स्वतःला कामातून सिद्ध करणारी भूमी
मोह मोह के धागे. हे मोनाली ठाकूरनं गायलेलं दम लगा के हईशा या चित्रपटतील गाण आठवतं. हे गाणं ओठावर आलं की पहिली समोर येते ती, चांगली लठ्ठ झालेली भूमी पेडणेकर. भूमीचा हा पहिलाच चित्रपट. बॉलिवूडमध्ये एन्ट्री घ्यायची म्हटलं की नवोदीत अभिनेत्री काय काय करतात. एक तर आपली झिरो फिगर दाखवण्यासाठी त्यांचा आटापिटा असतो. कपड्यांची फॅशन तर विचारायलाच नको. सोबतीला भरपूर अंगप्रदर्शन. पण या सर्वांत भूमीची एन्ट्री ही खास ठरली. चित्रपटात अभिनय करायचा असतो. अंगप्रदर्शन नाही. हे तिनं दाखवून दिलं. दम लगा के हईशा मध्ये तिने जाड्या मुलीची भूमिका केली. या भूमिकेनं भूमीचं नाव टॉपच्या अभिनेत्रीमध्ये समाविष्ट झालं. कारण या चित्रपटांनं त्यावर्षीचे सर्वच पुरस्कार जिंकले. ही भूमीच्या अभिनयाची ताकद होती. अर्थात प्रत्यक्ष चित्रपटात येण्यापूर्वी भूमी सहा वर्ष कॅमे-याच्या मागे काम करत होती. या सर्वांतून तयार झालेल्या भूमीची अभिनयातील एन्ट्री दमदार होतीच. शिवाय तिची पुढची वाटचालही तेवढीच यशस्वी ठरलीय.
भूमीचा जन्म मुंबईचा. तिचे वडील मराठी. सतिष पेडणेकर. हे पेडणेकर कुटुंब गोव्यातील पेडण्याचे. त्या गावावरुन त्यांचे नाव पेडणेकर. भूमीची आई ही हरीयाणाची आहे. सुमित्र होडा. भूमीला एक जुळी बहिणही आहे. ही समीक्षा, वकील म्हणून कार्यरत आहे. भूमीचं शिक्षण मुंबईतील आर्य विद्या मंदिर येथे झालं. त्यानंतर तिने पुढे व्हिस्टलिंग वुड इंटरनेशनल इंस्टीट्यूट ऑफ़ फिल्म, कम्युनिकेशन ॲण्ड मीडिया आर्ट्स’, मुंबई येथे पदवीसाठी प्रवेश घेतला. पण कॉलेजमध्ये अत्यंत कमी हजर रहाणा-या भूमीला तेव्हा कॉलेजमधून काढून टाकण्यात आलं. पुढे भूमी सुभाष घई अॅक्टींग स्कूलमध्ये दाखल झाली. तेव्हा ती सोळा वर्षाची होती. तिथून तीनं एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स पूर्ण केला. त्यानंतर यशराज फिल्ममध्ये कास्टींग डायरेक्टर सानू शर्मा यांची असिस्टंट म्हणून तिनं काम केलं. यावेळी तिनं चक दे इंडीया, रॉकेट सिंग आणि तीन पत्ती या चित्रपटांसाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं. यशराजमध्ये कॅमे-याच्या मागे सहा वर्षाचा अनुभव भूमीला मिळाला. याचवेळी निर्माते मनिष शर्मा नवीन चित्रपट करीत होते. त्यातील मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी त्यांना नवीन चेहरा हवा होता. पण त्या अभिनेत्रीमध्ये अभिनय गुणासोबत तिचं वजनही दमदार हवं होतं. भूमीनं हे चॅलेंज स्विकारलं. तिनं दम लगा के हईशा साठी तब्बल बारा किलो वजन वाढवलं. आयुष्यमान खुराना तिचा सहकलाकार होता. संध्या वर्मा या महिलेची ती कथा होती. जाडी पत्नी मिळाली म्हणून नाराज असलेला पती. त्यांच्यातील रुसवे-फुगवे. आणि प्रेमाची जाणीव. अशी ही साधी कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. लो बजेट असणा-या या चित्रपटानं 71 करोड ची कमाई केली होती. त्या वर्षातील हिट चित्रपट म्हणून दम लगा के हईशानं फिल्मफेअर, स्क्रिनसह अन्य सहा पुरस्कार पटकावले. यातील भूमीच्या अभिनयाची मान्यवरांनी नोंद घेतली. राणी मुखर्जी तर भूमीच्या अभिनयावर एवढी फिदा झाली की, तिनं भूमीचं अभिनंदन आणि कौतुक करण्यासाठी यशराजचं ऑफीस गाठलं होतं.
