‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
‘रॉकेटरी: द नंबी इफेक्ट’ पूर्वीही आले आहेत शास्त्रज्ञांच्या जीवनावर आधारित चित्रपट
सध्या सर्वत्र चर्चा आहे ती आर माधवच्या रॉकेटरी: द नंबी इफेक्ट (Rocketry: The Nambi Effect) या चित्रपटाची. हा चित्रपट तामिळ, हिंदी आणि इंग्लिश भाषेमध्ये एकाच वेळी तयार झाला असून, इतर भारतीय भाषांमध्ये डब करण्यात येणार आहे. चित्रपटात एक अत्यंत हुशार पण दुर्दैवी शास्त्रज्ञ नंबी नारायणन् यांची कहाणी दाखवण्यात आली आहे. नंबी नारायणन् यांना नासाकडूनही ऑफर आली होती परंतु त्यांनी ती नाकारून इस्रोमध्येच राहणं पसंत केलं. कारण त्यांचं आपल्या देशावर प्रचंड प्रेम होतं. अर्थात शास्त्रज्ञाच्या आयुष्यावर आधारित असणारा हा काही पहिलाच चित्रपट नाही. यापूर्वीही असे काही चित्रपट येऊन गेले आहेत जे शास्त्रज्ञांच्या आयुष्यावर आधारित होते. अशाच काही चित्रपटांविषयी (Biopics On Indian Scientists) —
द मॅन हू न्यू इन्फिनिटी (The Man Who Knew Infinity)
हा चित्रपट भारतीय गणितज्ज्ञ ‘श्रीनिवास रामानुजन’ यांच्या आयुष्यावर आधारित आहे. रॉबर्ट कनिगेल यांच्या १९९१ सालच्या ‘द मॅन हू नो इन्फिनिटी’ या नावाच्या पुस्तकावर आधारित असणारा हा चित्रपट २०१६ साली युके (UK) मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये श्रीनिवास रामानुजन यांचा पूर्ण प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.
मॅथ्यू ब्राउन दिग्दर्शित या चित्रपटात ‘देव पटेल’ या भारतीय वंशाच्या इंग्लिश अभिनेत्याने श्रीनिवास रामानुजन यांची भूमिका साकारली आहे. मूळ इंग्लिश भाषेत प्रदर्शित झालेला हा चित्रपट हिंदीमध्ये डब करण्यात आला असून तो युट्यूबवर उपलब्ध आहे. IMDB वर या चित्रपटाला ७.२ रेटिंग देण्यात आले आहे. (Biopics On Indian Scientists)
सुपर 30 (Super 30)
हा चित्रपट पटना (बिहार) येथिक गणिताचे शिक्षक आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारित आहे. आयआयटी प्रवेश परीक्षेसाठी कोचिंग देणाऱ्या आनंद कुमार यांचा ‘सुपर 30’ नावाचा शैक्षणिक उपक्रम कसा आणि का सुरु झाला, याबद्दलची सर्व माहिती या चित्रपटामधून मिळते.
विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटात ‘आनंद कुमार’ यांची भूमिका हृतिक रोशन याने केली असून मृणाल ठाकूर, वीरेंद्र सक्सेना, नंदिश संधू, आदित्य श्रीवास्तव, साधना सिंग, पंकज त्रिपाठी, विजय वर्मा आदी कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये आहेत. २०१९ सालचा हा चित्रपट डिस्नी + हॉटस्टार वर उपलब्ध असून IMDB वर या चित्रपटाला ७.९ रेटिंग देण्यात आलं आहे.
मिशन मंगल (Mission Mangal)
‘मिशन मंगल’मध्ये कोणा एका शास्त्रज्ञाची कहाणी दाखवण्यात आलेली नाही. इस्रोने मंगळावर पाठवण्यासाठी अत्यंत कमी खर्चात तयार केलेल्या उपग्रहाच्या निर्मितीची आणि या निर्मितीमध्ये सहभागी असणाऱ्या शास्त्रज्ञांच्या संपूर्ण टीमची कहाणी यामध्ये दाखवण्यात आली आहे. पहिल्या उपग्रहाचं उड्डाण अपयशी ठरल्यावर पुन्हा उपग्रह बनविण्यासाठीची मानसिक, आर्थिक आणि एकूणच सर्व तयारी, त्याच्या निर्मितीचे नियोजन, त्यामध्ये आलेले अडथळे आणि त्यावर मात करून मिळालेल्या यशाचा प्रवास यामध्ये बघायला मिळतो. या उपग्रहाच्या यशस्वी उड्डाणानंतर संपूर्ण जगातील शास्त्रज्ञांनी भारताचं कौतुक केलं होतं.
जगन शक्ती दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, शर्मन जोशी, दिलीप ताहिल आदी कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. २०१९ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट डिस्नी + हॉटस्टार वर उपलब्ध असून IMDB वर या चित्रपटाला ६.५ रेटिंग देण्यात आलं आहे. (Biopics On Indian Scientists)
शकुंतला देवी (Shakuntala Devi)
हा चित्रपट ‘मानवी संगणक (Human Computer)’ असा ज्यांचा उल्लेख केला जातो त्या शंकुतला देवी यांच्या आयुष्यावर आधारित होता. शंकुतला देवी यांचं गणितं सोडविण्याचं कौशल्य अफाट होतं. मोठमोठी अवघड कॅल्क्युलेशन्स त्या तोंडी करत असत. त्यांच्या या कौशल्यामुळे १९८२ साली ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये त्यांच्या नावाची नोंद करण्यात आली.
अनु मेनन दिग्दर्शित या चित्रपटात शकुंतला देवी यांची भूमिका साकारली होती विद्या बालन या अभिनेत्रीने. या व्यतिरिक्त चित्रपटात जिशू सेनगुप्ता, सान्या मल्होत्रा, अमित साध, प्रकाश बेलवाडी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. २०२० सालचा हा चित्रपट अमेझॉन प्राईमवर उपलब्ध असून IMDB वर या चित्रपटाला ६.१ रेटिंग देण्यात आलं आहे. (Biopics On Indian Scientists)
अलीकडेच प्रदर्शित झालेली रॉकेट बॉईज (Rocket Boys) ही वेबसिरीज डॉ. होमी जहांगीर भाभा आणि डॉ. विक्रम साराभाई या दोन असामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या शास्त्रज्ञांच्या आयुष्यावर आधारित होती. ही वेबसिरीज असल्यामुळे वरच्या यादीमध्ये समाविष्ट केली नाही. परंतु याचा उल्लेख मात्र आवश्यक होता.
=======
हे देखील वाचा – जाने तू… या जाने ना: कॉलेजची मैत्री, मजा, मस्ती आणि एक रोमँटिक प्रेमकहाणी
=======
सिरीजमध्ये जिम सर्भ (डॉ. होमी जहांगीर भाभा) आणि ईश्वांक सिंग (डॉ. विक्रम साराभाई) यांच्या मुख्य भूमिका असून ही वेबसिरीज सोनी Liv या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. या सीरिजला IMDB वर ८.९ रेटिंग देण्यात आलं आहे. (Biopics On Indian Scientists)
आपल्या देशाने सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्येही खूप मोठं योगदान दिलं आहे. हे सर्व चित्रपट व वेबसिरीज आवर्जून बघायला हवेत आणि लहान मुलांनाही दाखवायला हवेत.