
Bigg Boss Marathi 6: पहिल्या दिवशी राडा, दुसऱ्या दिवशी थेट स्पर्धकच बेशुद्ध; Divya Shindeला नेमकं झालं काय?
Bigg Boss Marathi 6 चा ग्रँड प्रीमियर मोठ्या जल्लोषात पार पडला असून अवघ्या पहिल्याच दिवसापासून घरात चांगलाच गोंधळ पाहायला मिळतो आहे. घरात दाखल झालेल्या १७ स्पर्धकांनी सुरुवातीलाच आपली उपस्थिती ठळकपणे दाखवून दिली आहे. पहिल्या दिवसापासूनच रुचिता जामदार आणि तन्वी कोलते यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरला, तर अभिनेता विशाल कोटियनमुळेप्रभू शेळके (Prabhu Shelake) भावुक झाल्याचंही पाहायला मिळालं. दरम्यान, आजच्या भागात घरातील पहिला अधिकृत टास्क पार पडणार असून त्याचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये ‘सरकार’ म्हणून ओळखली जाणारी दिव्या शिंदे (Divya Shinde) अडचणीत सापडलेली दिसत आहे.(Bigg Boss Marathi 6)

बिग बॉसने स्पर्धकांसाठी आठवड्याच्या राशनसाठी ‘मिशन राशन’ हा मेहनतीचा टास्क दिला आहे. स्टोअर रूममधील अवजड भांडी , मोठे हंडे, झाकणं, चमचे आणि इतर साहित्य गार्डन एरियामध्ये आणून नीट मांडण्याचं आव्हान स्पर्धकांसमोर आहे. काही स्पर्धक भांडी उचलताना दिसत आहेत, तर काही त्यांची रचना करत आहेत. प्रभू शेळके स्विमिंग पूलमधून पाणी काढताना दिसतो, ज्यामुळे हा टास्क किती कठीण आहे याची कल्पना येते.

मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात भांडी पाहून दिव्या शिंदे गोंधळून गेल्याचं प्रोमोमध्ये स्पष्टपणे दिसतं. टास्कदरम्यान तिची तब्येत अचानक बिघडते आणि ती बेशुद्ध पडते. “डॉक्टर… डॉक्टर…” असे आवाज घरात घुमताना ऐकू येतात. प्रोमोच्या शेवटी दिव्या म्हणते, “इतकी भांडी म्हणजे काय, अख्ख्या जिल्ह्याची भांडी घासायला दिलीत का?” आणि त्यानंतर ती जमिनीवर कोसळते.(Bigg Boss Marathi 6)
===========================
===========================
या घटनेनंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेक नेटकऱ्यांनी दिव्याच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत तिला पाठिंबा दिला आहे. मात्र काही जणांनी तिला ट्रोल करण्याची संधीही सोडलेली नाही. एका युजरने लिहिलं, “मेहनतीचं दार स्वतः निवडलं आणि पहिल्याच टास्कमध्ये बेशुद्ध पडली.” तर दुसऱ्याने म्हटलं, “दिव्या मॅडम बेशुद्ध पडायला आल्यात.” आणखी एक कमेंट होती, “बस निकल गयी हवा.” आता दिव्या शिंदेला नेमकं काय झालं? बिग बॉसच्या घरात डॉक्टर येणार का? आणि ‘मिशन राशन’ टास्क पूर्ण होणार की मध्येच रद्द केला जाणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या भागात मिळणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.