भूमीनं दम लगा के …साठी 12 किलो वजन वाढवतांना बटर चिकन, दाल मखनी, पिझ्झा सारख्या पदार्थांवर ताव मारला होता. या चित्रपटात तिच्या आईच्या भूमिकेत दिसलेली सीमा पाहवा हिनं तिला वजन वाढवण्यासाठी विशेष टीप दिल्या होत्या. पण भूमीनं हे वाढलेलं वजन चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत कमीही केलं. ती स्वतः उत्तम योगा करते. त्यामुळे योगा आणि समतोल डायट या माध्यमातून तीनं आपलं शरीर पूर्ववत केलंच, शिवाय बारीक कसे व्हावे अशा टिप्सही नंतर ती आपल्या इंस्टाग्राम मधून चाहत्यांना देत असे.
यानंतर भूमीनं वाई फिल्म्सच्या मैन्स वर्ल्ड या वेब सिरीजमध्ये काम केलं. तिच्यासोबत परिणीती चोप्रा, कल्की कोचलिन, ऋचा चढ्ढा यांच्याही भूमिका होत्या. ही वेबसिरीजही चांगलीच हीट झाली. भूमीकडे चित्रपटांच्या अनेक ऑफर होत्या. पण जरा हटके भूमिका स्विकारण्यावर तिचा भर.. प्रवाहाबाहेरचे चित्रपट…सामाजिक प्रबोधन करणारे चित्रपट…यांना तिने कायम पसंती दिली. त्यामुळे एक वर्ष मोठ्या पडद्यापासून दूर रहाणा-या भूमीनं थेट अक्षय कुमारसह आगमन केलं. श्रीनारायण सिंग दिग्दर्शित टॉयलेट एक प्रेमकथा हा पठडी बाहेरचा चित्रपट. गावामध्ये शौचालय नसल्यानं महिलांची होणारी कुचंबणा. शौचालय बांधण्यासाठी होणारा पुरुषांचा विरोध. यात फुलणारी एक प्रेमकहाणी. शौचालय नसल्यानं सासर सोडून माहेरी गेलेली सून…आणि शौचालायाशिवाय संसार नाही. ही तिची ठाम भूमिका…भूमीनं हा संघर्ष पडद्यावर मांडतांना अनेक महिलांच्या मनातील प्रश्नाला वाचा फोडली. या चित्रपटाची पंतप्रधान मोदी यांनीही दखल घेतली होती. हा चित्रपटही ब्लॉकबस्टर यादीमध्ये सामिल झाला. बॉक्स ऑफीसवर तीन बिलियन कमाई या चित्रपटानं केली. अर्थात दुसरा चित्रपटही हीट झाल्यामुळे भूमी पेडणेकर हे नाव यशस्वी ठरलेल्या निवडक अभिनेत्रींमध्ये वरचढ ठरलं. तरीही भूमी भूमिकांच्या बाबतीत चूझी राहीली. कुठल्याही भडक किंवा प्रेमात पडलेल्या प्रेमिकेची भूमिका करण्यापेक्षा समाजाला काही संदेश देणा-या नायिका करण्यावर तिचा भर राहीला. त्यातूनच तिचा तिसरा चित्रपट आला शुभमंगल सावधान…
आयुष्यमान खुराना सोबतच हा चित्रपट सेक्स एज्युकेशन संदर्भात संदेश देणारा आहे. निर्माता आनंद एल. राय यांचा हा चित्रपट कॉमेडी ड्रामा आहे. या चित्रपटातील भूमीच्या अभिनयाचं कौतुक झालं. या चित्रपटानं बॉक्स ऑफीसवर चांगलीच कमाई केली.
