे आहे.
एका कार्यक्रमाच्या निमित्ताने संगीत संयोजक कमलेश भडकमकर याने अनघा हिला निवेदन करण्याची विचारणा केली. त्यावेळी अनघाने हातात कागद नसल्याने विसरले तर काय असा प्रश्न उपस्थित केला. मात्र त्यावेळी कमलेश भडकमकर यांनी अनघाला विश्वासाने निवेदन करण्याचा सल्ला दिला. स्वातंत्र्यवीर सावरकर हे अनघाचे दैवत. त्यांच्यावर आधारित कार्यक्रमाचे निवेदन करण्यासाठी सांगितल्यावर अनघाने एक महिनाभर तालीम केली आणि त्यानंतर निवेदन यशस्वीपणे केले. तेव्हापासून नियमितपणे व्याख्यानं, विविध कार्यक्रमाचे निवेदन, आकाशवाणीसाठी आरजे तसेच एबीपी माझाच्या माझा संघर्ष आणि मी या कार्यक्रमासाठी निवेदन अनघा सध्या करत आहे. तुम्ही हसत राहिलात तर दुखसुद्धा आपोआपच कमी होतात असं अनघा सांगते.
एखाद्या उंची अत्तराचा सुगंध जसा बहरत जातो तसा कार्यक्रमाच्या प्रवासामध्ये अनघाच्या निवेदनाला बहर येत आहे. प्रत्येक कार्यक्रमामध्ये लोकांसमोर काहीतरी नवीन आणि रंजक मांडण्याचा प्रयत्न अनघा करत असते. आजच्या घडीला संपूर्ण राज्यभर व्याख्याने आणि कार्यक्रमांचे सादरीकरण अनघाने केलं आहे. जवळपास ५०० व्याख्याने आणि शेकडो कार्यक्रमांसाठी आजपर्यंत तिने निवेदन केले आहे. बेंगलोर महाराष्ट्र मंडळ, आर्ट सर्कल रत्नागिरी यांसारख्या मानाच्या संस्थाचा यामध्ये सहभाग आहे. विषयाची उत्तम समज, भाषेचा गाढा अभ्यास, शांत, धीरगंभीर पण तितकाच मिश्कील स्वभाव, निर्मळ मन आणि या सगळ्यांच्या जोडीला रसाळ वाणी आणि प्रचंड मेहनत घेण्याची तयारी यामुळे अनघाच्या निवेदनाने एक वेगळीच उंची आज गाठली आहे. साधारणपणे निवेदक म्हटल की बोलताना वहावत जाण्याचा निवेदकांचा स्वभाव असतो. मात्र कुठे थांबावं आणि रसिकांना क्षणार्धात आपलसं कशाप्रकारे करून घ्यावं याची उत्तम जाण अनघाला आहे. त्यामुळे आजच्या घडीला एक यशस्वी निवेदिका म्हणून तिची ओळख आहे. याच जोडीला सावरकर, ज्ञानेश्वरी, दासबोध यांसारख्या वेगवेगळ्या विषयांवर ती व्याख्यानेसुद्धा देते. त्याचबरोबर वैविध्यपूर्ण कार्यक्रमाच्या संकल्पना डिझाईन करून त्या लोकांसमोर मांडण्याचासुद्धा तिचा प्रयत्न असतो.
आपल्या जडणघडणीत आई-वडील, पार्ले-टिळक शाळेतील आणि रूपारेल कॉलेजमधील शिक्षक आणि आणखी अनेक जणांचा मोठा सहभाग असल्याचे अनघाने नमूद केले. लहानपणी वडिलांनी शिकवलेली स्तोत्रं, पाहिलेल्या आणि ऐकलेल्या अनेक मुलाखती, तसेच मेघदूतासारखे कार्यक्रम यांमुळे सुस्पष्ट उच्चारण, उत्स्फूर्तता यांसारख्या गोष्टी अंगी बाणवल्या गेल्या असे तिने सांगितले. ‘‘तुला मोठं व्हायचं असेल तर पक्ष्यासारखी भरारी घेऊ नकोस. झाडासारखी मोठी हो. झाड उंच असल्यामुळे त्याचं आभाळाशी नातं असतंच, पण त्याची मुळं जमिनीशी जोडलेली असतात” या वडिलांनी दिलेल्या संदेशाचाही अनघा आवर्जून उल्लेख करते.
कॉलेजने घडवलं
रुपारेल महाविद्यालयामध्ये असताना तिथल्या साहित्यिक आणि सांस्कृतिक वातावरणाचा फायदा झाल्याचे अनघा सांगते. अनघातील अंगभूत गुणांना व प्रेरणांना दिशा देणारे शिक्षक लाभले. “वक्तृत्व स्पर्धेत भाग घे. फार तर काय होईल, हरशील. इतकंच ना? ‘अनुभव’ कधी हरवत नसतो.” असं राव मॅडमच्या मुखातून कुणीतरी पहिल्यांदा सांगितलं. अनघाला स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. आणि या वाक्यानेच तिला मणभर आत्मविश्वास मिळाला. त्यानंतर अनघाने सुमारे सत्तर वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि त्यातील अडसष्ट स्पर्धा जिंकल्या ! इतकंच नव्हे, तर बारावीत असताना ‘बेस्ट परफॉरमर ऑफ द इयर’ हा किताबही अनघाला मिळाला. चित्रांची प्रदर्शने पाहताना त्यात नेमकं काय पहायचं, सिनेमाचा-गाण्यांचा आस्वाद कसा घ्यायचा, ही दृष्टी कोल्हे व गोडबोले सरांनी दिली. थोडक्यात काय, तर अनघाचं खऱ्या अर्थाने बौद्धिक पालनपोषण करणारं सगळं काही त्या रुपारेल कॉलेजच्या वास्तूत होतं. त्याच काळात आणखी एक घटना घडली आणि त्यामुळे अनघाच्या करिअरला एक कलाटणी मिळाली. एका कार्यक्रमात आयत्या वेळी अनघाला निवेदन करण्याची जबाबदारी येऊन पडली, आणि अनघाने ती इतकी उत्तम निभावली की त्याच कार्यक्रमात उपस्थित असलेल्या संगीतकार कौशल इनामदार यांनी अनघाचं प्रचंड कौतुक केलं. आपण उत्तम निवेदन करू शकतो हा आत्मविश्वास तिथेच अनघाला प्राप्त झाला.
