‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
‘नाईकी’ आणि मायकल जॉर्डन यांच्यामधील करारावर आता येतोय हॉलिवूडपट!
बलाढ्य कंपन्या आपल्या उत्पादनांच्या जाहिरातींसाठी किंवा ब्रँड अम्बॅसॅडर म्हणून लोकप्रिय स्टार्स तसंच फॉर्मात असलेल्या खेळाडूंना करारबद्ध करत असतात. (त्यावरूनच सध्या एक वाद आपल्याकडे ‘चघळला’ जातोय.) पण बास्केटबॉलचा बादशहा मायकल जॉर्डन आणि नाईकी (NIKE) यांच्यात ८० च्या दशकात जो करार झाला होता, तो आजपर्यंतचा स्पोर्ट्स ब्रँड्समधला सर्वात धनाढ्य करार मानला जातो.
मायकल जॉर्डनसोबत हा करार घडवून आणला होता ‘नाईकी’चा त्यावेळचा मार्केटिंग हेड सनी वाकारो याने. ‘नाईकी स्नीकर मॅन’ अशीच त्याची पुढील काळात ओळख बनली. याच सनी वाकारोच्या आयुष्यावर आधारित एका चित्रपटावर सध्या हॉलिवूडमध्ये काम सुरू आहे. (Nike And Michael Jordan Story)
हॉलिवूड स्टार आणि ‘आर्गो’सारख्या चित्रपटांचा दिग्दर्शक बेन ॲफ्लेक हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. बेन आणि मॅट डेमन सध्या संहितेवर काम करत आहेत. मॅट डेमन यात सनी वाकारोची व्यक्तिरेखा साकारणार आहे, तर बेन ॲफ्लेक यात ‘नाईकी’चे सह-संस्थापक फील नाईट यांची भूमिका साकारणार आहे.
ॲलेक्स कॉन्वरी याने ‘एअर जॉर्डन’ या नावाने मूळ संहिता लिहिली होती, आता त्याच पटकथेवर बेन आणि मॅट शेवटचा हात फिरवतायत. नाईकी आणि मायकल जॉर्डन यांच्यात झालेल्या कराराने त्याकाळी स्नीकर इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडवून दिली होती. (Nike And Michael Jordan Story)
१९८४ साली ‘नाईकी’ने मायकल जॉर्डनला २५ लाख अमेरिकन डॉलर्स एवढी घसघशीत रक्कम देऊन करारबद्ध केलं होतं. आजच्या बाजारभावाशी तुलना केली, तर हीच किंमत १३० कोटी अमेरिकन डॉलर्स एवढी होईल.
‘नाईकी’ने तेव्हा ‘एअर जॉर्डन’ अशी एक नवीन स्नीकर सिरीजच लाँच केली होती. त्याकाळात ‘नाईकी’चा या इंडस्ट्रीत फार दबदबा नव्हता. कॉन्व्हर्स आणि आदिदास या नामांकित कंपन्यांपुढे तर, ‘नाईकी’ खूपच लहान कंपनी होती. मायकल जॉर्डनला करारबद्ध केल्यानंतर पुढील चार वर्षात ‘एअर जॉर्डन’ शूज विक्रीतून ३० लाख डॉलर्स उत्पन्न मिळेल, असा ‘नाईकी’चा अंदाज होता. पण पहिल्याच वर्षी तब्बल १२ कोटी ६० लाख डॉलर्स किमतीचे शूज विकले गेले आणि हे शक्य झालं फक्त आणि फक्त मायकल जॉर्डनच्या लोकप्रियतेमुळे. (Nike And Michael Jordan Story)
त्यानंतर ‘नाईकी’ ही या क्षेत्रातली दादा कंपनी बनली आणि तिचं हे स्थान आजही कायम आहे. पुढे जाऊन २००३ साली ‘नाईकी’ने कॉन्व्हर्स ही कंपनीसुद्धा विकत घेतली. ८० च्या दशकात याच कॉन्व्हर्स कंपनीने मायकल जॉर्डनला करारबद्ध करण्यास नकार दिला होता.
सनी वाकारो याने ‘नाईकी’ला तिसऱ्या स्थानावरून पहिल्या क्रमांकावर कसं आणलं, मायकल जॉर्डनला करारबद्ध करण्यासाठी कसं जंग जंग पछाडलं याचा संपूर्ण प्रवास चित्रपटातून आपल्यासमोर येणार आहे. खरंतर, मायकल जॉर्डन हा स्वतः ‘आदिदास’ ब्रॅण्डचा चाहता होता. ‘आदिदास’कडून येणाऱ्या ऑफरची तो वाट बघत होता, पण तरीही ‘नाईकी’ने अशक्य वाटणारं डील प्रत्यक्षात आणलं होतं. सनी वाकारो यासाठी मायकलच्या आई-वडिलांनाही भेटला होता. आई-वडिलांनी मायकलचं मन कसं वळवलं, हा भागही चित्रपटात असणार आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे मायकल जॉर्डनची व्यक्तिरेखा चित्रपटात असणार नाही. चित्रपटरसिक आणि बास्केटबॉलचे चाहते यांच्यासाठी ही खूपच निराशाजनक बातमी आहे, पण तरीही बेन ॲफ्लेक आणि मॅट डेमनमुळे चित्रपटाबद्दल कुतूहल निर्माण झालेलं आहे, असं म्हणता येईल.
======
हे देखील वाचा – हॉलिवूडच्या चित्रपटांना बसतोय चीनमधील सेन्सॉरशिपचा विळखा
======
बेन आणि मॅट हे अगदी लहानपणापासूनचे मित्र. हॉलिवूडमध्ये बालकलाकार म्हणून बेन ॲफ्लेकची कारकीर्द सुरु झाली आणि त्यानेच मॅट डेमनला हॉलिवूडमध्ये आणलं. या दोघांनी मिळून लिहिलेल्या ‘गुड विल हंटिंग’ चित्रपटाला लेखनासाठी ऑस्कर मिळालं होतं. (Nike And Michael Jordan Story)
गेल्याच वर्षी त्यांनी ‘द लास्ट ड्युअल’ हा चित्रपट लिहिला आणि दोघांनी त्यात अभिनयही केला. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फारशी कमाल दाखवू शकला नाही. पण त्यानंतर आता दोघे पुन्हा एकदा ‘सनी वाकारो’वरील चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र संहिता लिहीतायत आणि बेन ॲफ्लेक दिग्दर्शित करत असलेल्या चित्रपटात मॅट डेमन मुख्य भूमिकेत असेल, हेही यानिमित्ताने पहिल्यांदाच घडणार आहे. (Nike And Michael Jordan Story)
======
हे देखील वाचा – नेटफ्लिक्स: आमची सगळीकडे शाखा आहे!
======
नाईकी आणि मायकल जॉर्डन मधील जगप्रसिद्ध कराराची गोष्ट नेटफ्लिक्स वरील ‘द लास्ट डान्स’ या डॉक्यु-सिरीजमध्येही आलेली आहे. त्याचबरोबर ‘ईएसपीएन’ची निर्मिती असलेल्या ‘द सोल मॅन’ (The Sole Man) या माहितीपटातही याच विषयावर भर देण्यात आला आहे.