Taath Kana Movie Trailer: जिद्द आणि संघर्षाची उत्कंठावर्धक कथा दाखवणाऱ्या

Angry Young Men : सलीम -जावेद
सुपरस्टार राजेश खन्ना करीता १९७० हे वर्ष फार लकी ठरलं. त्याच्या तब्बल सात सिनेमांनी रौप्यमहोत्सवी यश मिळविलं होतं. याच वर्षी दाक्षिणात्य निर्माते चिन्नपा देवर राजेशकडे आले व त्यांच्या तमिळ मध्ये लिहिलेल्या एका कथेवर हिंदीत सिनेमा बनविण्याचा मनोदय बोलून दाखवला. या कथेवर तमिळ भाषेत एक सिनेमा देखील बनला होता पण त्याला फारसे यश निळाले नाही.राजेशने ती कथा पाहिली पण या कथेची उत्तम पटकथा आणि संवाद लिहिले तरच सिनेमाला यश मिळू शकेल असे सांगितले.दाक्षिणात्य पटकथाकार वापरण्याच्या ऐवजी त्याने इथेच चाचपणी सुरू केली. त्या कथानकाला बंदीस्त अशी पटकथा हवी होती.देवर साहेब लागेल तेवढा पैसा ओतायला तयार होते.

राजेशने सलीम खान आणि जावेद अख्तर यांना संधी द्यायचे ठरवले.त्या दोघांना बोलावून त्याने पटकथेसाठी चक्क दहा हजार द्यायचे कबूल केले.या दोघांसाठी हि फार मोठी रक्कम होती कारण ते दोघेही त्या वेळी सात आठशे रूपये महिन्याला कमवत होते.अशा प्रकारे हिंदी सिनेमाच्या इतिहासात कथा – पटकथा आणि संवाद लिहिणार्याला ग्लॅमर मिळवून देणार्या ’सलीम जावेद’ या जोडीची उदय झाला.हा चित्रपट होता ’हाथी मेरे साथी’.या सिनेमाच्या नंतर पुढची पंधरा वर्षे या जोडीने तब्बल २१ सुपरहिट सिनेमे दिले.अमिताभ बच्चन यांची ’अॅंग्री यंग मॅन’हि इमेज बनविण्यात या जोडीचा मोठा हात होता.
हि जोडी जमायच्या आधी दोघेही मायानगरीत आपले नशीब आजमावयाला आले होते.सलीम खानला नायक व्हायचे होते त्या करीता ते इंदोरहून इकडे आले.महिन्या काठी चारशे रूपये मिळवत त्यांचा संघर्ष सुरू झाला याच काळात त्यांना एक मराठी मुलगी आवडली तिचं नाव सुशिला चरक.दोघांनी १९६४ मध्ये लग्न केले.लग्नानंतर ती सलमा खान बनली.सलीमला छोट्या भूमिका मिळत होत्या पण यश कायम हुलकावणी देत होतं.तिसरी मंझील,दिवाना या गाजलेल्या सिनेमात सलीम होता. अभिनयाची नशा आता उतरत चालली होती.सलीमने मग अब्रार अल्वी सोबत काम सुरू केले. दुसरी कडे जावेद अख्तर देखील त्याचकाळात मुंबईत संघर्ष करीत होता.
================================
हे देखील वाचा : अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!
================================
वस्तुत: त्याचे वडील जांनिसार अख्तर त्या वेळी हिंदी सिनेमाच्या दुनियेत गीतकार म्हणून कार्यरत होतेच पण त्यांनाही त्यांच्या प्रतिभेला साजेल असे यश मिळत नव्हते.१९६६ साली ‘सरहदी लूटेरा’ या सिनेमाच्या वेळी सलीम जावेद यांची पहिली गाठ पडली.सलीम या सिनेमात काम करीत होता तर जावेद चक्क क्लॅपर बॉय होता.पण पुढे याच सिनेमाचे संवाद लिहायला दिग्दर्शक एस एम सागर यांनी त्याला काम दिले.जावेद नंतर कैफी आजमी सोबत लिहिण्याचे काम करू लागला.जावेदने धरम -शर्मिलाच्या ’यकीन’ची पटकथा लिहिली होती. कैफी आणि अब्रार शेजारी शेजारी रहात होते व परस्परांचे चांगले मित्रही होते.साहजिकच सलीम आणि जावेद यांच्याच्या भेटी वाढू लागल्या व मैत्री देखील! एकेकटे दोघेही कायम अपयशी ठरत होते.
राजेशने या दोघांना एकत्र आणल्याने सिने वर्तुळातील मान्यवरांच्या नजरा यांच्या कडे वळाल्या.रमेश सिप्पी यांनी त्यांना ’अंदाज’(१९७१) करीता, अशोककुमारने ’अधिकार’(१९७१) करीता पाचारण केले.अमिताभच्या ’अॅंग्री यंग मॅन’ या इमेजचा पहिला चित्रपट ’जंजीर’ या जोडीनेच लिहिला होता. अमिताभला यातील प्रमुख भूमिका मिळवून देण्यात देखील यांचा वाटा होता.त्या काळात कथा पटकथाकाराला फारशी किंमत नसे.पोस्टरवर तर त्यांच नावही नसे.

