ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
अरे चड्डी पहन के फूल खिला है फूल खिला है….
नव्वदच्या दशकामध्ये जेव्हा भारतात दूरदर्शन हेच मुख्य आणि एकमेव चॅनल होते आणि विदेशी वाहिन्या हळूहळू भारतात शिरकाव करत होत्या त्या काळात या दशकाच्या मध्यावर ‘जंगल बुक’(the jungle book) नावाची एक टीव्ही सिरीयल दाखल झाली आणि पहिल्या भागापासून तमाम बच्चे कंपनीची ही लाडकी सिरीयल ठरली. बच्चे कंपनीत कशाला संपूर्ण आबाल वृद्धांची ही आवडती मालिका होती.
Rudyard kipling यांच्या अतिशय गाजलेल्या ‘जंगल बुक’(the jungle book) या कलाकृतीवर १९८९ साली इटालियन जापनीज अनिमेशन सिरीयल बनवली गेली. तिकडे या सिरीयलला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती नंतर हीच सिरीयल भारतामध्ये डब होऊन दाखवायचे ठरले. एनएफडीसीने त्याचे हक्क विकत घेतले आणि कामाला सुरुवात झाली. या मालिकेचे शीर्षक गीत ख्यातनाम गीतकार गुलजार यांना लिहायला सांगितले.
दूरदर्शनचे संगीतकार नेमके त्यावेळी परदेशात असल्यामुळे गुलजार यांनी लिहिलेले गाणे कुणी संगीतबध्द करायचे हा प्रश्न निर्माण झाला. गुलजार यांनाच याबाबत तोडगा काढायला सांगितला. त्यांनी संगीतकार विशाल भारद्वाज यांना फोन करून बोलावून घेतले आणि अक्षरशः एका दिवसात हे गाणे लिहून रेकॉर्ड देखील झाले! अमोल सचदेव या त्या काळी ८ वर्षाच्या मुलाने हे गीत गायले होते. जंगल जंगल बात चली है पता चला है बात चली है चड्डी पहन के फूल खिला है फुल खिला है….’(the jungle book) लहान मुलांची मानसिकता लक्षात घेऊन गुलजार यांनी हे गाणे लिहिले!
गाणे दूरदर्शनकडे पाठवल्यानंतर दोनच दिवसांनी विशाल भारद्वाज यांच्याकडे ते गाणे परत आले आणि यातील ‘चड्डी’ हा शब्द काढून त्या जागी पॅन्ट किंवा लुंगी हा शब्द टाका असे सांगितले. विशाल भारद्वाज यांनी गुलजार यांना सर्व प्रकार सांगितला. गुलजार म्हणाले, ”या सिरीयलमधील कॅरेक्टर ‘मोगली’ याने फक्त चड्डी परिधान केले आहे आणि तो फुलासारखा सुंदर आहे म्हणून मी ही ओळ लिहिली आहे. तिथे जर पॅन्ट आणि लुंगी हा शब्द वापरला तर यातली सगळी निरागसता निघून जाईल!” सरकारी अधिकारी मात्र गुलजार यांचे म्हणणे ऐकायला तयार नव्हते. (the jungle book)
शेवटी गुलजार यांनी सांगितले “एक तर इथे चड्डी हाच शब्द राहील नसता तुम्ही दुसऱ्या कुठल्यातरी गीतराकडून तुम्हाला पाहिजे तसे गाणे लिहून घ्या. एक नक्की सांगतो अश्लीलता की तुमच्या मनात असते. तुम्ही जसा विचार करता तसे तुम्हाला चित्र दिसते. तुम्ही या गाण्याकडे लहान मुलांच्या मानसिकतेतून पहा. एक सुंदर बालगीत तुमच्या नजरे पुढे येईल.” एवढे बोलून गुलजार ऑफिस मधून निघून गेले. यावर पुन्हा मोठी चर्चा झाली. खल झाला आणि शेवटी गुलजार यांचे म्हणणे सर्वांना पटले आणि हे गाणे फायनल झाले. आज ही सिरीयल येऊन तीस वर्षाचा कालावधी होऊन गेला आहे ही मालिका पाहिलेले लहान मुले आता चाळीशीत पोहोचले आहेत. पण सर्वांच्या मनात खोलवर हे गाणे रुजलेले आहे. कुणालाही हे शीर्षक गाणे त्या वेळेला अश्लील वाटले नाही आज देखील वाटत नाही.
गुलजारसारखा प्रतिभावान गीतकार जेव्हा गाणी लिहितो तेव्हा नक्कीच त्यामागे थॉट प्रोसेस असतो. या टीव्ही सिरीयलमधील शेरखान यांचा आवाज नाना पाटेकर यांनी डब केला होता. रविवारी सकाळी ही मालिका दूरदर्शन वर प्रसारित व्हायची. त्यावेळेला गल्लीबोळात क्रिकेट, हॉकी खेळणारे मुले क्षणात गायब होवून आपल्या घरात जाऊन आवडीने ही मालिका पाहत असत. रामायण, महाभारत या मेगा सिरीयल नंतर या मालिकेने देखील तितकीच लोकप्रियता हासील केली होती.
=======
हे देखील वाचा : वीरजारा : मदनमोहन च्या संगीतात फुललेली प्रेमकथा!
=======
२०१६ साली ‘जंगल बुक’(the jungle book) हा एक अमेरिकन चित्रपट देखील आला होता. यात नील सेठीने मोगलीची भूमिका केली होती या चित्रपटातील व्हॉइस ओव्हर करणारे आर्टिस्ट जबरदस्त होते त्यात बिल मुरे, बेन किंग्सले, इद्रीस इल्बा यांचा समावेश होता. हा सिनेमा डब होऊन हिंदी देखील रिलीज झाला होता हिंदी जंगल बुकमधील कलाकारांचे आवाज नाना पाटेकर, इरफान खान प्रियंका चोप्रा, ओम पुरी यांनी डब केले होते. हा सिनेमा येऊन गेला पण प्रेक्षकांना अजूनही ती मालिकाच आवडते आणि आठवते!