गोष्ट ’अंगूर’ च्या लागवडीची…!
अयशस्वी झालेल्या सिनेमाचा रिमेक करण्याचं धाडस कुणी सहसा करत नाही. पण कलाकृती जर अभिजात असेल आणि सादरीकरणात जर काही तृटी राहिल्या असतील तर पुन्हा नव्याने पूर्वीच्या चुका टाळून त्यावर सिनेमा बनू शकतो व यशस्वीपण होवू शकतो. पण त्या साठी गुलजार सारखा सिध्दहस्त कलावंत तिथे असावा लागतो. गुलजार यांच्या ’अंगूर’ (१९८२) या सिनेमाच्या निर्मितीचा किस्सा मनोरंजक आहे. हा सिनेमा जगविख्यात नाटककार विल्यम शेक्सपीअर यांच्या ’कॉमेडी ऑफ एरर्स’ या अभिजात कलाकृतीवर आधारीत होता. या कथानकावर १९६८ साली बिमल रॉय प्रॉडक्शन या बॅनर तर्फे ’दो दुनी चार’ हा सिनेमा देबू सेन यांनी बनविला होता. या सिनेमात किशोर कुमार आणि असित सेन यांचा डबल रोल होता. गुलजार यांनी या सिनेमाची पटकथा व गाणी लिहिली होती. ’हवाऒंपे लिखदो हवाऒंके नाम’ हे किशोरने गायलेलं अप्रतिम गाणं यात होतं (संगीत हेमंत कुमार). पण सिनेमा कधी आला व कधी गेला हे कळलचं नाही. गुलजार यांना खूप हळहळ वाटली. पण हा विषय त्यांनी डोक्यात ठेवला व वेळ आली की या विषयावर सिनेमा बनविण्याचं मनोमन ठरवलं. त्यांनी १९७१ सालच्या ’मेरे अपने’ पासून दिग्दर्शनाचा प्रारंभ केला. सत्तरच्या दशकाच्या अखेरीस आलेल्या ’किताब’ व ’मीरा’ या दोन्ही सिनेमांना फारसं यश मिळालं नाही. त्यांनी आता काही तरी हटके करण्याचा निर्धार केला. डोक्यात शेक्सपीअर होताच. बंगाली भाषेत याच कथानकावर १९६३ साली ’भ्रांतीबिलास’ हा चित्रपट आला होता जो मनू सेन यांनी बनविला होता व उत्तम कुमार आणि भानु बॅनर्जी यांनी यात काम केले होते. ह्या सिनेमालादेखील फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
गुलजार यांनी या सर्वांचा अभ्यास करून एक उत्तम कथा पटकथा नव्याने लिहिली. विनोदी सिनेमाची पटकथा कशी असावी याचा आदर्श वस्तुपाठ तयार केला. संजीव कुमार व देवन वर्मा यांना प्रमुख भूमिकेत घेतले. सोबतीला मौसमी, दिप्ती व अरूणा इराणी होत्या. पंचमचे संगीत होते. सिनेमा प्रदर्शित झाला व हळूहळू लोकांना आवडू लागला. बघता बघता सुपर हिट झाला. देवन वर्मा ला फिल्म फेअर पुरस्कार मिळाला. सर्व करिष्मा गुलजार यांचा होता.
फ्लॉप चा शिक्का बसलेल्या एका अभिजात कलाकृतीचं सोनं झालं होतं! याच सिनेमातील दीप्ती नवल यांच्यावर चित्रित एक अप्रतिम गाणे पहा.
(गाण्याची लिंक यु ट्यूब च्या सौजन्याने)