‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
झटक्या: कविता समजलेला राजा
‘जाऊंद्याना बाळासाहेब’ (Jaundya Na Balasaheb) च्या ट्रेलरमध्ये सर्वप्रथम आपल्याला दिसतो तो ‘झटक्या’. लायटीच्या खांबावर चढून “बाळासाहेब ओ बाळासाहेब” अशी हाळी देणारा ‘झटक्या’. निरागस चेहरा आणि नजरेतील भाबडेपणा बेमालूमपणे एकत्र करत प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता म्हणजे भाऊ कदम. ‘जाऊंद्याना बाळासाहेब’मध्ये भाऊने ‘झटक्या’ नावाच्या इलेक्ट्रिशनची भूमिका साकारलीय. अंगात लाल टी-शर्ट, त्यावर MSEBचा बटनं न लावलेला खाकी शर्ट आणि खाली मळखाऊ तपकिरी रंगाची पँट घालणारा ‘झटक्या’ हा बाळासाहेबांचा अगदी जीवश्च् कंठश्च् नसला तरी एक चांगला मित्र आहे.
इतकी वर्षं काम करूनही ‘झटक्या’ला MSEB ने काही कारणास्तव नोकरीत पर्मनंट केलेलं नाही पण ‘झटक्या’ तरीही निर्धास्तपणे आपली सेवा बजावताना दिसतो. गावातल्या तमाम लहान मुलांचा आणि ‘झटक्या’चा एकमेकांवर जीव आहे. त्याला त्यांच्यासोबत खेळायला, त्यांना खेळवायला आवडतं. आपल्या सुरक्षेसाठी असलेले हँडग्लोव्ह्ज तो त्या लहानग्यांना खेळणी म्हणून खेळायला देतो आणि स्वतः मात्र विजेचे धक्के पचवत काम करतो. खांबावर काम करताना सतत असे सौम्य धक्के खाल्ल्याने ‘झटक्या’च्या देहबोलीतही फरक जाणवतो. थोड्याथोड्या वेळाने मिचमिचणारे डोळे आणि उजवा खांदा शॉक बसल्यासारखा उडवायची लकब भाऊने पूर्ण चित्रपटात व्यवस्थित दर्शवली आहे.
‘झटक्या’कडे पुरेशी व्यावहारिकता नाही. त्याचं काम आणि गावातली लहान मुलं एवढंच मर्यादित भावविश्व आहे त्याचं. स्वतःचं असं काही ठाम मत नाही आणि असलंच तरी त्याला किंमत नाही त्यामुळे मान खाली घालून निमुटपणे मोठ्यांचंही ऐकायचं नि लहानांचंही ऐकायचं हा शिरस्ता त्याच्या अंगवळणी पडलाय. हँडग्लोव्ह्ज पोरांना देतो म्हणून पर्मनंट नोकरी मिळत नाही अशी बाळासाहेबांनी (गिरीश कुलकर्णी) टर उडवल्यावर तो कसंनुसं हसून ती वेळ मारून नेतो. दिवसभर गावात राबून आल्यावर मोठ्या वहिनीचे विखारी टोमणे ऐकत ताटात वाढलंय तेवढंच जेवणाऱ्या ‘झटक्या’वर त्याचा एकुलता एक पुतण्या फार जीव लावतो. आपल्या ताटातली गरमागरम भाकर ‘झटक्या’च्या ताटात टाकून त्याला ती संपवण्याची गोड दमदाटीही करतो.
फक्त बाळासाहेबांनी सांगितलंय म्हणून तो नाटकात अभिनय करायला तयार होतो आणि योगायोगाने त्याला राजाची भूमिकाही मिळते. स्वतःच्या शौकात मश्गुल होऊन प्रजेकडे आणि राज्यकारभाराकडे दुर्लक्ष करणारा राजा ‘झटक्या’ला साकारावा लागतो तर आपल्या आशयघन कवितांमधून त्या राजाचे डोळे उघडणाऱ्या कवीची भूमिका बाळासाहेबांच्या वाट्याला येते. याच नाटकात बाळासाहेब आणि करिश्माच्या (सई ताम्हणकर) आलिंगनाचा एक प्रसंग असून, त्यावर बेतलेल्या ‘ब्रिंग इट ऑन’ गाण्यात ‘झटक्या’ एका हातात चमचमणारे हँडग्लोव्ह आणि गॉगल घालून नाचताना दिसतो. वास्तविक, सई, गिरीश आणि भाऊ (Bhau Kadam) हे काही प्रोफेशनल डान्सर्स नाहीत पण या गाण्यामध्ये तिघांनीही जमेल तसा डान्स करत हे दिव्य पार पाडले आहे. त्यातल्या त्यात भाऊ आपला जबरदस्त स्वॅग दाखवत या गाण्यात भाव खाऊन जातो.
