
लहानपणी भातुकलीच्या खेळात मधुबाला नवरी व्हायची तर मदनमोहन नवरा आणि लग्न लावून द्यायचा किशोरकुमार !
हास्य अभिनेता महमूद (Mehmood) म्हणजे कहर होता. साठ आणि सत्तरच्या दशकात केवळ त्याच्या नावावर सिनेमे चालत असतं. अनेक बड्या कलाकारांनी तर त्याच्या नावाची अक्षरशः धास्ती घेतली होती. या महमूदला (Mehmood)मात्र रूपेरी पडद्यावर स्वत:ला सिध्द करायला दशकभराचा संघर्ष करावा लागला होता. त्याच्या रूपेरी पडद्यावरील प्रवेशाचा एक गमतीचा किस्सा आहे.

त्याने तरूणपणी रूपेरी पडद्यावर पहिला शॉट दिला मधुबालासोबत! पण त्या पूर्वी त्याने बाल भूमिकातून पडद्यावर पदार्पण केले होतेच. बॉम्बे टॉकीज मधील नृत्यकलाकार व गायक मुमताज अली यांचा मुलगा म्हणजे महमूद (Mehmood). लहानपणापासूनच उनाड. १९४३ साली आलेल्या किस्मत या सिनेमात त्याने अशोक कुमारच्या बालपणाची भूमिका केली होती. या ’किस्मत’ सोबतच बॉम्बे टॉकीजचा आणखी एक सिनेमा त्यावेळी फ्लोअर वर होता तो म्हणजे ’वसंत’. यात मधुबाला बालकलाकार म्हणून होती.
दोन्ही सिनेमाचे शूटींग एकाच स्टुडिओत चालू असल्याने या दोन लहानग्यांचा दंगा चालू असे. त्यांना आणखी दोन बालसंवंगडी तिथे भेटले एक होता अशोक कुमारचा धाकटा भाऊ किशोर कुमार आणि दुसरा होता बॉम्बे टॉकीजचे संचालक रायबहादूर चुनीलाल यांचा मुलगा मदनमोहन!(Mehmood) स्टुडिओच्या आवारात या चौघांचा धमाल टाईमपास चालू असायचा. हा टाईमपास करताना ती चौघं भातुकलीच्या लग्नाचा खेळ खेळायची. या लग्नात किशोर कुमार पुरोहित बनायचा; महमूद वर्हाडी बनायचा व मधुबाला व मदनमोहनचे लग्न लावून द्यायचे! (प्रत्यक्ष आयुष्यात मधूने किशोरशी लग्न केले!).

लवकरच बालपण संपले. किशोर कुमार ’जिद्दी (१९४८)’ तून गायक बनला. मदनमोहन लष्कराची चाकरी करून परत सिनेमात आला व संगीतकार बनला. मधुबाला ’महल’(१९४९) पासून आघाडीची नायिका बनली. राहता राहिला त्यांचा बालमित्र महमूद.(Mehmood) लहानपणी त्याने कुठलीच गोष्ट कधी सिरिअसली घेतली नाही. सतत टवाळक्या , उनाडक्या करीत राहिला. नको नको ती व्यसनं याच काळात त्याला लागली. मग त्याने चक्क ड्रायव्हरचा पेशा पत्करला व दिग्दर्शक पी एल संतोषीच्या गाडीवर रूजू झाला.
याच काळात संतोषी यांच्या ’नादान’(१९५१) चे चित्रीकरण चालू होते. त्यावेळी मधुबालासोबत एक ज्युनिअर आर्टीस्ट एक शॉट देत होता. पण मधुबाला समोर असल्याने त्याच्यावर दडपण येत असल्याने त्याला काही केल्या अभिनय जमत नव्हता. तो सारखं ततपप करत होता. शेवटी दिग्दर्शक वैतागले. त्याला काढून त्यांनी दुसरा ज्युनिअर आर्टीस्ट शोधायला सुरूवात केली. त्यावेळी त्यांना आपला ड्रायव्हर महमूद (Mehmood)आठवला.
==================
हे देखील वाचा : या गाण्याबाबतचा निर्णय महिलांनी चक्क मतदान करून घेतला!
==================
त्यांनी ताबडतोब त्याला बोलावून घेतले. मधुबाला त्याची बाल मैत्रीण होती. त्यामुळे तिच्या सोबत सीन देताना महमूदला काहीच अवघड वाटले नाही. उलट तो प्रसंग खूपच नैसर्गिक वाटला. एका टेक मध्ये ओके झालेल्या या प्रसंगाने महमूदची अभिनयाची यात्रा सुरू झाली. पण संघर्ष संपला नाही. पुढे तो शक्ती सामंत, गुरूदत्त यांच्या गाड्यांवर देखील ड्रायव्हर होता. या दोघांमुळे त्याला छोटी मोठी कामे मिळू लागली. पण खरं यश मात्र महमूदला ’छॊटी बहन’ (१९५९) पासून मिळू लागले!