2018 मध्येफोर्ब्स इंडियाने आपल्या30 अंडर 30या यादीमध्ये भूमीचा समावेश केला. याचवर्षी भूमीची आणखी एक हीट वेबसिरीज आली. नेटफ्लिक्स वरील लस्ट स्टोरीज़मध्ये हॉट भूमिकेत भूमी दिसली. जोया अख्तरच्या या वेबसिरीजवर टीकाही झाली. पण भूमीच्या भूमिकेचं तिच्या चाहत्यांनी कौतुक केलं. पुढच्याच वर्षी भूमी सोनचिरीया या चित्रपटात दिसली. चंबलमधील डाकूंच्या जिवनावरील या चित्रपटासाठी भूमी बंदूक चालवायला शिकली. या चित्रपटात सुशांत सिंह राजपूत, मनोज वाजपेयी, अशुतोष राणा यांच्यासह भूमी दिसली. अभिषेक चौबे हे या चित्रपटाचे निर्माते. या चित्रपटात भूमीनं इंदूमती तोमर या महिलेची भूमिका केली. व्यावसायिक दृष्ट्या हा चित्रपट फारसा यशस्वी झाला नाही. पण या चित्रपटासाठी भूमीनं जी मेहनत घेतली होती, त्याचा फायदा तिला पुढच्या चित्रपटात झाला. हा चित्रपट म्हणजे सांड की ऑंख…. अभिनेत्री तापसी पन्नू तिची सहकलाकार होती. अनुराग कश्यप यांचा हा चित्रपट हरीयाणामधील शूटर दादींवर आधारीत आहे. चंद्रो तोमर आणि प्रकाशी तोमर या बंदूक चालवणा-या दोन महिलांच्या जिवनावरील ही सत्य घटना आहे. तोमर जावांनी पुरुषी वर्चस्वाला आव्हान देत बंदूक चालवण्यात महिरत हासिल केली. हे करतांना त्यांना कुठल्या आव्हांनाना सामोरी जावं लागलं याची कथा सांड की ऑंख मध्ये मांडण्यात आली आहे. यात भूमीनं चंद्रो तोमर यांची भूमिका केली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर तुफानी चालला. भूमीची हरियाणी बोली विशेष भाव खावून गेली.
बाला, डॉली किटी और वो चमकते सितारे, पति पत्नी और वो, भूत – पार्ट वन: द हॉन्टेड शिप सारख्या चित्रपटांतून भूमी चाहत्यांना वेगवेगळ्या भूमिकांमधून भेटत गेली. दुर्गावती, तख्त, बधाई हो-2 सारखे तिचे काही बिगबजेट चित्रपट प्रदर्शनाच्या रांगेत आहेत. आपल्या लूकबाबत अत्यंत चोखंदळ असलेली भूमी काही महिन्यांपूर्वी तिच्या हॉटफोटोसेशनमुळे चर्चेत आली. टू पीस बीकनीवर परदेशात समुद्रकिना-यावर बिंधास्त फिरणा-या भूमीचे फोटो सोशल मिडीयावर आले आणि एकच गोंधळ झाला. तिचं हे हॉट फोटोशूट नेमकं कशासाठी आणि कुणासाठी याचा शोध सुरु झाला. अर्थात हे गुपित भूमीच्या स्वभावासारखं ठरलं. त्याचा काही शोध लागला नाही. गेल्या महिन्यात सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर भूमी हळवी झालेली भूमी दिसली. सोनचिडीया या चित्रपटात सुशांत तिचा सहकलाकार होता. त्याची ही अचानक झालेली एक्झीट तिला हादरवून गेली. सुशांतच्या आठवणीत भूमीनं काही सामाजिक संस्थाना मदत जाहीर केली.
भूमी पेडणेकर ही अभिनेत्री अशीच हळवी आहे. त्यामुळेच ती सर्वापेक्षा वेगळी भासते. आपल्या कुटुंबाला ती खूप जपते. आता या लॉकडाऊनच्या काळात कुटुंबासोबत असलेली भूमी आपल्या आगामी प्रोजेक्टची तयारी करत आहे. तिच्या भावी वाटचालीस कलाकृती मिडीयाच्या अनेक शुभेच्छा….