दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
संगीतप्रधान चित्रपटांच्या दुनियेतील गीत विरहित ‘कानून’ तर फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित धर्मपुत्र
कानून (१९६०)
निर्देशक – बी. आर. चोप्रा (B R chopra Movies)
संगीतकार – सलील चौधरी
कलाकार – अशोक कुमार, राजेंद्रकुमार, नंदा, मेहमूद, जीवन व नाना पळशीकर
चोप्रांचा ‘कानून’ हा चित्रपट उद्योगातील तिसरा गीत विरहित चित्रपट होता. सी.जी पावरी यांच्या कथेमध्ये गाण्यांसाठी योग्य जागा नव्हती. उगाच मध्ये गाणे घुसडून कथेची प्रेक्षकांवर असलेली पकड चोप्रांना ढिली करायची नव्हती. म्हणून संगीतप्रधान चित्रपटांच्या जमान्यात त्यांनी गीत विरहित चित्रपट काढण्याचा धाडसी निर्णय घेतला.
सर्व कायदा हा मानवी साक्षी पुराव्यांवर आधारित आहे. न्याय देणारी व्यक्तीही शेवटी माणूस आहे. तेव्हा तिच्या हातून न्यायदान करताना एखादी चूक घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखाद्याच्या साक्षी पुराव्यावरून दुसऱ्याचा जीव घेणे संयुक्तिक ठरते का? हा प्रश्न निर्माण होतो. काही कारणाने खरोखरंच एखादी निरापराध व्यक्ती खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात गुंतून शिक्षेला पात्र ठरल्यास त्याच्यावर अत्यंत भीषण प्रसंग ओढवू शकतो. या व्यक्तिवादावरच ‘कानून’ चित्रपटाची संपूर्ण कथा गुंफण्यात आली आहे आणि मृत व्यक्तीसह केवळ सात पात्रांनी ती सांगितलेली आहे. चोप्रांच्या कुशाग्र बुद्धीची चुणूक इथे पाहायला मिळते.
खुर्चीला खिळवून ठेवणारे रहस्य, कोर्टातील नाट्यपूर्ण प्रसंग व कलाकारांचा जिवंत अभिनय हे कानूनचे वैशिष्ट्य होते. गाण्यांशिवाय कानूनने बॉक्स ऑफिस रेकॉर्ड तोडले. (B R chopra Movies)
धर्मपुत्र (१९६१)
निर्देशक – यश चोप्रा
संगीतकार – एन दत्ता
गीतकार – साहिर लुधियानवी
कलाकार – शशि कपूर, माला सिन्हा, रेहमान, निरुपा रॉय, इंद्राणी मुखर्जी व मनमोहन कृष्ण
हिन्दुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात “हिंदू मुस्लीम भाई भाई” या नाऱ्याने झाली आणि शेवट मात्र या दोन जातीतील सांस्कृतिक संबंध पार बिघडून, धार्मिक तेढ वाढविण्यात झाला. चोप्रांच्या धर्मपुत्रची कथा याच राजकीय युक्तिवादावर, फाळणीपूर्व काळावर आधारित होती. (B R chopra Movies)
हुस्नबानोवर (माला सिन्हा) प्रेम संबंधातून कुमारीमाता बनण्याचा लज्जास्पद प्रसंग ओढवतो. तिच्या अब्बाना नवाब बदरुद्दीना (रेहमान) हे बिलकुल पसंत नसते. तेव्हा तिला भावासमान असणारा हिंदू शेजारी डॉ. अमृत राय (मनमोहन कृष्ण) व त्याची पत्नी सावित्री (निरुपा रॉय) बानोच्या अनौरस पुत्राला (शशि कपुरला) दत्तक घेतात. तो मुलगा हिन्दू संस्कारात वाढतो व कट्टर हिन्दुत्ववादी बनतो. त्याच्या तरुणपणी राजकिय परिस्थिती बदललेली असते. स्वातंत्र्य चळवळीला जोर चढतो. मुस्लिमांसाठी वेगळ्या राष्ट्राची मागणी केली जाते. धार्मिक तेढ वाढत जाते. सर्वत्र संशयाचे वातावरण निर्माण होते.
=========
हे देखील वाचा – धुल की फूल (1959)
=========
हिंदू -मुस्लीम शेजाऱ्यांतील वर्षानुवर्षांचे घरोब्याचे अतूट संबंध, एकोपा संपुष्टात येऊ लागतो. ते एकमेकांचे कट्टर वैरी बनतात, सुडाने बेभान होतात. जन्माने मुस्लीम असला तरी बालपणापासून डॉ. अमृत रायकडे हिंदू संस्कारात वाढलेला दिलीप (शशि कपुर) सुडाने बेभान होऊन मुस्लिमांची घरे जाळायला निघतो. तेव्हा त्याला त्याच्या जन्माचे रहस्य सांगून चोप्रांनी क्लायमॅक्स साधला आहे.