बनवाबनवीच्या कमळीने मिळवले हजार रुपये
अशी ही बनवाबनवी सिनेमानं हैदोस घातला महाराष्ट्रात. हा सिनेमा आला होता तेव्हा साल होतं १९८८. म्हणजे जवळपास बत्तीस वर्षं झाली तरी या सिनेमाची जादू काही ओसरायचं नाव घेईना. निर्माते किरण शांताराम यांनी अशी ही बनवाबनवी बनवण्यासाठी त्याची सगळी धुरा दिली ती सचिन पिळगांवकरांवर. सचिन यांनी ही जबाबदारी लीलया उचलली. केवळ दिग्दर्शक म्हणून नव्हे, तर अभिनेता, गायक आणि सुधा म्हणून सुद्धा.
जवळपास ३३ वर्षं होऊनही या सिनेमाची जादू.. त्यातल्या व्यक्तिरेखा आजही ताज्या आहेत. धनंजय, सुधीर, कमळी, परश्या, शंतनू, मनीषा, माधुरी या व्यक्तीरेखा अजरामर झाल्या आणि त्यातही लक्षात राहिले ते सरपोतदार. अशोक सराफ, सचिन, लक्ष्मीकांत बेर्डे, अश्विनी भावे, प्रिया बेर्डे, सुप्रिया पिळगांवकर, विजू खोटे, सुधीर जोशी, निवेदिता सराफ, सिद्धार्थ रे यांनी धमाल आणली. या सिनेमाबद्दल जेवढं बोललं जाईल तेवढं कमी आहे. ‘धनंजय माने इथेच राहतात का’, ‘सत्तर रुपये वारले’, ‘लिंबू कलरची साडी’, ‘इस्त्रायलमधून आलेला मित्र’, ‘हा माझा बायको’ अशा प्रत्येक संवादांसह ‘ही दुनिया माया जाल’, ‘कुणीतरी येणारं येणारं गं’, ‘ह्रदयी वसंत फुलताना’ अशी एकापेक्षा एक गाणी या सिनेमान दिली.
पण आज एक अशी गंमत आपण सांगणार आहोत जी फार कुणाला माहीत नाही. यातल्या जोड्या पुष्कळ गाजल्या. शंतनु-सुषमा, धनंजय-माधुरी, परश्या-कमळी, सुधीर-मनीषा अशा. यातल्या अनेकांबद्दल यापूर्वी अनेक ठिकाणी आलं आहे. आता आपण जे सांगणार आहोत ती गोष्ट आहे कमळीची. कमळीची व्यक्तिरेखा साकारली आहे प्रिया बेर्डे यांनी. खरंतर प्रिया यांचा बनवा बनवी हा पहिला चित्रपट. हा चित्रपट त्यांनी स्विकारल्या तेव्हा त्या होत्या अवघ्या १६ वर्षाच्या. आणि हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा त्या होत्या १८ वर्षाच्या. हा त्यांचा पहिला चित्रपट. या सिनेमासाठी त्यांना मानधन मिळालं होतं ते अवघं अडीच हजार रुपये. त्यावेळी ही रक्कमही तशी थोडी नव्हती. पण इतर कलाकारांच्या मानाने ही रक्कम कमी होती. प्रिया यांचाही पहिलाच सिनेमा असल्यानं हा त्यांच्यासाठी मोठा ब्रेक होता. सोबत अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, अश्विनी भावे, सचिन अशी मंडळी होती. त्यामुळे हा सिनेमा मोठा होता. पदार्पणातच हा सिनेमा आल्यानं त्यांनी तो स्वीकारला. मानधन घेऊन कामही सुरू केलं. पण खरी गंमत घडली ती ह्रदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे.. या गाण्यावेळी.
या गाण्याचं चित्रिकरण सुरू झालं. या सिनेमातली प्रत्येक जोडी नाचत होती. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतीला होत्या प्रिया बेर्डे. म्हणजे तेव्हाच्या प्रिया अरूण. गाण्याचं शूट सुरू झालं. एरवी गाण्याचं शूट करणं फार त्रासदायक. एक स्टेप चुकली की पुन्हा रीटेक आला. पण प्रिया या मुळात नृत्यांगना होत्या. त्यांनी या गाण्यात दिलेल्या स्टेप्स बरहुकूम केल्या. यात वेळ वाचलाच, शिवाय निर्माते किरण शांतारामही खुश झाले. प्रिया यांचं नृत्यकौशल्य पाहून लगेच हजार रुपये प्रिया यांना वाढवून दिले. असं सर्वसाधारणपणे कधी होत नाही. पण काम पाहून दिलेली ती दाद होती.
अशी ही बनवा बनवी हा उत्तम टीमवर्कचा परिणाम होता. लेखन, दिग्दर्शन, संगीत, अभिनय, संवाद, संकलन, वेशभूषा-रंगभूषा या सर्वच पातळ्यांवर हा चित्रपट अस्सल होता. यामुळेच गेल्या तीस वर्षांपासून अधिराज्य गाजवतो आहे.
- धनंजय माने