दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
बीना रॉय : एक विसरलेली अनारकली
हिंदी सिनेमाच्या रसिकांना ‘अनारकली’ म्हटलं की, ताबडतोब डोळ्यापुढे येते ‘मुगल-ए-आजम’ ची अनारकली ‘मधुबाला’. पण या अनारकलीच्या आधी सात वर्ष एक ‘अनारकली’ रुपेरी पडल्यावर आली होती. हा चित्रपट फिल्मिस्तानचा होता. यात अनारकलीची भूमिका निभावली होती बीना रॉय यांनी. (Bina Roy)
आज बीना रॉय यांची कुणालाच आठवण नाही किंवा ती आठवली देखील जात नाही. पण एक काळ तिने नक्कीच गाजवला होता. अतिशय देखणी, शांत आणि मन लावून काम करणारी अभिनेत्री असं वर्णन त्या काळात केलं जायचं. काही गाण्यासाठी मात्र बीना रॉय यांना आपल्याला आठवावेच लागेल जो वादा किया वो निभाना पडेगा (ताजमहल) ये जिंदगी उसी की है (अनारकली) कहा ले चले हो बात दो मुसाफिर (दुर्गेश नंदिनी) जब रात नही कटती (चेंगीझ खान) मोरी छम छम बाजे पायलीया (घुंघट) १९५३ साली आलेल्या ‘अनारकली’ या सिनेमाने बीना घराघरात पोचली. खरंतर बीना रॉय हे तिचं फिल्मी नाव. तिचं खरं नाव होतं कृष्णा सरीन. तिचं फिल्मी बारसं कुणी केलं ? कृष्णा सरींनची बीना रॉय कशी झाली ? खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे.
कृष्णा सरीन याचा जन्म आज पाकिस्तानात असलेल्या पण त्याकाळी ब्रिटीश इंडियात असलेल्या लाहोर येथे झाला १३ जुलै १९३१ रोजी झाला. स्वातंत्र्यापूर्वीच हे कुटुंब भारतात उत्तर प्रदेशात स्थायिक झाले. घरात चार बहिणी तीन भाऊ . वडील रेल्वेमध्ये मोठ्या अधिकारीपदावर. लहानपणापासूनच कृष्णाला नाचण्या मुरडण्याची आणि अभिनय करण्याची आवड. (Bina Roy)
१९५० साली ती लखनऊच्या महाविद्यालयात शिकत होते. त्यावेळी तिने वर्तमानपत्रात एक जाहिरात वाचली. त्या जाहिरातीत निर्माता दिग्दर्शक किशोर साहू यांनी त्याच्या नवीन चित्रपटासाठी अभिनेत्री पाहिजे म्हणून एक टॅलेंट हंट स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत त्याना तीन मुलींची गरज होती. कृष्णा सरीनना वाटले हा ही चांगली संधी आहे; चित्रपटात प्रवेश करण्याची. म्हणून आपल्या भावाला घेऊन ती मुंबईत दाखल झाली. गंमत म्हणजे तिच्या महाविद्यालयातील दोन प्राध्यापिका ज्या वयाने फार मोठ्या नव्हत्या त्यांना देखील चित्रपटात काम करण्याची मोठी हौस होती. जेव्हा त्यांना कळालं की कृष्णा मुंबईला जात आहे. त्या देखील तिच्या पाठोपाठ दोघी मुंबईत दाखल झाल्या.
योगायोगाने तिघींची देखील किशोर साहूने निवड केली. तिच्यासोबत आलेल्या दोन प्राध्यापिका चित्रपटात फारसं करिअर करू शकल्या नाहीत. (त्या पैकी एक होती इंदिरा पांचाळ नंतर तिने महिंद्रा या उद्योगपती शी लग्न केले आणि सध्याचा मोठा बिझनेसमन आनंद महेंद्रा हा तिचा मुलगा! दुसरी अभिनेत्री आशा माथुर ही देखील फार काही चित्रपटात नाव करू शकले नाही पण भविष्यात तिने मोहन सैगल या चित्रपट दिग्दर्शकाशी लग्न केलं!) (Bina Roy)
कृष्णा सरीनचे बीना रॉय (Bina Roy) हे बारसं किशोर साहू यांनी दिला कारण चित्रपटासाठी कृष्णा सरीन हे नाव त्यांना तेवढं प्रभावी वाटत नव्हतं. किशोर साहू दिग्दर्शित ‘काली घटा’ हा चित्रपट १९५१ साली प्रदर्शित झाला आणि सर्वांचे लक्ष सुंदर अशा नवीन अभिनेत्रीकडे गेले. अनेक निर्मात्यांची रांग बीना कडे लागली. त्यापैकी एक जण होता अभिनेता प्रेमनाथ.