सिनेमाच्या या महत्वपूर्ण पण दुर्लक्षित राहिलेल्या घटकाला पहिल्यांदा प्रतिष्टा व सन्मान या जोडीने मिळवून दिला.’जंजीर’च्या यशाने सारे गणितच बदलले.दोघांच्या कामाच्या विभागणीत देखील तारतम्य होतं.सलीम कथानकावर जास्त लक्ष द्यायचा तर जावेद त्या कथेची पटकथा बनविण्यात अग्रेसर असायचा.संवाद मात्र दोघे मिळून लिहित असत. सत्तरच्या दशकातील मातब्बरा सोबत त्यांनी काम केले व ओळीने सर्व सिनेमे सुपर हिट करून दाखविले. यादों की बारात (नासिर हुसैन),रमेश सिप्पी (अंदाज,सीता और गीता,शोले, शान,शक्ती) रवि टंडन (मजबूर) प्रकाश मेहरा (जंजीर,हाथ की सफाई) यश जोहर (दोस्ताना) यश चोप्रा ( दिवार,त्रिशूल,काला पत्थर) मनोजकुमार (क्रांती) शेखर कपूर (मि इंडीया) चंद्रा बारोट (डॉन) मममोहन देसाई (चाचा भतीजा) दोन तमिळ आणि दोन कन्नड सिनेमाच्या पटकथा देखील यांनी लिहिल्या.
यांचा यशाचा झंझावात एवढा प्रचंड होता की वितरक देखील या जोडीचे सिनेमे चढ्या भावाने उचलायचे. ‘जंजीर’,’दिवार’आणि ‘शक्ती’ सिनेमाकरीता त्यांना फिल्मफेयर पुरस्कार मिळाले. यांच्या सिनेमातील संवादाला अफाट लोकप्रियता मिळाली. मग ते ‘शोले’ मधील अरे ओ सांबा असो की दिवार चे ’आज खुश तो बहोत होगे तुम’ असो.’शोले’च्या डॉयलॉगच्या स्वतंत्र ध्वनीमुद्रीका निघाल्या होत्या.मल्टी स्टारर सिनेमात देखील त्यांच्या पटकथेचा बंदीस्तपणा जाणवायचा.आखरी दाव(१९७५) आणि इमान धरम (१९७७) या त्यांच्या दोनच सिनेमाला व्यावसायिक यश नाही मिळालं.
सारं काही सुरळीत चाललेलं असताना १९८१ सालापासून यांच्या नात्यात कटूता यायला सुरूवात झाली.हातातील प्रोजेक्ट संपवून ऐंशीच्या मध्यावर ते विभक्त झाले. त्यांच्यातील कटूतेची निरनिराळी कारणं आजही सांगितली जातात. दोघांचाही इगो हे एक कारण नक्की होतं. काय गंमत असते पहा अमिताभच्या उदयाच्या काळात या जोडीची सुरूवात झाली आणि १९८५ साली अमिताभ ने काही वर्षा साठी सिनेमातून सुटी घेतली नेमकी त्याच काळात या जोडीत वितुष्ट आले.पण रमेश तलवार यांचा ’जमाना’ व बोनी कपूरचा ’मि.इंडीया’ हे सिनेमे आधीच साईन केल्याने ते त्यांनी एकत्रित पूर्ण केले. हि जोडी फुटल्याने सिनेमाचे नुकसानच झाले.
================================
हे देखील वाचा : Rakesh Roshan: पित्याच्या गाण्याच्या चालीतून बनवले ‘हे’ सुपर हिट गीत!
================================
२०१३ साली १९७३ च्या जंजीरचा रिमेक आल्यावर या दोघांनी एकत्र येवून कॉपी राईटच्या प्रश्नावरून न्यायालयीन लढाई लढली. स्वतंत्र झाल्यावर जावेदने गीतकार म्हणून आपली नवी खेळी सुरू केली.’सिलसिला’ हा त्याचा गीतकार म्हणून पहिला चित्रपट. आजवर जवळपास १२५ सिनेमाकरीता त्यांनी गाणी लिहिली आहेत.१९८४ साली त्याने पहिली पत्नी हनी इराणीला तलाक देवून शबाना आजमी सोबत लग्न केले.हनी पासून झालेले फरहान अख्तर व झोया अख्तर आज बॉलीवूड मध्ये मोठे प्रस्थापित दिग्दर्शक आहेत.सलीमने आपला मूळचा लेखकाचा पेशा सोडला नाही.१९८९ साली त्याचा मुलगा सलमान खान ’मैने प्यार किया’ पासून सिनेमात आला.त्याच्या दुसर्या हिट ’पत्थर और फूल’च्या निर्मितीत सलीम होता.सलमानच्या पाठोपाठ त्याचे दोन भाऊ सोहेल,अरबाज हे देखील सिनेमात आले.१९८१ साली सलीमने हेलन सोबत लग्न केले.त्याची दोन्ही लग्ने अजून टिकून आहेत. सलीम-जावेद या जोडीवर मध्यंतरी ’अॅंग्री यंग मेन हि वेब सिरीज येऊन गेली.