अत्रेंच्या लेखणीतून…
आजचा दिवस मराठी रंगभूमीसाठी खास आहे. ब्रम्हचारी, मोरूची मावशी, लग्नाची बेडी, तो मी नव्हेच, भ्रमाचा भोपळा, साष्टांग नमस्कार, उद्याचा संसार, कवडीचुंबक, गुरु दक्षिणा, घराबाहेर, जग काय म्हणेल?, पराचा कावळा, पाणिग्रहण, प्रल्हाद, प्रीतिसंगम, बुवा तेथे बाया, अशी बायको हवी, मी उभा आहे, मी मंत्री झालो अशा अनेक सुप्रसिद्ध नाटकांच्या लिखाणातून ज्यांनी मराठी रंगभूमीला समृद्ध केलं त्या आचार्य अत्रे अर्थात ‘प्रल्हाद केशव अत्रे’ यांचा आज जन्मदिन.
काही व्यक्तिमत्वं जन्मजात अष्टपैलूत्वाचा वसा घेऊन येतात. वक्ता, विनोदी लेखक, आत्मचरित्रकार, नाटककार, कवी, वृत्तसंपादक, संयुक्त महाराष्ट्राचे नेते, चित्रपट निर्माते,शिक्षक अशा विविध क्षेत्रात मुशाफिरी करणारे आचार्य अत्रे म्हणजे अष्टपैलुत्वाचा आदर्शच.
अनेक बाबतीत अत्रेंच्या व्यक्तिमत्वातील वेगळेपण जाणवत रहातं. “मराठा” सारख्या वृत्तपत्रांतून अत्रेंच्या सुप्रसिद्ध मथळ्यांनी नामवंतांची उडवलेली झोप असो, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांच्या वक्तृत्वाचा घणाघाती तोफखाना असो किंवा सानेगुरुजींच्या ‘शामच्या आईला’ चित्रपटातून सादर करताना मराठी सिनेसृष्टीला प्राप्त करुन दिलेला पहिला मानाचा राष्ट्रीय पुरस्कार सुवर्णकमळ असो. आचार्य अत्रे हे व्यक्तिमत्व अचाट, अफाट उत्तुंग भव्यदिव्य गोष्टींसाठी मराठी माणसांच्या मनावर कायम कोरलेलं रहातं.
त्यांची सगळीच नाटकं विलक्षण गाजली. पण मोरुची मावशी, तो मी नव्हेच, लग्नाची बेडी या नाटकांनी विलक्षण यश प्राप्त केलं. ही नाटकं वेगवेगळ्या नटांना तेव्हापासून आजपर्यंत पुन्हा पुन्हा करुन पहावीशी वाटतात यात नाटककार अत्रेंचे यश अधोरेखित होते. मोरुची मावशी हे अत्र्यांचं नाटक दामुअण्णा मालवणकरांपासून विजय चव्हाण ते अगदी आताच्या भरत जाधव यांच्यापर्यंत विविध कलाकारांनी साकारलं.
अत्रे इंग्लंडमध्ये शिकत असताना १९२७ साली त्यांनी ब्रॅण्डन टॉमसचं ‘चार्लीज आन्ट’ हे प्रहसनवजा नाटक पाहिलं होतं.त्यावरुन अत्रेंनी नाटक लिहायला सुरुवात केली. हे नाटक जागतिक रंगभूमीवर तुफान लोकप्रिय होतं. विविध भाषांमध्ये भाषांतरीत झालं होतं. हे नाटक लिहिलं गेलं तेव्हा मोटारी, विमानं, नभोवाणी, चित्रपट काहीही नव्हतं. इंग्रजी साहित्यात हे नाटक १९ व्या आणि २० व्या शतकाचा दुवा म्हणून पाहिलं जातं. असं नाटक मराठी रंगभूमीवर खणखणीत वाजलं पाहिजे अशी अत्र्यांची इच्छा होती. पण का कोण जाणे पहिला अंक लिहुन झाल्यावर अत्रेंचा उत्साह मावळला. त्यानंतर काही काळ गेला. एका निर्मात्यांनी अत्रेंना विनोदी चित्रपट लेखनाची गळ घातली तेव्हा अत्रेंनी लिहिलेला चित्रपट होता ‘मोरूची मावशी’.
हो! आपल्यासाठी हे धक्कादायक असलं, तरी मोरूची मावशी पहिल्यांदा चित्रपटात आली. त्यात अत्रेंनी दिग्दर्शक, कथाकार, गीतकार, संवादलेखक आणि एका भूमिकेसह अभिनेता म्हणूनही काम केलं होतं. दामुअण्णा मालवणकर त्यात मोरुच्या मावशीची भूमिका करत. या चित्रपटानंतर १ मे १९६३ साली नाटक रंगभूमीवर आलं. साधारणपणे नाटकावर आधारित चित्रपट निर्माण होतात. इथे बरोबर उलट घडलं. पण नाटकाने चित्रपटाच्या वरताण यश मिळवलं. नाटकाच्या शेवटी संध्या हे पात्र उखाणा घेतं; “आईबापांनी नवस केला नवरा मिळावा हौशी…अन् संध्याबाईच्या गळ्यात पडली_ यापुढचा ‘मोरुची मावशी’चा’’ गजर नाट्यगृहातील प्रेक्षक तेव्हाही करायचे आणि आजही करतात.आचार्य अत्रे यांच्याच शब्दांत सांगायचं तर अशी कालातित नाटकं लिहिणारा नाटककार गेल्या दहा हज्जार वर्षांत झाला नाही आणि पुढच्या दहा हजार वर्षांत होणे नाही.