कल्लाकारांना आठवण युथची
परदेशात असलेल्या कोरोनाच्या या संकटात २०२० या वर्षाला सुरुवात झाली. बघता बघता हे संकट भारतात येऊन ठेपल. आणि मग सुरुवात झाली आपापसात अंतर राखून वागण्याची.. सोशल डिस्टंसिंग पाळण्याची.. या मुळे भारत सरकारने तातडीने लॉकडाऊन लागू केले. सुरुवाती सुरुवातीला सगळ्यांनाच या आयत्या मिळालेल्या आरामामुळे फारचं हायस वाटलं. शाळेतल्या मुलांना अभ्यास नाही म्हणून आनंद झाला तर कॉलेजातल्या मुलांना लेक्चर नाही म्हणून आनंद झाला.
पण जस जसे महिने सरले तस तसा या सक्तीच्या आरामाचा कंटाळा यायला लागला. बंद असलेली ऑफिसेस वर्क फ्रॉम होम तत्वावर सुरू झाली. कॉलेज आणि शाळा देखील ऑनलाईन सुरू झाल्या. पण तरी देखील काहीतरी हरवल्यासारख वाटत होतं. कारण मित्र मैत्रिणींना प्रत्यक्ष भेटण्याची मजा बाकी कशालाच येणार नाही. मुलांच्या गप्पांनी, कट्ट्यावरच्या भेटीनी, कॅन्टीन मधल्या चाहाद्यांनी जर कॅम्पस गजबजला नाही तर कॉलेज सुरू आहे ही गोष्ट खरीच वाटत नाही.
खरंच कॉलेज आणि कॉलेज कॅम्पस ह्या फक्त दगड मातीच्या इमारती असून चालत नाही तर त्यात विद्यार्थांच्या वावरातून जिवंतपणा यावा लागतो. आणि हा जिवंतपणा देण्यात मोठा वाटा असतो तो म्हणजे कॉलेजच्या नाट्य मंडळांचा. कॉलेजच्या एका कोपऱ्यात तालमी करत असली तरी यांची कीर्ती मात्र संपूर्ण कॉलेज व्यापून टाकत असते. कॉलेज, अभ्यास, परीक्षा सांभाळून ही नाटकं वेडी मुलं आपली नाटकाची खाज भागवत असतात. दरवर्षी ऐन गणपतीतही हे नाटक वेडे घरच्यांचा रोष पत्करून तालीम करण्यासाठी भेटत असतात. कारण एव्हाना त्यांना युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीचे वेध लागले असतात.
यावर्षी मात्र आपल कार्ट घरीच आहे म्हणून आई वडिलांना जरी आनंद होत असला तरी हे नाटक वेडे “कल्लाकार” मात्र फारसे खूष दिसत नाहीत. कारण यावर्षी प्रथमच युनिव्हर्सटीमध्ये युवा महोत्सव होत नाहीये. त्यामागचं कारण कितीही योग्य आणि रास्त असल तरी तालमीत जगणाऱ्या आणि तालमीतच राहणाऱ्या या मंडळींच्या जीवाला लागलेली चुकचुक कमी होणं शक्य नाही. कारण पावसाळा सुरू होऊन कॉलेज सुरू झाली रे झाली की स्किट आणि एकांकिकांसाठी ताज्या ताज्या विषयावर चर्चा करण्यासाठी तालमीच्या जागेवर गोलमेज परिषद भरते. आणि मग मोहीम सुरु होते ए वन स्क्रिप्ट बांधणीची..!
विषयापासून सेट पर्यंत ते फोक फॉर्मपासून गाण्यांपर्यंत सगळ्याच गोष्टींसाठी शक्कल लढवली जाते. मग सीनियर पासून जूनियर पर्यंत प्रत्येक जण आपापला खारीचा वाटा उचलून युनिव्हर्सिटी युथ फेस्टिवलच्या ओव्हर ऑल ट्रॉफी पर्यंतचा सेतू बांधायला सुरुवात करतो. काळ,वेळ, कष्ट, मेहनत या कशाचीही तमा न बाळगता हा प्रत्येक कल्लाकार युवा महोत्सवाच्या मंचावर कल्ला करण्यासाठी धडपडत असतो. मग पारितोषिक मिळो न मिळो फायनलचा परफॉर्मन्स मात्र सगळ्यांच्या लक्षात राहायला हवा हा एवढाच ध्यास त्याच्या मनी असतो.
पण यंदा मात्र हे सगळंच सूनं आहे. त्या तालमी नाहीत, तो ध्यास नाही, ती धावपळ नाही, ते कष्ट नाहीत.. कारण यंदा युथ फेस्टिवलच नाही. ह्या सगळ्या परिस्थितीचा विचार करता गणराजा चरणी हीच प्रार्थना करावीशी वाटते की, लवकरात लवकर हे कोरोनाचं संकट टळू दे आणि पुन्हा एकदा कॉलेजमधील तालमीच्या जागा या कलाकारांनी गजबजून जाऊ दे.
– कल्पिता पावसकर