
April May 99 Movie Teaser: ‘एप्रिल मे ९९’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; रितेश देशमुख यांनी दिल्या शुभेच्छा
April May 99 Movie Teaser: लवकरच परीक्षा संपून मुलांच्या शाळांना सुट्टी लागेल. यंदाची उन्हाळ्याची सुट्टी अधिक धमाकेदार करण्यासाठी १६ मे रोजी मापुस्कर ब्रदर्सचा ‘एप्रिल मे ९९’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचे जबरदस्त टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. महाराष्ट्राचे लाडके अभिनेते आणि सर्वांचे भाऊ रितेश देशमुख यांनी आपल्या सोशल मीडियावरून ‘एप्रिल मे ९९’चे टिझर प्रदर्शित करत चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.(April May 99 Marathi Movie Teaser)

मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटात मैत्री, तारुण्य आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतील गोड आठवणींची एक अनोखी गोष्ट पाहायला मिळेल. टीझरमध्ये कोकणातील निसर्गसौंदर्याची सुंदर झलक पाहायला मिळत आहे. तसेच उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद लुटणाऱ्या मुलांची मजाही यात दिसतेय. या चित्रपटाच्या पोस्टरने आधीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती, आता टीझरमुळे या चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढली आहे. ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले असून राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी , मॉरिस नून हे निर्माते आहेत तर लॉरेन्स डिसोझा सह निर्माते आहेत.

दिग्दर्शक रोहन मापुस्कर म्हणतात, “मी खूप भाग्यवान आहे. माझ्या पहिल्या चित्रपटासाठी मला माझे प्रेरणास्थान असलेल्या मान्यवरांचा आशीर्वाद मिळतोय. पोस्टरचे अनावरण ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते झाले. आता टिझर लाँच रितेश सरांच्या हस्ते. मी रितेश सरांसोबत दोन चित्रपटांसाठी काम केले आहे. हे दोन्ही चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले आहेत. त्यांची एनर्जी आपल्याला ऊर्जा देते. मला त्यांच्यासोबत काम करताना कायमच प्रेरणा मिळते. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. त्यांच्या हस्ते माझ्या पहिल्या चित्रपटाच्या टीझरचे लाँचिंग होणे, ही आनंदाची बाब आहे. माझ्या कामात मला नेहमीच त्यांचे पाठबळ लाभले असून त्यांच्या प्रेमामुळे आणि त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे हा क्षण अधिकच खास झाला आहे.’’
====================================
हे देखील वाचा: Untavarche Shahane Marathi Movie: ‘उंटावरचे शहाणे’ चित्रपटाच्या चित्रीकरणाचा भव्य मुहूर्त सोहळा संपन्न!
====================================
निर्माते राजेश मापुस्कर म्हणतात, “ ‘एप्रिल मे ९९’ हा चित्रपट मैत्री, स्वप्न आणि तारुण्यावर आधारित आठवणींना उजाळा देणारा आहे. सर्व वयोगटासाठी असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच नॉस्टेल्जिक बनवेल. तरूणाईलाही तितकाच भावेल. खूप हलकीफुलकी कथा आहे, जी आपल्या अनेक आठवणींना उजाळा देईल.’’