बाबू बँड बाजा: आस्था-अनास्थेची वाजंत्री
“शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो ते प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.” – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा हा तिथल्या विद्यार्थ्यांचा, त्यांच्या पालकांचा एक मोठा आधार. जास्तीत जास्त मुलं शिकावीत, त्यांची गरीबी त्यांच्या शिक्षणाच्या आड येऊ नये म्हणून शासन या शाळांसाठी अनेक सवलती, योजना मंजूर करतं. पण मंजूर होऊनही त्या तिथपर्यंत पोहोचतच नाहीत त्यामुळे बरेच विद्यार्थी परिस्थितीअभावी शिक्षण घेण्यापासून वंचित राहतात. आपल्या पोरांनी भरपूर शिकावं, मोठं व्हावं, आपल्यासारखं राबू नये ही प्रत्येक कास्तकार पालकांची अपेक्षा असते त्यासाठी त्यांना आधार असतो तो या शाळांचा, इथल्या प्राथमिक शिक्षणाचा. पोरांनी शिकावं म्हणून आईबाप राब राब राबतात, खूप कष्ट करतात. त्या कष्टांची जाणीव ठेवणारे विद्यार्थी आपल्या आयुष्याचं सोनं करतात, आईबापाच्या कष्टाचं चीज करतात.
हे देखील वाचा: स्मिता पाटीलच्या त्या बातमीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं…
बऱ्याच ठिकाणी याउलट चित्र दिसतं. पोरांनी शाळेत शिकण्यात वेळ आणि पैसा खर्च करण्यापेक्षा आपलाच पिढीजात व्यवसाय पुढं न्यावा अशीही मानसिकता दिसून येते. एकंदरीतच शिक्षणाविषयीची अनास्था आणि गरीबीमुळे आलेली हतबलता त्या पालकांना असा विचार करण्यास प्रवृत्त करते. ‘बाबू बँड बाजा’ (Baboo Band Baaja) हा मराठी चित्रपट अश्याच परिस्थितीवर भाष्य करतो. तीन राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवला गेलेला हा चित्रपट मराठीतील उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणता येईल.
चित्रपटाची कथा फिरते बाबू (विवेक चाबुकस्वार) ह्या लहानग्या नायकाभोवती. बाबूचा बाप जग्गू (मिलिंद शिंदे) हा गावात शुभाशुभ प्रसंगी हालगी वाजवायचं काम करतो. पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा व्यवसाय त्याला आता आपल्या पोराच्या नावाने स्वतःची बँड पार्टी सुरू करून वेगळ्या स्तरावर न्यायचाय. बाबूलाही त्यात सामील करून घेण्याचा त्याचा मनसुबा आहे. बाबूच्या आईला, म्हणजेच शिरमीला (मिताली जगताप वराडकर) मात्र बाबूने खूप खूप शिकावं असं मनापासून वाटतं. त्यासाठी ती प्रचंड धडपड करत असते. शिकून काय करायचंय, शेवटी वाजवायचंच काम करावं लागणार आहे असं सतत तुणतुणं वाजवणाऱ्या नवऱ्याकडे दुर्लक्ष करून ती बाबूला शिकवू पाहते.
हे वाचलंत का: रंगभूमी गाजवलेलं सदाबहार नाटक ‘मोरूची मावशी’ ह्याचे काही रंगतदार किस्से
एक दिवस शाळेतून घरी येताना बाबूचं दप्तर हरवतं. त्याचबरोबर त्याच्या बापाने त्याला त्यात ठेवायला दिलेला खुळखुळाही हरवतो. लाख शोधूनही दप्तर सापडत नाही. दप्तर नाही, शाळेचा गणवेश नाही, वह्यापुस्तकं नाहीत अशी कारणं पुढे करून शाळेतूनही त्याला सतत हाकललं जातं. मग शिरमी पदर खोचून उठते नि बाबूच्या ह्या खर्चासाठी कापसाच्या फॅक्टरीत रोजंदारीवर काम धरते. मास्तरांशी भांडून बाबूला शाळेत बसवते. शिक्षणाविषयीची आस्था-अनास्था यांवर भाष्य करणारा हा चित्रपट काहीसा दुर्दैवी वळणावर येऊन संपतो.
लेखक-दिग्दर्शक म्हणून राजेश पिंजानी यांचा हा पहिलाच प्रयत्न तुफान यशस्वी ठरला आहे. पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या या चित्रपटाने विवेक चाबुकस्वार आणि नम्रता आवटे हे दोन नवे, आश्वासक चेहरे मराठी सिनेसृष्टीला दिले. विवेक चाबुकस्वारला त्याने साकारलेल्या ‘बाबू’साठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार ह्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले तर मिताली जगताप वराडकरने आपल्या नैसर्गिक अभिनयाच्या जोरावर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवला.
हे नक्की वाचा: डिजिटल मीडिया हेच मनोरंजन क्षेत्राचं भविष्य – सारंग साठे
उषा नाईक, छाया कदम, नम्रता आवटे तसेच राजेश भोसले, संजय कुलकर्णी, महेश घाग इत्यादी कलाकारांनी आपापल्या भूमिकेला योग्य न्याय मिळवून दिलेला आहे. तुझ्या वाटंला लावून डोळं, तुझ्या पायाची पुण्याई, असा कसा जीव बाई ही प्रकाश होळकरांची सुश्राव्य गाणी रोहित नागभिडे यांनी संगीतबद्ध केलेली आहेत. राजा फडतरे यांची सिनेमॅटोग्राफी अगदीच झकास जमली आहे.
बाबू बेचा पाढा म्हणताना त्याच्याकडे निस्सीम कौतुकाने बघणारी शिरमी आणि बाबूच्या मास्तराने शाळेत भेटायला बोलावल्यावर टाळाटाळ करणारा जग्या ह्या दोन जात्याच्या दगडांमध्ये बाबूचं भरडून निघणारं बालपण बघताना प्रेक्षक हरवून जातो. बोलीभाषेचा पुरेपूर गोडवा यात उतरल्याने कुठलेही संवाद रटाळ वाटत नाहीत, हलकीफुलकी विनोदनिर्मितीही छान जमलीय. ग्रामीण जीवनातलं वास्तवदर्शी चित्रीकरण कुठलाही अतिरंजितपणा न येऊ देता पार पाडण्याचं आव्हान दिग्दर्शकाने लीलया पेललेलं आहे. सहा राज्य पुरस्कार व पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा बहुमान मिळवलेला हा चित्रपट नक्कीच बघण्यासारखा आहे.
– प्रथमेश हळंदे