Bhirkit Movie Review: भरकटलेल्या मानवतेचा पट
माणूस हा माणसापासूनच लांब होत चालला आहे. माणसातील माणूसपण हरवत चालले आहे. याचा प्रपंच दिग्दर्शक अनुप जगदाळे याने त्याच्या ‘भिरकीट’ या सिनेमात बारकाईने मांडला आहे. आपल्या सर्वांच्या आयुष्यात सर्वांमध्ये एक ‘भिरकीट’ असते. आनंद असो वा दुःख ‘भिरकीट’ आपल्या मागे लागतंच. विशेषतः ‘भिरकीट’ हा शब्द खेडेगावात सर्रास वापरला जातो.
‘भिरकीट’ हे आपल्या मागे लागलेल एक अदृश्य शस्त्र आहे. या चित्रपटात ‘भिरकीट’ मागे लागल्यावर नेमकं काय होतं? समाजातील वेगवेगळ्या स्तरावरील माणसं त्या ‘भिरकीट’ होण्याच्या परिस्थिती नेमकं काय करतात? हे दाखवण्याचा प्रयत्न लेखक दिग्दर्शकानं सिनेमात केला आहे. (Bhirkit Movie Review)
पण, यावेळी त्यानं सरळ हातानी घास तोंडाकडे नेलेला नाही तर वळसा घालून घास तोंडापाशी नेला आहे. अपरिणामी हा मानवतेचा उपहासात्मक प्रपंच कधी विनोदी, कधी नाट्यमय तर कधी भावनिक होतो. मानवी मनाच्या विविध भावनिक पदर हाताळताना त्याला मिळालेला विनोदी तडका सिनेमाला पाहण्याजोगा बनवतो. याला आपण एकप्रकारची ब्लॅक कॉमेडी म्हणू शकतो. जी आपल्याला गुदगुदल्या ही करते आणि बारीक चिमटे देखील काढते.
ही एका गावातील गोष्ट आहे. गावामध्ये एक अशी घटना घडते, ज्याचा प्रभाव गावातील प्रत्येक व्यक्तीवर पडतो आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी जी धडपड, धमाल सुरु असते, ती म्हणजे ‘भिरकीट’. माणुसकी, कौटुंबिक नाते, प्रेमकहाणी, राजकारण, तळागाळातील स्थानिक परिस्थिती असा बहुढंगी कथानकाचा पसारा आहे.
ज्याला जे पाहण्यात आनंद मिळतो; प्रेक्षकांनं त्याचा आनंद घ्यावा. व्यावसायिक गणित जुळावी यासाठी सिनेमात नाच-गाण्याचा मारा करण्यात आला आहे. जो प्रत्यक्षात पडद्यावर अगदीच बटबटीत आहे. सोबतच दिग्दर्शकाने काही प्रसंग अधिकचे ताणले आहेत. पटकथाकार आणि संकलकाने काही ठिकाणी आपल्या भावनांना आवर घालायला हवा होता.
सिनेमात गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, कुशल बद्रिके, सागर कारंडे, मोनालिसा बागल, तानाजी गालगुंडे, कैलास वाघमारे, उषा नाईक, याकूब सय्यद, श्रीकांत यादव, मीनल बाळ, राधा सागर अशा अनुभव आणि नवख्या कलाकारांची संमिश्र फळी आहे. ज्यांनी विविधांगी भूमिका लीलया निभावल्या आहेत. प्रत्येक व्यक्तिरेखेच वेगळेपणे दिग्दर्शकाने पडद्यावर रेखाटले आहे. ही प्रत्येक व्यक्तिरेखा समाजातील विविध स्तरावरील विविध वयोगटातील आणि श्रेणीतील लोकांचं प्रतिनिधित्व करते. एखादी घटना घडल्या नंतर त्या घटनेचा परिणाम कोणावर कसा होतो? याचं चित्रण सिनेमात आपल्याला दिसते. (Bhirkit Movie Review)
नाटोशी नावाच्या गावातील ही गोष्ट आहे. माणुसकीचं धर्म हा कसा दुर्मीळ होत आहे. याचे मार्मिक सत्य आपल्याला पाहायला मिळतं. गावात जाबर नामक एका म्हाताऱ्याचं निधन होतं. जाबर ही एक अशी व्यक्ती होती; ज्यानं गावकऱ्यांच्या भल्यासाठी बरंच काही केलं होतं. परिणामी जाबरच्या जाण्याचं दुःख गावकऱ्यांना होतं. पण, हे दुःख त्याच्या पोटच्या पोरांना, सुनांना कितपत होतं? वडिलांचं निधन झाल्यानंतर ते जमीन, घरदार विकण्याच्या विचारात का गुंतले? गावातील राजकारणी जाबरचं तेरावं तेरा दिवसांनी तर स्वार्थासाठी अवघ्या काही दिवसांनी लगेच करावं; असं सुचवतो.
माणूस स्वार्थासाठी कोणत्या थराला जाऊ शकतो? तो तसा का वागतो याचा मानवी प्रपंच सिनेमात पाहायला मिळतो. मार्मिकतेने अत्यंत उपहासात्मक पद्धतीनं समाजातील माणुसकीचे दर्शन हा सिनेमा आपल्याला घडवतो. एकीकडे हा सिनेमा आपल्याला समाजाच्या एका वृत्तीचा आरसा दाखवत असताना दुसरीकडे तो नावाप्रमाणे भरकटला देखील आहे. दिग्दर्शकाला सिनेमात काहीशी नाट्यमयता आण्यासाठी ते करावं लागलं असावं. परंतु, सिनेमातील प्रेमप्रकरणाचा ट्रॅक पुरता कंटाळवाणा आहे. जो सिनेमांच्या मूळ विषयाचे गांभीर्य कमी करतो. हा ट्रॅक पटकथेत ठराविक पूरक लांबीचा असायला हवा होता.
=====
=====
सिनेमाची सर्वात जमेची बाजू म्हणजे सर्व कलाकारांचा नैसर्गिक अभिनय. गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, श्रीकांत यादव, कुशल बद्रिके, सागर कारंडे, तानाजी गालगुंडे, कैलास वाघमारे, उषा नाईक, याकूब सय्यद, मोनालीसा बागल, राधा कुलकर्णी आदी सर्वांची कामं उत्तम केली आहेत. ऋषिकेश जोशी याने त्याचे प्रत्येक सिन लीलया निभावले आहेत. भूमिकेतील बारकावे पकडले आहेत. गिरीश कुलकर्णी यांच्या कामात त्यांच्या अनुभवाचा सय्यम दिसून येतो. सिनेमा डोळ्यात अंजन घालणारा आणि चेहऱ्यावर हास्यकल्लोळ आणणारं आहे.
चित्रपट: भिरकीट
निर्माते: सुरेश ओसवाल, भाग्यवंती ओसवाल
लेखन, दिग्दर्शन: अनुप जगदाळे
कलाकार: गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, कुशल बद्रिके, सागर कारंडे, उषा नाईक, मोनालीसा बागल
दर्जा : २.५ स्टार