Bappi Lahiri : ‘या” गाण्याच्या मेकिंगची भन्नाट स्टोरी!
संगीतकार बप्पी लहिरी (Bappi Lahiri) यांच संगीत आर डी प्रमाणेच होते. पाश्चात्य आणि भारतीय संगीताचा वापर करून त्यांनी सिनेमाला संगीत दिले. अनेक सुश्राव्य गाणी आज देखील लोकप्रिय आहेत. बप्पीने भारतीय सिने संगीतात डिस्को युग आणलं हे जरी खरं असलं तरी त्याने काही गाण्यातून अभिजात भारतीय संगीताचा, लोकसंगीताचा, रवींद्र संगीताचा फार चांगल्या रितीने वापर केला होता. त्याच्या पाश्चात्य संगीताच्या बाजाने त्याच्या गाण्यातून कायम आशा भोसले, एस. जानकी, अलिशा चिनॉय यांचा आवाज असायचा. तरी देखील आपल्या सिनेमातील एका तरी गाण्यात लताचा स्वर असावा असे त्याला कायम वाटे व त्यासाठी तो कायम प्रयत्नशील रहायचा.
ऐंशीच्या दशकात सिनेमा संगीत जेव्हा अगदी रसातळाला गेलं होतं त्या काळात बप्पी, इंदीवर, श्रीदेवी, जितेंद्र, जयाप्रदा हे पंचक जोरात होतं. असं असताना देखील सिनेमात एखादं तरी लताचं गाणं बप्पी ठेवायचा व ते उठून दिसायचं. उदाहरणच द्यायचं म्हणजे नयनोंमे सपना (हिम्मतवाला), अलबेला मौसम कहता है स्वागतम( तोहफा) और भला क्या माँगू मैं रब से मुझे तेरा प्यार मिला (थानेदार), बंधन टूटे ना सारी ज़िन्दगी (पाप की दुनिया). (Untold stories)
१९९० साली एक सिनेमा आला होता के सी बोकाडीयांचा ’आज का अर्जुन’ यात अमिताभ-जयाप्रदा ही पेयर होती. यातील ’गोरी है कलाईयां’ हे गाणं खूप गाजलं. वस्तुत: या गाण्याला पार्श्वभूमी होती एका राजस्थानी लोक गीताची. या गाण्याच्या अंतर्याच्या कोरसमध्ये ’आधी बन्ना रे बागा में झूला गाल्या” या राजस्थानी लोकगीताच्या ओळी येतात. यावर लताचे उत्तर असते ’आया रे छैल भँवर जी आया’. लोकसंगीत आणि सिने संगीत यांच चांगल सिंक्रोनायझेशन इथे बघायला मिळतं. मूळ लोकगीत राजस्थानच्या घूमर लोकनृत्य शैलीत केलं जात. यात रंगीत लांब घागरा घातलेल्या मुली बहारदार नृत्य करतात. तोच ठेका तोच ताल पकडून गाणं बनविण्याचा आग्रह के सी बोकाडीयांचा होता. जे स्वत: राजस्थानचे आहेत. (Bappi Lahiri)
या गाण्याच्या रेकॉर्डींगच्या वेळी बप्पी लहिरी (Bappi Lahiri) यांनी अनेक आकाराचे मातीचे माठ आणून ठेवले होते. या मटक्यांच्या आवाजाचा या गीतात फार चांगला उपयोग केला गेला. या गीतात लताच्यासोबत शब्बीर कुमारचा आवाज होता. अमिताभ (Amitabh Bachchan) ने अलीकडेच सोशल मिडीयावर या गाण्याबाबत लिहिले ते म्हणाले ’या गीताचे चित्रीकरण एवढ्या उत्साहाने व उर्जेने केले गेले की जयाप्रदाच्या पदन्यासाला साथ देणं मला खूपच कठीण गेलं. शूटींगचा सारा माहौल उत्साहाने ओसंडून वाहत होता. जयपूरच्या गल्ली बोळात आजही या गाण्याची लोकप्रियता अबधित आहे. बप्पीच्या संगीताला सलाम.’ (Entertainment mix masala)
============
हे देखील वाचा : Satyajit Ray : यांना बॉलीवूडच्या कलाकारांनी केली होती मोलाची मदत !
============
हा सिनेमा तसा काही फार इतर अमिताभच्या सिनेमा इतका हिट नव्हताच पण या गाण्याने अमिताभचं स्थान देखील अबाधित राहिलं. कारण अमिताभ राजकारणातून परतल्या नंतरचा हा सिनेमा होता. बोफोर्स प्रकरणाने त्याच्याबाबत प्रेक्षकांच्या मनात संमिश्र भाव होते. या पार्श्वभूमीवर १० ऑगस्ट १९९० रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला. मेट्रो सिटीज याचे थंडे स्वागत झाले पण हिंदी बेल्टमध्ये सिनेमा सुपर हिट झाला. ‘गोरी है कलाइया…’ हे गाणं १९९० सालच्या बिनाका गीत मालातील टॉपचं गाणं होतं. दुसर्या क्रमांकावर “कबूतर जा जा” (मैंने प्यार किया) आणि तिसर्या क्रमांकावर “मुझे नींद न आये” (दिल) ही गाणी होती.
‘आज का अर्जुन’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून बप्पी लहिरी (Bappi Lahiri) तर सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री म्हणून राधिकाला फिल्मफेअरचे नामांकन मिळाले होते.