त्यावेळी रुपारेलमध्ये गाण्याचे वेगवेगळे कार्यक्रम सादर व्हायचे. त्यासाठी तबल्यावर प्रसाद पाध्ये, बासरीवर वरद कठापूरकर, किबोर्डसाठी सागर साठे यांसारखे दिग्गज कलाकार असायचे. त्यावेळी कार्यक्रमांमध्ये आयत्यावेळी होणारे गाण्यांचे बदल, लिस्टमध्ये होणारे बदल यामुळे निवेदनामध्ये कराव्या लागणाऱ्या कसरतीची सवय झाली आणि त्यातूनच आज निवेदनामध्ये अडचण येत नसल्याचे अनघा सांगते.
संपूर्ण निवेदन तोंडपाठ
तीन तासाच्या गाण्याच्या कार्यक्रमाचे निवेदन असो किंवा एखाद्या व्याख्यानाचा विषय असो. याचे निवेदन रेकॉर्डरच्या मदतीने अनघा मुखोग्द्त करते. अगदी सहजतेने कार्यक्रमाच्या वेळी लोकांसमोर निवेदन करत असताना निवेदनामध्ये वेगळेपणा अनघाने जतन केला आहे. मात्र त्यामागे असते अनेक दिवसांची मेहनत, एखाद्या कार्यक्रमाचे निवेदन करण्यासाठी अनघा जवळपास महिन्याभराचा अवधी घेते. त्यानंतर माहिती संकलनासाठी मदत घेतल्यानंतर ती स्वतःची स्वतंत्र स्क्रिप्ट तयार करते, त्याचे पाठांतर करत असताना त्यामध्ये बदल करते आणि या सगळ्यातून तज्ञ मंडळींशी चर्चा करून त्यानंतर कार्यक्रमामध्ये अंतिम निवेदन लोकांसमोर मांडते. अर्थात यामध्येसुद्धा उस्फुर्त सुचणाऱ्या कितीतरी गोष्टींचा समावेश निवेदनामध्ये असतोच हे विशेष. खास बाब म्हणजे एकाच संकल्पनेचे निवेदन दुसऱ्यांदा करायचे असले तरीही संपूर्ण स्क्रिप्ट पुन्हा एकदा तयार केली जाते. त्यामध्ये आवश्यक ते बदल करून प्रत्येकवेळी रसिकांना काहीतरी नवीन ऐकायला मिळाव हा अनघाचा प्रांजळ प्रयत्न असतो. यासाठी अनघाचे मित्र मैत्रिणी तिला माहितीचे संकलन करण्यास मदत करतात. याशिवाय प्रचंड वाचन याआधी केल्याने त्याचबरोबर वेगवेगळ्या निवेदकांचे विचार आणि गाण्यांचे वेगवेगळे कार्यक्रम ऐकल्याने अनघाने माहितीचा अमृतसंचय जमवला आहे. तंत्रज्ञान विकसित होत असल्याने त्याच्या मदतीने हा अनघाचा प्रवास सुरु आहे.
थांबण हा पर्याय नाही
एखाद शिखर गाठताना आपण ते शिखर सर केल्याशिवाय कधीच थांबत नाही. त्याचप्रमाणे आयुष्याच्या वाटेवर प्रवास करत असताना वळणवाटा या येणारच, त्यावेळी मात्र थांबणे हा पर्याय नसून नेहमी आपला प्रवास सुरूच राहिला पाहिजे असं अनघा सांगते. या प्रवासामध्ये आपल्यामागे अनंत हातांचे, आपल्या हितचिंतकांचे बळ असते. त्यामुळे त्या आधारावर नेहमी मार्गस्थ व्हायला पाहिजे असा विचार अनघा मांडते. शोभा कुंटे, शशिकुमार लेले, नेहा खरे, सोनाली गोखले, मीनल मोहाडीकर, सहकलाकार निरंजन लेले, प्रसाद पाध्ये, केतकी भावे जोशी यांसारख्या अनेकांचे सहकार्य मिळाल्याचे अनघा सांगते. माझ्यासाठी अनेक जण माझे डोळे होऊन मदत करत आहेत. त्या सर्वांच्या मदतीने माझा प्रवास पुढे सुरु असल्याचे अनघा सांगते. आत्तापर्यंत अनघाला तिच्या संपूर्ण वाटचालीसाठी वेगवेगळ्या पुरस्कारांनीसुद्धा सन्मानित करण्यात आल आहे . NAB चा राज्यस्तरीय पुरस्कार, पु ल देशपांडे युवा पुरस्कार यांसारख्या अनेक मोठ्या पुरस्कारांचा यामध्ये समावेश आहे.
अनघाचा असा हा निवेदनाचा प्रवास सुरूच आहे. काहीतरी वेगळं करून दाखवण्याची जिद्द असल्यावर यश हे नक्की मिळतच.नवनवीन संकल्पना आणि कार्यक्रम आपल्याला तिच्या माध्यमातून अनुभवायला मिळत राहतीलच यात शंका नाही. तिच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
– आदित्य बिवलकर