वाढदिवस स्पेशल : टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अंकिता लोखंडेचा अभिनय प्रवास
हिंदी टेलिव्हिजन जगतातील अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून अंकिता लोखंडेला ओळखले जाते. अंकिताने तिच्या पहिल्या ‘पवित्र रिश्ता’ या हिंदी मालिकेतून अफाट लोकप्रियता मिळवली. या मालिकेनंतर एका रात्रीत अंकिता घराघरात लोकप्रिय झाली. आज हीच अंकिता तिचा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने जाणून घेऊया तिच्या संपूर्ण प्रवासाबद्दल.
१९ डिसेंबर १९८४ रोजी इंदूरमधील एका मराठी मध्यमवयीन कुटुंबात अंकिताचा जन्म झाला. लहानपणापासून अंकिताला अभिनेत्री व्हायचे होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अंकिता तिचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुंबईत आली आणि तिचा अभिनय प्रवास सुरु झाला. या क्षेत्रात येण्यासाठी, काम मिळवण्यासाठी आणि यश कमवण्यासाठी तिला खूप मेहनत घ्यावी लागली.
अंकिता लोखंडे हे तिचे खरे नाव नसून, तिचे खरे नाव तनुजा लोखंडे असे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मनोरंजन विश्वात पदार्पण करण्यापूर्वी अंकिताने तिचे नाव बदलले होते. अंकिता हे नाव तिचे कुटुंबीय तिला हाक मारण्यासाठी वापरायचे. मग तिने हेच नाव वापरण्याचे ठरवले. तिने तिच्या तनुजा या खऱ्या नावाऐवजी अंकिता या नावाने मनोरंजन विश्वात येण्याचा निर्णय घेतला होता.
२००५ मध्ये अंकिता मुंबईत आली. तिने मॉडेलिंग करायला सुरुवात केली आणि सोबतच अनेक ऑडिशन देखील द्यायला लागली. अंकिता लोखंडेला ‘बाली उमर को सलाम’ या शोमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. मात्र, तिचा हा शो कधीच प्रसारित झाला नाही. पुढे तिचा संघर्ष चालूच राहिला. अखेर तिच्या मेहनतीला यश आले आणि अंकिताला एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’मध्ये काम मिळाले. यामध्ये तिने अर्चनाची भूमिका साकारली. हा शो आणि तिची भूमिका अमाप गाजली. आजही तिला अनेक लोकं अर्चना म्हणूनच ओळखतात. अंकिताने अनेक वर्षे टीव्हीवर काम केले. किंबहुना आजही ती टीव्हीवर विविध शोमधून काम करताना दिसते.
अंकिताने अनेकवेळा मुलाखतींमध्ये तिच्या संघर्षाबद्दल सांगितले आहे. एका मुलाखतीमध्ये तिने सांगितले होते की, जेव्हा ती करिअर करण्यासाठी मुंबईत आली तेव्हा सुरुवातीला तिला फक्त ७५ ते १०० रुपये मिळायचे. महिन्याला ती केवळ पाच हजार रुपये कमवायची. या पैशाचा वापर ती तिच्या घराचे भाडे देण्यासाठी आणि स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी करायची. संघर्षाच्या काळात ती अनेकवेळा दोन वडापाव खाऊन रात्र काढायची.
२००९ हे वर्ष अंकिताला खूपच चांगले ठरले यावर्षी आलेल्या पवित्र रिश्ता या मालिकेने तिला मोठे यश, प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळून दिली. यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. आज अंकिता लोखंडे टीव्ही शोमध्ये एका एपिसोडसाठी लाखो रुपये घेते. एका माहितीनुसार अंकिताने ‘बिग बॉस १७’ मध्ये सहभागी होण्यासाठी दर आठवड्याला १२ लाख रुपये घेतले होते.
अंकिता पवित्र रिश्ता या शोमध्ये काम करताना ती आणि तिचा सहकलाकार असलेल्या सुशांत सिंग राजपूत दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. सुशांतने झलक दिखला जा या शोमध्ये टीव्हीवर सर्व जगासमोर तिला प्रपोज देखील केले होते. मात्र काही काळाने त्यांचे अनेक वर्षांचे नाते तुटले. त्यानंतर अंकिता काही काळ खूप दुखी होती. सुशांतने आत्महत्या केल्यानंतरही अंकिताला मोठा धक्का बसला होता. मात्र पुढे काही काळाने तिने स्वतःला सावरले.
२०२१ साली अंकिताने अंकिता लोखंडेने डिसेंबर २०२१ मध्ये बिझनेसमन विकी जैनसोबत लग्न केले. एका माहितीनुसार, अंकिता पती विकी जैनसोबत मुंबईत एका आलिशान ८ BHK घरात राहते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विकीने मालदीवमधील एक खाजगी व्हिला देखील अंकिताला गिफ्ट म्हणून दिला आहे, ज्याची किंमत ५० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
अंकिता २५ कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालक आहे, अंकिता लोखंडेने तिचा पती असणाऱ्या विकीला ८ कोटी रुपये किमतीची खाजगी यॉच भेट दिल्याचे बोलले जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एकट्या अंकिता लोखंडेची एकूण संपत्ती २५ कोटी रुपये आहे. याशिवाय तिचा पती विकी जैन हे ‘महावीर इन्स्पायर ग्रुप’ या मल्टीनॅशनल कंपनीचा मालक आहे. विकी जैनच्या कोशळाच्या खाणी देखील आहेत. अंकिताने ‘मणिकर्णिका’ या बॉलिवूड चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. या चित्रपटात ती कंगना रनौतसोबत दिसली होती. कंगनाच्या या चित्रपटानंतर ती ‘बागी ३’मध्ये झळकली होती.