बीना रॉय आणि प्रेमनाथ पहिल्यांदा ‘औरत’ या चित्रपटात एकत्र आले. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान दोघांची मने जुळली आणि त्यांनी १९५३ साली लग्न केले. याच वर्षी बीनाच्या आयुष्यातील सर्वाधिक यशस्वी चित्रपट ‘अनारकली’ २ जानेवारी १९५३ रोजी प्रदर्शित झाला. नंदलाल जसवंतलाल दिग्दर्शित या चित्रपटात तिचा नायक प्रदीप कुमार होता. तिने रंगवलेल्या ‘अनारकली’ला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या सिनेमाला मधुर संगीत अण्णा तथा सी रामचंद्र यांचे होते.
यानंतर तिने आपल्या नवऱ्यासोबत पी एन फिल्म्सची स्थापना केली आणि त्यांनी अनेक चित्रपट निर्माण केले. गोवळकोंडा का कैदी, शगुफा, चंगेज खान…. दुर्दैवाने यातील एकाही चित्रपटाला यश मिळाले नाही. ५ ऑगस्ट १९६० रोजी के असिफ यांचा मुगल ए आजम हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि बंपर हिट झाला.
यावर्षीच्या सर्वोत्कृष्ट नायिका फिल्मफेअर अवॉर्डसाठी या चित्रपटाची नायिका मधुबालाचे नामांकन झाले होते. तिच्या स्पर्धेत होती बीना राय. ‘घुंघट’ या चित्रपटासाठी तिचे नामांकन झाले होते. तिसरे नामांकन नूतन ला ‘छलिया’ या सिनेमासाठी होते. विशेष म्हणजे या दोघींना टक्कर देत बीना रॉय ने फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट नायिकेचा पुरस्कार जिंकला. अनारकली सारखी मोठी भूमिका केल्यानंतर लोक तिला त्याच रूपामध्ये पाहू इच्छित होते आणि तिच्या इतर भूमिकांमध्ये देखील ते अनारकली ला शोधत होते त्यामुळे तिच्या चित्रपटांना फारसे यश मिळत नव्हते. १९६३ साली एम सादिक यांनी ‘ताजमहाल’ या चित्रपटात पुन्हा एकदा अनारकलीची हिट जोडी प्रदीप कुमार आणि बिना रॉय यांना रुपेरी पडल्यावर एकत्र आणले. चित्रपट सुपर हिट झाला. (Bina Roy)
==========
हे देखील वाचा : पहिल्याच सिनेमात ती चक्क दिलीप कुमारची नायिका ठरली !
==========
यानंतर काही चित्रपटात बीना चमकली पण १९६७ सालच्या ‘तिसरी मंजिल’ पासून प्रेमनाथ चे करिअर पुन्हा एकदा बहरात आल्यावर घर गृहस्थी सांभाळण्यासाठी चित्रपटातून तिने सन्यास घेतला. यानंतर ती चित्रपटापासून लांबच राहिली. पुढची जवळपास ४० वर्ष बीना राय मुंबईत असून देखील सार्वजनिक समारंभातून ती कधीच दिसली नाही. तिची दोन्ही मुले प्रेम किशन आणि मॉन्टी चित्रपटातून आपले करिअर करत होते. नंतर प्रेम किशनने सिनेविस्टा ही प्रोडक्शन कंपनी देखील काढली. १९९२ साली प्रेमनाथ चे निधन झाले. बीना आणखी एकाकी झाली. आणि त्यानंतर १७ वर्षांनी ६ डिसेंबर २००९ या दिवशी बीना रॉय यांचे निधन झाले. आपल्या अठरा वर्षाच्या करिअरमध्ये फक्त २८ सिनेमा करून बीना यांनी आपली स्वतंत्र ओळख करून ठेवली. आज या अनारकलीची आठवण फारशी कोणाला होत नाही पण बॉलिवूडच्या इतिहासामध्ये तिन ‘अनारकली’ ‘ताजमहल’ मधील मुमताज महल या दोन मुघल कालीन व्यक्तिरेखा करून आपले नाव हिंदी सिनेमात अजरामर करून ठेवले आहे.