दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
तेरी मेरी यारी
‘तेरी मेरी यारी…मग बुकात गेली दुनियादारी’ सुहास शिरवळकरांच्या ‘दुनियादारी’तील पानात वाचलेलं हे वाक्य प्रत्येकजण मैत्रीच्या राज्यात अनुभवतो. मैत्रीत कोणतीही अट नसते आणि मित्रमैत्रीणींसाठी काहीही करण्यात वेगळाच आनंद असतो. मैत्री हे नातं प्रत्येकाच्याच आयुष्याला अर्थ देणारं. चुकत असेल तर हक्कानं सांगणारा मित्रच असतो. रोज…तासनतास न बोलता…न भेटता मैत्रीचं नातं जपण्यात वेगळीच आपुलकी असते. अशीच मैत्री टीव्ही इंडस्ट्रीतल्या कलाकारांनीही जीवापाड जपली आहे. कधी सेटवर तर कधी कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेली सहजभेट आणि त्यातून आकाराला आलेलं मैत्रीचं नातं असा हा प्रवास या कलाकारांनी शेअर केला आहे .
विवेक सांगळे आणि संग्राम समेळ
जीवाला जीव देणारी मैत्री
लव्ह लग्न लोचा, आम्ही दोघी या मालिकेमुळे युवावर्गात हिट असलेला राघव फेम विवेक सांगळे आणि पुढचं पाऊल , बाप माणूस मालिकेमुळे लोकप्रिय झालेला संग्राम समेळ यांची मैत्री जमली अवघी दोन अडीच वर्षापूर्वीच. विवेक ‘देवयानी’ मालिका करत होता आणि संग्राम ‘पुढचं पाऊल’. दोघांचे सेट जवळ असल्यामुळे भेट व्हायची. कार्यक्रमांच्या निमित्ताने ओळख वाढली आणि मैत्रीचं नातं आकाराला आलं. संग्राम सांगतो, मला विवेकमध्ये खूप जीव देणारा मित्र जाणवतो. तर विवेकला संग्रामचा, कोणताही आडपडदा न ठेवता वागण्याचा स्वभाव भावला. दोघांच्याही व्यस्ततेमुळे रोज भेटणं शक्य होत नसलं तरी आमच्यात एक भावनिक बंध जुळल्याचे दोघेही आवर्जून सांगतात. संग्रामने जेव्हा अभिनेत्री पल्लवी पाटील हिच्याशी लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा सर्वात आधी विवेकला सांगितले. विवेकला कुणी प्रपोज केले तर कधी एकदा ही गोष्ट संग्रामशी शेअर करेन असे विवेकला होते. आयुष्यातील चढउतार, काही महत्त्वाचे निर्णय घेताना होणारा गोंधळ, भूमिकेची निवड करताना हवी असलेली मदत अशा प्रत्येक गोष्टीमध्ये विवेक आणि संग्राम एकमेकांशी समरस झाले आहेत. अभिनेता, कलाकार यापलीकडे माणूस म्हणून असलेला निर्भेळपणा हा विवेक आणि संग्राम यांच्यातील मैत्रीचे सूर जुळवणारा समान धागा आहे.
समीर परांजपे आणि वैभव मांगले
गाण्याने आम्हाला जोडले
गोठ या मालिकेत विलास साकारणारा आणि लवकरच सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत दिसणारा समीर परांजपे आणि मालिका, नाटक, सिनेमा या तिनही माध्यमांत छाप पाडणारे वैभव मांगले यांना एकत्र जोडले ते दोघांमधील गाण्याच्या आवडीने. सौभाग्यवती या मालिकेत समीर आणि वैभव ही जोडी दिसली ती ‘मेव्हणे-पावणे’ या नात्यात. पण मालिकेच्या प्रवासात या दोघांमध्ये मैत्रीचा धागा जुळला. समीर सांगतो, मी शास्त्रीय गायन शिकलोय आणि वैभवना गाण्याची जाण आहे. गाणं या एका विषयावर आम्ही तासनतास बोलू शकतो. वैभवच्या आवडत्या गायिका किशोरी आमोणकर तर समीरसाठी किशोरीताई आदर्श. दोघांनी एकत्र पाहिलेली किशोरीताईंची मैफल आजही लक्षात असल्याचे ते सांगतात. समीरला वैभवचा स्पष्टवक्तेपणा आवडतो तर वैभवला समीरमध्ये असलेली प्रत्येक गोष्ट शिकतानाचा प्रामाणिकपणा. सौभाग्यवती मालिकेतील समीरची भूमिका चांगली होण्यासाठी वैभवने ज्या आस्थेने मदत केली तो निर्व्याजपणा म्हणजे मैत्री असं समीर मानतो. कामातून वेळ काढून भेटणं जमतच असं नाही, पण गाण्याविषयी काहीही नवं ऐकलं, वाचलं की त्यातून होणारं शेअरिंग ही समीर आणि वैभव यांच्या मैत्रनात्याची खूणगाठ आहे.
ओमप्रकाश शिंदे आणि उमेश जगताप
मैत्री ते कौटुंबिक स्नेह
‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेत डॉ. विक्रांत म्हणून दिसणारा ओमप्रकाश शिंदे आणि ‘का रे दुरावा’ या मालिकेतील तांगडे हे पात्र रंगवणारा रंगकर्मी उमेश जगताप यांच्यातील मैत्री आता कौटुंबिक स्नेह बनली आहे. अर्थातच का रे दुरावा या मालिकेच्या निमित्ताने ओमप्रकाश आणि उमेश यांची फक्त ओळख झाली. ओमप्रकाश सांगतो, उमेश रंगभूमीवरचा खूप ताकदीचा कलाकार आहे. पण का रे दुरावा या माझ्या पहिल्याच मालिकेतील पहिल्याच सीनसाठी माझ्यावर आलेलं दडपण त्याने पहिल्या भेटीतच ओळखलं. मी संवादाचा सराव करताना तो माझ्याजवळ आला आणि एकच वाक्य म्हणाला, ओम, जोपर्यंत तू तयार आहेस असं तुला वाटत नाही तोपर्यंत वेळ घे. त्या क्षणी असं सांगणारं कुणीतरी हवं होतं आणि त्यासाठी उमेश माझ्याजवळ होता. आमच्यातील मैत्री वाढली आणि आज ती कौटुंबिक स्नेह बनली आहे. उमेश सांगतो, ओमप्रकाशमधील साध्यासरळ माणसाने माझ्यावर गारूड केले. तर ओम सांगतो की, चांगुलपणाने सभोवतालची माणसं जिंकण्याचं कौशल्य उमेशकडून शिकण्यासारखं आहे. मी नाटकांमध्ये व्यस्त आहे तर ओम मालिकेत. तरीही जेव्हा भेटतो तेव्हा कडकडून मिठी मारतो. मैत्रीच्या नात्यात आयुष्यातील प्रत्येक कप्पा रिता करण्याचा मोकळेपणा असला पाहिजे या एकमतामुळेच ओमप्रकाश आणि उमेश यांचे मैत्रसूर जुळले आहेत.
हर्षद अटकरी आणि ओंकार कर्वे
आम्ही दोघं डाएटप्रेमी
कधी कुठल्या आवडीनिवडीवर मैत्रीचे सूर जुळतील हे काही सांगता येत नाही. अंजली मालिकेतील डॉ. यशस्वी अर्थात हर्षद अटकरी आणि दुर्वा या मालिकेत करारी महिपतीदादा वठवलेला ओंकार कर्वे यांची मैत्री दुर्वा मालिकेच्या निमित्ताने जुळली. मात्र दोघांमधील डाएटप्रेमाने त्यांना आज मालिकेचा प्रवास थांबल्यानंतरही जोडून ठेवले आहे. मालिकेमुळे चार वर्षांच्या सहवासात हर्षद आणि ओंकार यांच्यात रिकाम्यावेळेत डाएट फूड आणि फिटनेस यावर भरपूर गप्पा रंगल्या. हर्षद सांगतो, खाण्यातील चोखंदळपणाबद्दल आम्ही मेड फॉर इच अदर आहोत. या कॉमनफॅक्टरमुळे आमची मैत्री वाढतच गेली. हर्षदला ओंकारमध्ये मित्रासोबत एक मोठा भाऊ सतत जाणवतो. तर ओंकारला हर्षदमधील दिलखुलास दाद आवडते. जेव्हा वेळ मिळेल आणि आठवण येईल तेव्हा ही जोडगोळी भेटते आणि अर्थातच डाएट जपणाऱ्या पदार्थांवर ताव मारते.
भाग्यश्री मोटे आणि सिद्धी कारखानीस
खुन्नस ते जीवलग मैत्रीण
मैत्री जुळण्यामध्ये आणि ती टिकण्यामध्ये काय महत्त्वाचं असेल असं जर कुणी विचारलं तर संवाद हे त्याचं चपखल उत्तर आहे. याचा अनुभव लव्ह लग्न लोचा मालिकेतील चुलबुली शाल्मली अर्थात सिद्धी कारखानीसने पुरपूर घेतला आहे. देवयानी आणि प्रेम हे या मालिकांमधून दिसलेली भाग्यश्री मोटेसोबत सिद्धीची आज पक्की मैत्री असली तरी एकवेळ अशी होती की या दोघींची पहिली भेट झाली ती खुन्नसनेच. आज तो प्रसंग आठवून दोघीही मनसोक्त हसतात. देवयानी या मालिकेत भाग्यश्री मोटेला रिप्लेसमेंट म्हणून सिद्धीची एंट्री झाली तेव्हा बऱ्याच जणांनी या दोघींमध्ये गैरसमज पसरवले. सिद्धी सांगते, पण एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला एकमेकींशी बोलण्याची संधी मिळाली आणि मैत्री झाली. संवादच झाला नसता तर गैरसमजामुळे आम्ही कधी बोललोच नसतो असं वाटतंय. भाग्यश्री सांगते, सिद्धीचा रोखठोक स्वभाव मला जास्त आवडतो. तर भाग्यश्रीमधील सकारात्मकता सिद्धीला आवडते. भविष्यात काय असेल माहिती नाही, पण आज मैत्रीसाठी काहीही करायला सिद्धी आणि भाग्यश्री तयार असतात. वेळ मिळाला की शॉपिंग आणि खाण्याची हौस दोघी मनमुराद पुरवून घेतात. पण त्याचवेळी एकमेकींच्या कामाबाबत खटकलेल्या गोष्टी तितक्याच स्पष्टपणे बोलतात.
अनुराधा कदम