दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
जेव्हा बाळासाहेबांनी दिली होती गलगलेंना दाद…
काही नाटकं कालातीत असतात. कितीही वेळा पाहिली तरी तोच आनंद देतात. भरत जाधव अभिनीत केदार शिंदे दिग्दर्शित ‘सही रे सही’ नाटक याच कॅटेगरीतलं. या नाटकाच्या आठवणीसुद्धा तितक्याच सही आहेत.
२००२ साली ‘सही रे सही’ रंगमंचावर आलं. केदार आणि भरत या दोघांचंही त्या आधीचं नाटक फारसं चाललं नव्हतं. एका नव्या धमाकेदार नाटकाच्या दोघंही शोधात होते. सही रे सहीच्या रूपाने त्यांना यशाचा मार्ग मिळाला. भरत जाधवच्या चौरंगी भुमिकांनी या नाटकात नुसती धमाल केली होती. मदन सुखात्मे, रंगा ड्रायव्हर, दामू आणि गलगले ह्या चारही भूमिका भरत इतक्या जबरदस्त वठवत होता की या नाटकाला रिपीट ऑडीयन्स मिळत राहिला. पहिल्या वर्षी ३६५ दिवसात या नाटकाने विक्रमी ५६८ प्रयोग केले. लता नार्वेकर यांनी निर्माता म्हणून हे नाटक रंगभूमीवर आणलं होतं पण काही वादांमुळे त्या बाहेर पडल्या. आणि नव्या रुपात नव्या निर्मिती संस्थेसह “पुन्हा सही रे सही” अवतरलं. गेली १८ वर्षं या नाटकाने प्रेक्षकांना हसवत ठेवलं आहे.
या नाटकाला अनेक मान्यवरांची दाद मिळाली शिवसेना वर्धापनदिनाच्या एका भाषणात उल्लेख करताना बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, ” कराचीला बसने लालुप्रसादना पाठवण्याऐवजी आमच्या गलगलेंना पाठवा. बोलून बोलून अर्ध्याहून अधिक लोकांना गारद करतील.” भरतच्या गलगलेंना मिळालेली ती दाद होती. तर या नाटकात भरत एंट्री आणि एक्झीटची तारेवरची कसरत कशी सांभाळतो या कुतुहलापोटी राज ठाकरेंनी प्रत्यक्ष विंगेत उभं राहून हे नाटक पाहिलं होतं.
नाशिकला या नाटकाचा प्रयोग असताना बाल्कनीतल्या एका प्रेक्षकाला चुकून दोन तिकीटं आली. पण तिकीट परत करण्यासाठी खाली उतरायचा त्याने कंटाळा केला. नाटक संपल्यावर मात्र या प्रेक्षकाने अधिकच्या तिकीटाचे पैसे आवर्जून देऊ केले कारण कलाकारांनी घेतलेली मेहनत पाहिल्यावर ते फुकटचं तिकीट त्याला टोचू लागलं आणि त्याने ते तिकीटाचे पैसे देऊ केले .
या नाटकाने भरत जाधव या नावाला एक ग्लॅमर दिलं आणि त्याची जाणीव ठेवून भरतनेही आपल्या सहकलाकारांची नेहमी काळजी घेतली. या नाटकाचे प्रयोग जोरदार चालू होते तेव्हा भरतचं एका सिनेमाचं बॅंकॉकला ४० दिवसाचं शुटींग लागलं. शुटींगला जाण्याआधी भरतने नाटकाशी निगडीत सर्व २७ जणांना बोलावून त्यांच्या हातात मानधन ठेवलं. आपल्या शुटिंगमुळे सहीचे प्रयोग होत नसले तरी नाटकातील मंडळींचं आर्थिक नुकसान होऊ नये ही कळकळ त्यामागे होती. या सच्च्या प्रेरणेनेच या नाटकाला घवघवीत यश दाखवलं असावं.
सध्याच्या काळात सर्वच नाटकांचे प्रयोग बंद आहेत. मात्र या नंतर जेव्हा कधी नाट्यगृहं खुली होतील तेव्हा सलग १८ वर्षं सगळ्या अडीअडचणींवर मात करत सुरू असलेलं हे नाटक पुन्हा दिमाखात ‘सही’ घोडदौड करेल यात शंकाच नाही.