मराठी नाटक पाहून भारावली Tabu, कलाकारांचं केलं तोंडभरून कौतुक!

Aranya Movie Teaser: हार्दिक जोशीच्या ‘अरण्य’ सिनेमाचा दमदार टीझर रिलीज प्रदर्शित !
गडचिरोलीच्या दाट जंगलाचा विचार केला की मनात प्रथम दाट हिरवाई, अरण्यातली चिरकाल शांतता आणि त्यामध्ये दडलेला संघर्ष डोळ्यासमोर येतो. या जंगलाच्या कुशीत अनेक कथा जन्म घेतात. काही रक्त गोठवणाऱ्या, काही हृदय पिळवटून टाकणाऱ्या. त्याच जंगलात आता उलगडणार आहे एक हृदयस्पर्शी, संघर्षमय आणि भावनांनी ओतप्रोत भरलेली कथा. ‘अरण्य’ हा आगामी मराठी चित्रपट प्रेक्षकांना जंगलाच्या कठोर वास्तवाशी समोरासमोर आणणार असून, त्यात मानवी नात्यांची गुंतागुंतही तितक्याच ताकदीने मांडण्यात आली आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. (Aranya Marathi Movie Teaser)

टिझरमध्ये अभिनेता हार्दिक जोशीची दमदार उपस्थिती प्रेक्षकांच्या मनावर खोल ठसा उमटवते. ‘मी जंगलचा वाघ आहे… बंदूक हीच माझी ओळख आहे,’ असे ठाम शब्दांत तो स्वतःला नक्षलवादी म्हणून सादर होतो. पण नंतरच त्याच्या आयुष्यात एक मुलगी येते आणि तिच्यामुळे त्याच्या आयुष्याची दिशा बदलते. टिझरमध्ये मुलीच्या हातातही बंदूक दिसते, ज्यामुळे एक गंभीर प्रश्न उभा राहतो तो, ‘ती वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवणार का?’ की मुलीच्या प्रेमामुळे हे कुटुंब जंगलातील हिंसाचार सोडून नवे आयुष्य स्वीकारणार? याच प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना येत्या १९ सप्टेंबर रोजी मोठ्या पडद्यावर मिळणार आहेत. एस. एस. स्टुडिओ निर्मित, अमोल दिगांबर करंबे लिखित व दिग्दर्शित या चित्रपटात हार्दिक जोशीसोबत वीणा जगताप, हिृतीका पाटील, विजय निकम, सुरेश विश्वकर्मा आणि चेतन चावडा यांची प्रमुख भूमिका आहे. चित्रपटाचे निर्माते शरद पाटील आणि अंजली पाटील असून, गडचिरोलीच्या दाट जंगलात प्रत्यक्ष चित्रीकरण केल्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटात अस्सल विदर्भी वातावरण अनुभवायला मिळणार आहे.

दिग्दर्शक अमोल दिगांबर करंबे याबाबत सांगतात, ‘‘‘अरण्य’ हा केवळ एका नक्षलवाद्याची गोष्ट नाही. ही जंगलातील संघर्ष, भीती, हिंसाचार आणि त्यामध्येही जगण्याची आस टिकवून ठेवणाऱ्या माणसांची कहाणी आहे. त्यात नात्यांचे प्रश्न आहेत, आयुष्य बदलणारे निर्णय आहेत आणि संघर्षाला तोंड देणारी जिद्द आहे. गडचिरोलीच्या जंगलातील वास्तव दृश्यांनी या कथेला अधिक प्रामाणिकपणा दिला आहे. कलाकारांनी जीव ओतून काम केले आहे, आणि त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना निश्चित भावेल.’’ आणि निर्माते शरद पाटील यांचे म्हणणेही तितकेच मनाला भिडणारे आहे. ते सांगतात, ‘‘‘अरण्य’ हा केवळ एक अॅक्शन वा ड्रामा चित्रपट नाही. तो जंगलातील संघर्ष आणि माणसामाणसांमधील नात्यांच्या नाजूक धाग्यांवर भाष्य करणारा सिनेमा आहे. आम्ही या चित्रपटात अस्सलता जपली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना फक्त जंगलाचा अनुभव नाही, तर एक वेगळी संवेदना, एक वेगळं आयुष्य जवळून पाहायला मिळेल. म्हणूनच हा चित्रपट सर्वांनी नक्की अनुभवावा, असं आम्हाला वाटतं.’’ (Aranya Marathi Movie Teaser)
==============================
हे देखील वाचा: Devmanus 3: देवमाणसाचा खेळ खल्लास करायला येतोय इन्स्पेक्टर मार्तंड जामकर !
==============================
‘अरण्य’ हा चित्रपट नुसता मनोरंजनापुरता नाही, तर जंगलातील वास्तव आणि त्यामागच्या मानवी कहाण्या मांडणारा चित्रपट आहे. गडचिरोलीच्या अरण्यातून आलेली ही कथा प्रेक्षकांच्या मनात घर करून जाईल, यात शंका नाही.