बाळासाहेबांना आपल्या भूमिकेची जाणीव व्हावी यासाठी नाटकाचा दिग्दर्शक विकास (श्रीकांत यादव) आणि लेखक जीवन (किशोर चौगुले) ‘झटक्या’वर एक महत्त्वाची जबाबदारी टाकतात. त्यानुसार ‘झटक्या’ बाळासाहेबांसाठी दुर्गा भागवत, महेश एलकुंचवारांची पुस्तके वाचू लागतो. कवीच्या भूमिकेतील बाळासाहेबांना पुस्तक वाचून दाखवताना राजा बनलेल्या ‘झटक्या’चंही अज्ञान दूर होत जातं आणि त्याच्या कवीमनाला उभारी मिळते. नाटक बसतं, रंगमंचावर उभंही राहतं, ‘झटक्या’ अभिनय आणि प्रकाश संयोजनाची दुहेरी कसरतही पार पाडतो आणि शेवटच्या क्षणी बाळासाहेब माती खातात. या नाटकातला राजा हे आपलंच प्रतिबिंब असल्याची बाळासाहेबांना जाणीव होते आणि इतके दिवस या नाटकाला आणि कलाकारांना गृहीत धरून चालल्याची खंत ते व्यक्त करतात. हा पूर्ण प्रसंग गिरीश कुलकर्णींनी अप्रतिमरीत्या रंगवलाय. परदुःखाची जाण दर्शवणाऱ्या या प्रसंगाचा पाया जरी जीवन, विकास आणि बाळासाहेबांनी घातला असला तरी यावर कळस चढवलाय तो ‘झटक्या’ आणि त्याच्या कवितेने.
लाईटरूममध्ये बसलेल्या ‘झटक्या’ला रंगमंचावर बोलवताना बाळासाहेब प्रेक्षकांना त्याची ओळख करून देताना तोच हँडग्लोव्हचा किस्सा सांगतात, ज्यावरून त्यांनी एकेकाळी ‘झटक्या’ची टर उडवली होती. राजा बनलेल्या ‘झटक्या’च्या मनातील संवेदनशीलता त्यांनी जाणलेली असते. बाळासाहेबांच्या आग्रहावरून ‘झटक्या’ त्याची स्वरचित कविता प्रेक्षकांसमोर सादर करू लागतो….
“वाट दिसू दे गा देवा, वाट दिसू दे.. वाट दिसू दे गा देवा, गाठ सुटू दे..”
….कविता वाचणाऱ्या ‘झटक्या’चा स्वर कातर होत जातो आणि भारावलेलं प्रेक्षागृह टाळ्यांनी दणाणून उठतं. खऱ्याखुऱ्या राजाला कविता कळल्याचा साक्षात्कार होऊन पडदा पडतो आणि ‘झटक्या’ बाळासाहेबांना कडकडून मिठी मारतो. संपूर्ण चित्रपटाचं सार एका कवितेतून मांडणारा हा प्रसंग भाऊच्या वाट्याला आलेला असून, त्याने आपल्या अभिनयसामर्थ्याच्या जोरावर इतर कलाकारांच्या भाऊगर्दीतही स्वतःचं वेगळेपण सिद्ध केलेलं आहे.
या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन गिरीश कुलकर्णी यांचं असून त्याला अजय-अतुल यांची सांगीतिक साथ लाभलेली आहे. हा चित्रपट वरच्या थरावर नेऊन ठेवणारी कविता रूह यांची असून, अजय गोगावले आणि योगिता गोडबोले या जोडगोळीने ती स्वरबद्ध केली आहे. चित्रपटाचा एकंदरीत आशय आणि त्याची संभाव्य परिणामकारकता अधोरेखित करणारी ही कविता सादर करण्याचा प्रसंग भाऊने अतिशय उठावदार केलेला आहे. रीमा लागू, मोहन जोशी, दिलीप प्रभावळकर यांच्यासारखे दिग्गज कलाकार त्यासोबतच गिरीश कुलकर्णी, श्रीकांत यादव, सई ताम्हणकर, किशोर चौगुले, मनवा नाईक, देवेंद्र गायकवाड, सविता प्रभुणे अशी भलीमोठी स्टारकास्ट असतानाही भाऊने साकारलेला ‘झटक्या’ आपली वेगळीच छाप पाडून जातो.
भाऊने साकारलेला ‘झटक्या’ पाहून म्हणावेसे वाटते, झाले बहु, होतिल बहु, आहेतहि बहु, परंतु यासम हाच!
=====
हे देखील वाचा: या कारणामुळे भाऊ कदमला डोंबिवली प्रिय
=====