
Ashok Saraf : ख्रिसमसची प्रेक्षकांना खास भेट! ‘कुरळे ब्रदर्स’ नव्या वर्षात ‘या’ दिवशी येणार भेटीला
नाताळ म्हणजे आनंद, भेटवस्तू आणि हसू… आणि याच नाताळच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त हास्याची भेट समोर आली आहे! प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ‘कुरळे ब्रदर्स’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाल करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचं नवं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर झळकलं आहे.
पोस्टर पाहाताच एक गोष्ट स्पष्ट होते ती, या वेळी गोंधळ डबल आहे… आणि धमालही डबल! साध्या परिस्थितीतून मोठा गोंधळ निर्माण करणारी ‘साडे माडे तीन’ची ओळख या नव्या पोस्टरमधूनही ठळकपणे जाणवते आणि त्यामुळेच प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
भावंडांमधील जिव्हाळा, निरागस विनोद आणि पोट धरून हसवणारे प्रसंग यामुळे हा चित्रपट मराठी प्रेक्षकांच्या हृदयात कायमचा घर करून बसला. विशेष म्हणजे, या अविस्मरणीय पहिल्या भागाचं दिग्दर्शनही अंकुश चौधरी यांनीच केलं होतं. अभिनेता म्हणून लोकप्रिय असलेले अंकुश चौधरी दिग्दर्शक म्हणूनही तितकेच सक्षम आणि संवेदनशील असल्याचं त्यांनी अनेक चित्रपटांतून सिद्ध केलं आहे.

आता तब्बल एकोणीस वर्षांनंतर, त्याच आठवणींना उजाळा देत आणि आजच्या काळाशी जुळवून घेत ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अंकुश चौधरी यांच्यासारख्या अनुभवी दिग्दर्शकाच्या हातात ही कथा पुन्हा एकदा साकारली जात असल्यामुळे, या वेळी हास्याबरोबरच कथेतली पकडही तितकीच भक्कम असणार, यांचा अंदाज येतोय.
================================
हे देखील वाचा : Priyadarshini Indalkar हिचं खरंच लग्न ठरलंय का?; सत्य आलं समोर
================================
अंकुश चौधरी यांची कथा, संदीप दंडवते यांची पटकथा व संवाद लाभलेल्या या चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू, संकेत पाठक, संजय नार्वेकर आणि समृद्धी केळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे छायाचित्रण प्रसिद्ध छायाचित्रकार संजय जाधव यांनी केले आहे. प्रेक्षकांना ही धमाल मस्ती चित्रपटगृहात ३० जानेवारी २०२६ रोजी अनुभवता येणार आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi