
Bigg Boss Marathi 6: ‘तुझं तोंड शेणात घाल..’ पहिल्याच दिवशी घरात जोरदार राडा!
Bigg Boss Marathi चं घर म्हणजे नात्यांचा खेळ, डावपेच, मैत्री-शत्रुत्व आणि अधूनमधून रंगणारे वाद हे सगळं समीकरण प्रेक्षकांना चांगलंच परिचित आहे. 11 जानेवारीपासून बिग बॉस मराठीचा सहावा सीझन सुरू झाला असून, पहिल्याच दिवसापासून घरात वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. आता प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न आहे तो म्हणजे कोण कोणाच्या जवळ जाणार आणि कुणामध्ये वाद निर्माण होणार? घरात प्रवेश करताच स्पर्धकांना बिग बॉसने दिलेल्या सूचनांचं पालन करणं अपेक्षित होतं. मात्र पहिल्याच दिवशी काही स्पर्धकांनी आदेश दुर्लक्षित केल्यामुळे घराचे दरवाजे बंद ठेवण्याचा निर्णय बिग बॉसने घेतल्याचं पाहायला मिळणार आहे. यामुळे घरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.(Bigg Boss Marathi 6)

आता कलर्स मराठीने नुकताच एक नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला असून, त्यात पहिल्या दिवसातील वादाचं स्पष्ट चित्र पाहायला मिळतं. या प्रोमोमध्ये करण सोनवणे (Karan Sonawane) आणि रुचिता जामदार (Ruchita Jamkar) एकमेकांशी गप्पा मारताना दिसतात. यावेळी करण काहीतरी विनोदी अंदाजात बोलतो, मात्र त्याच्या शब्दांवर तन्वी कोलते नाराजी व्यक्त करते. तन्वीने करणला“फालतू शब्द वापरू नकोस” असं सांगितल्यानंतर रुचिता मध्येच प्रतिक्रिया देते. याच क्षणापासून रुचिता आणि तन्वी यांच्यात शाब्दिक वादाला सुरुवात होते.

दोघींमध्ये तिखट शब्दांची देवाणघेवाण होताना दिसते आणि वातावरण अधिकच चिघळतं. हा वाद इतका वाढतो की इतर स्पर्धकांना मध्ये पडून दोघींना शांत करण्याचा प्रयत्न करावा लागतो. पहिल्याच दिवशी एवढा मोठा वाद झाल्यामुळे घरात पुढे काय घडणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. हा प्रोमो शेअर करताना वाहिनीने “पहिल्याच दिवशी तन्वी आणि रुचितामध्ये रंगणार वाद” असं कॅप्शन दिलं आहे. प्रोमो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. “भांडणाला सुरुवात झाली”, “पहिल्याच दिवशी धमाका”, “उद्घाटन सोहळ्यातच राडा” अशा मजेशीर कमेंट्स सध्या व्हायरल होत आहेत. (Bigg Boss Marathi 6)
============================
============================
बिग बॉस मराठीच्या या सीझनमध्ये एकूण 17 स्पर्धक सहभागी झाले आहेत. या यादीत तन्वी कोलते, रुचिता जामदार, करण सोनवणे यांच्यासह दिव्या शिंदे, राधा पाटील, ओमकार राऊत, विशाल कोटियन, दिपाली सय्यद, सागर कारंडे, सचिन कुमावत, सोनाली राऊत, आयुष संजीव, राकेश बापट, प्रभू शेळके, अनुश्री माने, प्राजक्ता शुक्रे आणि रोशन भजनकर यांचा समावेश आहे.आता पहिल्याच दिवशी सुरू झालेल्या वादामुळे पुढील दिवसांत घरात काय घडणार, कोणाचे गट तयार होणार आणि कोण कोणाशी भिडणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे.