अमेझॉन प्राईम: ओटीटीची १ महिन्याची ट्रायल घेतली आहे? या वेबसिरीज आवर्जून बघाच
अमेझॉन प्राईम अनेकदा एक महिन्यासाठी ट्रायल सबस्क्रिप्शन देतं, ते ही अगदी फ्री मध्ये. एकदा का एक महिन्यासाठी फ्री सबस्क्रिप्शन मिळालं की, समोर मनोरंजनाचा खजाना उघडला जातो. पंचायत, मिर्झापूर, पाताल लोक, फॅमिली मॅन अशा ठराविक लोकप्रिय सिरीज बघून झाल्यावर मात्र आता काय बघायचं, असा प्रश्न पडतो. म्हणूनच या लेखात अमेझॉन प्राईमवर आवर्जून बघाव्यात अशा दर्जेदार वेबसिरीजबद्दलची माहिती दिली आहे – (Amazon Prime – Web series)
१ ब्रीद (Breathe)
ब्रीद ही सिरीज वडील आणि मुलाच्या नात्यावर आधारित आहे. आपल्या मुलावर जीवापाड प्रेम करणाऱ्या व्यक्तीला जेव्हा मुलाला असणाऱ्या गंभीर आजारातून त्याला वाचवणं कठीण आहे, असं समजतं तेव्हा त्याची काय अवस्था होत असेल? अशावेळी त्याला वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जाणारा बाप रंगवला आहे आर माधवन याने. ही सिरीज केवळ मनोरंजन करत नाही तर, ऑर्गन डोनेशनविषयी समाज प्रबोधनही करते. एका वेगळ्या वळणावरचं हे कथानक आवर्जून बघावं असं आहे. शिवाय ही सिरीज तुम्ही अगदी सहकुटुंब पाहू शकता.
२. अफसोस (Afsos)
थोडीशी कॉमेडी, थोडासा सस्पेंस, थोडीशी ड्रामाटिक, थोडीशी रोमँटिक आणि किंचितशी हॉरर असा सगळं मसाला एकत्र करून निर्माण झालेली कलाकृती म्हणजे ‘अफसोस’. एक मुलगा ज्याला सगळीच दुर्लक्षित करतात तो या सिरीजचा नायक आहे. आयुष्यातल्या अपयशाला कंटाळलेला हा मुलगा आत्महत्या करायचा प्रयत्न करतो, पण प्रत्येकवेळी त्याला कोणी ना कोणी वाचवतं. हा सगळा गोंधळ चाललेला असताना उत्तर प्रदेशातील एका शांत गावात एकाच वेळी तेरा साधूंची हत्या होते आणि एक साधू बेपत्ता असतो. या साधूंचा आणि त्या मुलाचा काय संबंध असतो हे मात्र वेबसिरीजमध्येच बघा. (Amazon Prime – Web series)
३. बेस्टसेलर (Bestseller)
एक लेखक ताहीर वझीर आणि त्याची ऍडव्हटायझिंग डायरेक्टर असणारी पत्नी मयांका यांच्या आयुष्यात मीतू माथूर वादळ बनून येते. ताहीर वझीरला त्याच्या बेस्टसेलर पुस्तकानंतर आलेला रायटर्स ब्लॉक खूप वर्ष गेलेला नसतो. तो एका नव्या कथेच्या शोधात असतो आणि त्याचा शोध मीतू माथूरपाशी येऊन थांबतो. पण मीतू माथूरवर हल्ला होतो. ताहीर वझीरला ट्विटरवर फॉलो करणाऱ्या एका अकाऊंटवरून धमक्या मिळू लागतात. त्याचा लॅपटॉप हॅक केला जातो. एकामागून एक विचित्र घटना घडत जातात. सिरीज बऱ्यापैकी सस्पेन्स आहे. सुरुवातीचे भाग चांगले झाले आहेत नंतर मात्र सस्पेन्स उघड झाल्यामुळे सिरीजमधला रस काहीसा कमी होतो, पण प्रत्येक भागाचा शेवट पुढचा भाग बघायला भाग पाडतो.
४. बंदीश बँडिट्स (Bandish Bandits)
नावावरूनच लक्षात आलं असेल की, ही सिरीज संगीतावर आधारित आहे. ही एक म्युझिकल वेबसिरीज आहे. वेबसीरिजच्या दुनियेतला हा एक वेगळा प्रयोग म्हणता येईल अर्थात सिरीजच्या कथानकामुळे यामध्ये गाणी आहेत. शास्त्रीय संगीताचा सुरेल प्रवास यामध्ये आहे. परस्परविरोधी व्यक्तिमत्त्व असलेल्या दोन गायकांच्या आत्मशोधाच्या प्रवासाची कहाणी यामध्ये दाखवण्यात आली आहे. ही सिरीज अगदी सहकुटुंब बघता येईल. (Amazon Prime – Web series)
===============
हे ही वाचा: रात्री घरात एकटे असाल तर, चुकूनही बघू नका या 5 हॉरर हिंदी सिरीज
जेव्हा बाबूजींनी निशिगंधा वाड यांना चेहऱ्यावरचा मेकअप उतरवायला लावला तेव्हा …
==============
५ मुंबई डायरीज 26/11 (Mumbai Diaries 26/11)
ही सिरीज २६/११ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित आहे. त्यावेळी घडलेल्या घटना, ओढवलेली परिस्थिती यामध्ये पोलीस, डॉक्टर्स, ताज हॉटेलमधले कर्मचारी आणि कित्येक सर्वसामान्य नागरिकांवर ओढवलेल्या परिस्थितीची ती बाजू समोर आली जी न्यूज चॅनेल्स किंवा वर्तमानपत्रांमधून समजू शकली नाही. त्यावेळी पोलीस, प्रशासन, हॉस्पिटल्स, हॉटेलचे कर्मचारी आणि मुंबईचे नागरिक कोणत्या मानसिकतेमधून गेले असतील याचं यथासांग चित्रण सिरीजमधून करण्यात आलं आहे. ही सिरीज बघताना डोकं सुन्न होतं. शक्यतो ही सिरीज लहान मुलांसोबत बघू नका. आक्षेपार्ह दृश्य नाहीत, पण हा दहशतवादी हल्ला एवढा हिंसक होता की, ती दृश्य लहान मुलांच्या मनावर परिणाम होऊ शकतो.