‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
बलराज सहानी यांनी जेलमध्ये राहून या सिनेमाचे शूट पूर्ण केले!
“आयुष्य हा एक मोठा रंगमंच असून आपण सर्व त्याच्या कठपुतली असून विधात्याच्या आदेशानुसार आपण त्यावर काम करीत असतो!” असं विल्यम शेक्सपियर यांनी म्हटलं होतं. याचा अनुभव आपल्या सर्वांनाच येत असतो. पण कधी कधी अतिशय गमतीदार किस्से देखील घडतात. अभिनेता बलराज सहानी (Balraj sahni) यांच्या बाबतचा हा किस्सा मोठा मनोरंजक आहे. त्यांनी एका चित्रपटाचे शूटिंग स्वतः जेलमध्ये असताना केले होते. रोज जेलमधून ते सेटवर येत काम करत आणि संध्याकाळी पुन्हा जेलमध्ये जात आणि गंमत म्हणजे सिनेमातील त्यांची भूमिका पुन्हा जेलरची होती! म्हणजे कैदी म्हणून सेटवर येत जेलरची भूमिका करत आणि पुन्हा कैदी म्हणून जेलमध्ये संध्याकाळी जात. यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकात हा किस्सा त्यांनी विस्ताराने लिहिला आहे.
१९४९ साली बलराज सहानी (Balraj sahni) जेव्हा हिंदी सिनेमात स्ट्रगल करत होते तेव्हा त्यांनी एकदा दिलीप कुमारला त्यांच्यासाठी एखादी भूमिका मिळावी म्हणून निर्मात्याकडे शब्द टाका म्हणून सांगितले होते. दिलीप कुमार तेव्हा के. असिफ यांच्या ‘हलचल’ या चित्रपटात भूमिका करत होते. दिलीप कुमारने बलराज सहानीबद्दल के आसिफ यांना सांगितले. असिफ यांनी बलराज यांच्या नाटकातील भूमिका बघितल्या होत्या त्यांनी लगेच त्यांना ‘हलचल’ या चित्रपटात नर्गिसच्या पतीची भूमिका दिली.
ही भूमिका एका जेलरची होती. ती भूमिका अधिकाधिक चांगली व्हावी म्हणून के. असिफसोबत एकदा मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये गेले. तिथे त्यांनी जेलचे संपूर्ण अंतरंग बघितले. जेलर कैद्यांशी कसे बोलतो, कसे वागतो ते पाहिले. सिनेमातील भूमिकेसाठी जेलरचा गणवेश शिवण्यासाठी आर्थर रोडच्या शिंप्यालाच सांगितले होते. त्यावेळी बलराज सहानी मुंबईच्या रंगमंचावर इप्टातर्फे काही नाटकात देखील काम करत होते.
एकदा त्यांच्या नाटकाची रिहर्सल चालू असताना त्यांना निरोप आला की ‘ताबडतोब त्यांना परळच्या कम्युनिस्ट पार्टीच्या ऑफिसमध्ये बोलावले आहे.’ बलराज (Balraj sahni) लगेच तिकडे गेले. तिथे एका मोर्चाची तयारी चालू होती. वातावरणात तणाव होता. पोलीस मोर्चाला विरोध करत होते. पण सर्व कॉम्रेड मोर्चा काढणारच होते. बलराज सहानी यांनी तिथल्या मोर्चा समोर मोठे जोशपूर्ण भाषण दिले. मोर्चा सुरू झाला. पोलिसांनी लाठी हल्ला केला आणि सर्व मोर्चेकऱ्यांना पकडून जेलबंद केले!
गंमत म्हणजे या सर्व मोर्चेकऱ्यांना आर्थर रोड जेलमध्ये आणले गेले. बलराज यांना पाहून जेलरला तो चेहरा ओळखीचा वाटला कारण काही दिवसापूर्वीच जेल पाहण्यासाठी बलराज तिथे आले होते. जेलर त्यांना म्हणाला, ”आपण यापूर्वी कधी भेटलो आहोत का?” बलराज सहानी (Balraj sahni) यांनी आपली ओळख सांगितली नाही ते म्हणाले, ”नाही. आपण आज पहिल्यांदाच भेटत आहोत!” नंतर रोजच तो जेलर बलराजकडे पाहायचा त्याला काहीतरी आठवायचे पण नेमकी ओळख पटत नव्हती! बलराज यांनी पंधरा दिवसांपूर्वीच या जेलमध्ये सिनेमाच्या भूमिका अभ्यास करण्यासाठी चक्कर टाकली होती आणि आज तिथे ते राजकीय कैदी म्हणून दाखल झाले होते!
=========
हे देखील वाचा : नासिरुद्दीन शहाने ‘मिर्झा गालिब’चा रोल कसा मिळवला?
=========
पण एक दिवस त्यांचे हे सोंग उघडकीस आले. एकदा बलराज यांना निरोप आला की, ”तुम्हाला जेलर साहेबांनी ऑफिसमध्ये बोलावले आहे.” तिथे के असिफ बसले होते. त्यांनी सर्व भांडाफोड केली होती. आता बलराजला पाहिल्यानंतर जेलर मोठ मोठ्याने हसू लागला आणि म्हणाला, ”कब तक छुपाओगे अपने आप को कलाकार?” बलराजने देखील त्याला हसून प्रत्युत्तर दिले. के. असिफ यांनी मुंबई पोलीस कमिशनरकडून स्पेशल परवानगी घेऊन आले होते.
त्यांनी सिनेमाच्या शूटिंगसाठी बलराज सहानी यांना परवानगी दिली होती. आता रोज सकाळी बलराज (Balraj sahni) जेलमधून सेटवर शूटिंगसाठी जात आणि शूटिंग संपल्यानंतर संध्याकाळी परत आर्थर रोड जेलमध्ये येत. गंमत म्हणजे चित्रपटातील त्यांची भूमिका एका जेलरची होती! सिनेमाचे काही शॉट्स आर्थर रोड जेलमध्ये देखील घेतले गेले होते. माणसाचं रिल लाईफ आणि रियल लाईफ असं मिक्स होतं असतं!