… आणि अक्षयला मिळालं ‘कुमार’ हे आडनाव
ही, मायानगरी मोठी अजब आहे. फूटपाथवरच्या पोराला स्टार बनवते तर तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या ’स्टारसन’ ला यशापासून कस दूर ठेवते. ऐंशीच्या दशकात प्रस्थापित कलाकारांच्या मुलांचे रूपेरी पडद्यावर आगमन वाढले. यात एक होता ज्युबिलीकुमार म्हणून ज्यांचा उल्लेख होतो त्या राजेंद्रकुमारचा मुलगा ’कुमार गौरव’. मुलगा एकवीस वर्षाचा झाला की, पित्याने त्याच्यासाठी सिनेमाची तयारी सुरू केली. तो प्रेमकथांचा संगीतमय सिनेमांचा दौर असल्याने तशीच कहाणी निवडली. सुलक्षणा पंडीतची धाकटी बहीण विजेता पंडीतला त्याची नायिका म्हणून निवडलं. संगीत आर डी बर्मन तर त्याच्यासाठी पार्श्वगायक म्हणून अमितकुमार! (Akshay Kumar)
कश्मिरच्या नयनरम्य लोकेशन्सवर ही प्रेमकहाणी फुलविण्यासाठी दिग्दर्शक राहुल रवैल यांना पाचारण केले.’याद आरही है तेरी याद आरही है’, ’देखो मैने देखा है एक सपना’,’कैसा तेरा प्यार कैसा गुस्सा है तेरा’ ही गाणी सिनेमा प्रदर्शित व्हायच्या आधीच लोकप्रिय ठरली. २० फेब्रुवारी १९८१ रोजी मेट्रोच्या आलिशान पडद्यावर ’लव्ह स्टोरी’ झळकली आणि सुपर हिट ठरली. गंमत म्हणजे दिग्दर्शकाशी मतभेद झाल्याने राजेंद्रकुमारने श्रेय नामावलीत कुणाचेच नाव टाकले नव्हते.(Akshay Kumar)
’अ न्यू सुपरस्टार इज बॉर्न’ अशी आवई पिटली गेली आणि कुमार गौरवच्या सिनेमांची रांग लागली. तेरी कसम, स्टार, रोमान्स, लव्हर्स, हम है लाजवाब, ऑल राऊंडर… ओळीने सर्व फ्लॉप होत गेले. दणकट नायकांचा तो जमाना होता त्यात या बच्चूचा निभाव लागणार कसा? त्यात अभिनयाच्या नावाने बोंबाबोंब मग केवळ सुंदर सुंदर नायिका आणि गोड गोड गाणी किती दिवस तारणार ? १९८५ साली भारतात दूरदर्शन स्थिर स्थावर झाल्यावर देशातील पहिली टेलीफिल्म महेश भट ने बनवली ’जनम’ त्याचा नायक होता कुमार गौरव. पित्याने पुन्हा एकदा मुलासाठी प्रयत्न करायचे ठरवले. १९८६ साली ’नाम’ हा सिनेमा बनवला. (Akshay Kumar)
दिग्दर्शक म्हणून भट साहेब आले, सिनेमा सुपर हिट ठरला पण त्याचा फायदा संजय दत्तला झाला! अपयश त्याची पाठ सोडायला तयार नव्हते. ज्यांचे सिनेमे चालतात अशा नायिंका सोबत त्याची जोडी बनवून पाहिली. जूही चावला (गूंज), हाय मेरी जान (आयेशा जुल्का), इंद्रजित (नीलम) अगदी अखेरचा प्रयत्न म्हणजे भरमसाठ मानधन देवून माधुरी दिक्षितला त्याची नायिका बनवले ’फूल’(१९९४) मध्ये.
परंतू परिणाम शून्य. राजेंद्रकुमार गेल्यावर त्याने सिनेमाचा नाद सोडून दिला व कंस्ट्रक्शन लाईनमध्ये घुसला. पुढे बर्याच वर्षांनी तो मजहर खान यांच्या ’गॅंग’ आणि संजय गुप्ता यांच्या ’कॉंटे’ मध्ये दिसला. त्याच्या रूपेरी इमेजहून वेगळ्या लूकमध्ये तो होता. २००४ साली ’गयाना १८३८ द अरायव्हल’ या अमेरीकन सिनेमात तो चमकला. त्यातील अभिनय सराहनीय होता. पण पुढे काहीच नाही. आज त्याची आठवण झालीच तर सुनील दत्तचा जावई किंवा संजय दत्तचा मेव्हणा एवढीच राहीली आहे. मध्यंतरी त्याच्या मुलीने कमल अमरोहीच्या नातवासोबत लग्न केल्याची बातमी आली आणि पुन्हा एकदा त्याची आठवण झाली! (Akshay Kumar)
==========
हे देखील वाचा : किशोर कुमारच्या गाण्यांना आकाशवाणी, दूरदर्शनवर बंदी ?
==========
आजच्या पिढीला तर कुमार गौरव कोण हे माहीत असणे शक्यच नाही. पण आजच्या पिढीचा सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) मात्र एकेकाळी कुमार गौरवचा प्रचंड मोठा फॅन होता! अक्षय कुमारचे खरे नाव राजीव भाटीया. त्याला बॉलीवूडमध्ये यायचेच होते. कुमार गौरव हा त्याच्या दृष्टीने आयडॉल होता. महेश भट यांच्या ‘आज’ या चित्रपटात कुमार गौरव नायक होता. तिथे मार्शल आर्ट टीचर म्हणून काही सेकंदाची भूमिका अक्षय कुमारने केली होती. तिथेच त्याची कुमार गौरवची पहिल्यांदा भेट झाली. कुमार गौरव मुळे तो इतका प्रभावित झाला की त्याने त्याचे नाव बदलून अक्षय कुमार करून घेतले! कारण त्याला वाटले ‘कुमार’ हा शब्द जर आपल्या नावात आला तर आपण यशस्वी होऊ! कुमार गौरव काही यशस्वी झाला नाही पण अक्षय कुमार मात्र सुपरस्टार झाला. नसीब अपना अपना!