Nilu Phule : हॉलिवूड चित्रपटांची आवड ते लोकनाट्य, निळू फुलेंच्या

….आणि नवकेतन फिल्म्स हे बॅनर पुन्हा उभे राहिले!
कधी कधी एखाद्या फ्लॉप सिनेमाच्यानंतर ती चित्रपट संस्था बंद पडते की काय अशी शंका व्यक्त होते पण कधी कधी ही इष्टापत्ती असते. किंबहुना बाउन्स बॅक व्हावे म्हणून हे अपयश येतं असावं. या अपयशातून चित्र संस्था पुन्हा उभारी घेते आणि पुन्हा नव्या जोमात चित्रपटाची निर्मिती सुरू होते. असाच काहीसा प्रकार अभिनेता देवआनंद (Dev anand) यांच्या ‘नवकेतन’ या चित्र संस्थेच्या बाबत एकदा घडला होता. देवच्या चाहत्यांसाठी हा किस्सा खूप महत्त्वाचा आहे इंटरेस्टिंग आहे.

देव आनंद (Dev anand) यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन करायला १९७० सालच्या ‘प्रेम पुजारी’पासून सुरुवात केली. या चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही. त्यानंतर त्याने आपला पुढचा चित्रपट ‘तेरे मेरे सपने’ हा विजय आनंदकडे सोपवला. हा चित्रपट खरंतर चांगला सिनेमा असून देखील चालला नाही. यानंतर मात्र पुन्हा देवने पुढच्या सिनेमाच्या दिग्दर्शनाची सूत्रे आपल्या हातात घेतली. चित्रपट होता ‘हरे रामा हरे कृष्णा’. सुपर हिट सिनेमा.
नवकेतन चा पुढचा सिनेमा छुपा रुस्तुम (विजय आनंद) शरीफ बदमाश (राज खोसला) आणि हिरा पन्ना (देव आनंद) (Dev anand) हे तीनही सिनेमे बॉक्स ऑफिसवर फार काही टिकू शकले नाही. त्यानंतर १९७४ साली देवने ‘इश्क इश्क इश्क’ हा चित्रपट दिग्दर्शित करायचे ठरवले. या चित्रपटाचे सर्व शूटिंग नेपाळ, हिमाचल प्रदेश ,लडाख येथे होणार होते. या सिनेमांमध्ये माउंट एवरेस्टचे देखील दर्शन घडते. देवला पहाडी एरिया खूप आवडत असे. त्यामुळे त्याची स्टोरी लाईन नेहमी त्याच एरियात फिरत असे.

या चित्रपटांमध्ये देवने यांनी अनेक नवीन कलाकारांना घेतले होते. त्या अर्थाने हा अनेक कलाकारांचा पहिला चित्रपट होता. अभिनेत्री शबाना आजमी हिचा हा पहिला कमर्शियल सिनेमा होता. त्याचप्रमाणे राकेश पांडे, शेखर कपूर, कबीर बेदी, पद्मिनी कोल्हापुरे यांचा देखील हा त्या अर्थाने पहिला मोठा चित्रपट होता. या चित्रपटाची गाणी आनंद बक्षी यांनी दिली होती. तर संगीत आर डी बर्मन यांचे होते. सिनेमात सर्व काही व्यवस्थित ठीकठाक झाले होते. पण मात्र चित्रपट सुपरफ्लॉप झाला. इतका की आधीचे तीन सिनेमे बरे असे म्हणायची वेळ आली. लागोपाठ चार फिल्म्स फ्लॉप !

या अपयशानंतर नवकेतन फिल्म्स हे बॅनर बंद करावे की काय असा दुष्ट विचार देव आनंदच्या डोक्यात येऊ लागला. कारण या चित्रपटांमध्ये त्याचे खूप पैसे वाया गेले होते. पण देवचे दोन भाऊ चेतन आनंद आणि विजय आनंद या तिघांनी मीटिंग घेऊन असे सांगितले की आपल्या बॅनरला आता पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. (१९५०-१९७५) आपण हे बॅनर बंद न करता पुन्हा नव्या जोमाने कामाला लागू आणि पुन्हा एकदा या बॅनरला यश शिखरावर नेऊन पोहोचवू. आपल्या दोन्ही भावांच्या या आश्वासक सल्ल्याने देवला पुन्हा हुरूप आला.
=======
हे देखील वाचा : मुकेशने गायलेले गाणे पुन्हा रफीच्या आवाजात रेकॉर्ड केले!
=======
‘इश्क इश्क इश्क’ या चित्रपटाच्या अपयशाने मनात आलेल्या शंकेचे जळमट एका क्षणात दूर झाले आणि तिथेच देव आनंदने नवकेतनच्या तीन चित्रपटांची घोषणा एकत्र केली. हे तिन्ही चित्रपट तीन भाऊ दिग्दर्शित करणार होते. विशेष म्हणजे या तिन्ही चित्रपटाची सुरुवात एकाच वेळी होणार होती. तिने चित्रपटांचे दिग्दर्शन वेगळेवेगळे असणार होते त्याचप्रमाणे संपूर्ण प्रोडक्शन क्रू हे वेगळे असणार होते. वेगळे संगीतकार, वेगळे छायाचित्रकार सर्वच स्वतंत्र! अशा पद्धतीने चेतन आनंद यांनी ‘जानेमन’ , विजय आनंद यांनी ‘बुलेट’, आणि देव आनंद (Dev anand) यांनी ‘देस परदेस’ हा चित्रपट दिग्दर्शित करायचे ठरवले.
‘जानेमन’ला संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे होते तर ‘बुलेट’ आर डी बर्मन यांनी स्वरबध्द केला होतां. ‘देस परदेस‘ला राजेश रोशमचे संगीत होते. तीनही सिनेमाचा नायक देव आनंद होता पण नायिका मात्र वेगवेगळ्या होत्या. हेमा मालिनी, परवीन बाबी आणि टीना मुनीम. इश्क इश्क हा चित्रपट फ्लॉप झाला परंतु जानेमन, बुलेट आणि देश परदेश ही तीनही चित्रपट हिट झाले. एका अपयशी चित्रपटानंतर बाउंसबॅक होऊन नवकेतन बॅनर पुन्हा एकदा यशस्वी ठरले.