मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
बोल्ड तरीही मनाला अंतर्मूख करायला लावणारा : ज्युली
भारतात बोल्ड विषयावरचे सिनेमे पूर्वीपासून येत होते. १९७५ साली बी नागी रेड्डी यांचा ’ज्युली’ (Julie) हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यातील बोल्डनेसने तरूणाई या सिनेमाकडे आकर्षित झाली. आजच्या सिनेमाशी तुलना करता या सिनेमातील दृष्ये तशी खूपच सोज्वळ म्हणावी लागतील. सिनेमातील विषय जरा भडकपणे मांडल्यामुळे सिनेमा हिट झाला हे जरी खरे असले तरी सिनेमाच्या इतर वैशिष्ट्यांची म्हणावी तेवढी चर्चा झालीच नाही. खरं तर गीत चित्रीकरणाच्या वेळची दृष्ये सिनेमाला यशस्वी करायला कारणीभूत ठरली असे सर्रास म्हटले गेल्याने त्यातील इतर महत्त्वाच्या बाबींकडे अगदी समीक्षकांचे ही दुर्लक्ष झाले असेच म्हणावे लागेल.(Julie)
आपल्याकडे अल्पसंख्यांक समाजाचे सिनेमाच्या माध्यमातून सादरीकरण तसे कमीच होते. या ’ज्यूली’ (Julie) सिनेमात एका अॅंग्लो इंडीयन कुटुंबाचे कथानक घेतले आहे. या कुटुंबात परिस्थितीने उद्विग्न झालेली आई आहे जी भूमिका अतिशय अप्रतिमपणे नादिराने केलीय. (हा बहुधा तिचा करीयर बेस्ट परफॉरमन्स असावा,तिला या भूमिकेसाठी फिल्मफेयर मिळाले.) पूर्णपणे मद्यपानाच्या आहारी गेलेले वडील आहेत ही भूमिका अतिशय ताकतीने ओम प्रकाश यांनी केली होती. सिनेमाच्या नायिकेच्या भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री लक्ष्मी तर नायकाच्या भूमिकेत विक्रम होता. नायिकेच्या बहिणीच्या भूमिकेत लहानगी श्रीदेवी होती! नायिका ख्रिश्चन तर नायक हिंदू. दोघांचे प्रेम जुळते. नायिकेला गर्भ राहतो. नायक नेमका त्याचवेळी परगावी राहतो.
नायिकेच्या आईला हे सहन होत नाही ती गर्भपाताचा सल्ला देते. पण नंतर तिची रवानगी शहरात करते. यथावकाश नायिका बाळाला जन्म देते तिची आई ते बाळ अनाथालयात देऊन नायिकेला घरी आणते. मग नायकाची एन्ट्री. दोन घरातील संघर्ष. नायकाच्या वडिलांचे शहाणपण, व शेवटी मिलन. प्रेमाच्या आवेगात झालेली चूक आयुष्यात किती महाग पडते हे दाखवतानाचे मनातील द्वंद्व फार सुंदर रितीने चितरले गेले. या सिनेमाचे दिग्दर्शन के एस सेतूमाधवन यांनी केले होते. मूळात हा सिनेमा रीमेक होता. याचे मूळ मल्याळम सिनेमा ’चट्टकारी’ (१९७४) त होते. १९७५ साली याचा तेलगूत देखील रीमेक झाला होता ‘मिस जूली’ या नावाने. या दोन्ही सिनेमाची नायिका लक्ष्मीच होती. यातील तिचा लूक, तिची वेशभूषा जबरदस्त होती. तिचे स्कर्टस, टॉप्स फॅशन आयकॉन बनले होते. (दोन वर्षापूर्वीच प्रेक्षकांनी आर के च्या बॉबीतील डिंपलचा अटायर बघितला होता.) या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट नायिकेचे फिल्म फेयर मिळाले. यातील गाण्याच्या वेळच्या खुल्लम खुल्ला प्रेम दृष्यांनी (’भूल गया सबकुछ याद नही अब कुछ’) तरूणाईच्या उड्या पडत होत्या. यात एक इंग्रजी गीत होते. ’माय हार्ट इज बीटींग’ प्रीती सागरने गायलेलं हे भारतातील सिनेमातील पहिले संपूर्ण लांबीचे इंग्रजी गाणे होते जे हरींद्रनाथ चट्टॊपाध्याय यांनी लिहिले होते. (Julie)
=======
हे देखील वाचा : मध्यरात्री ‘या’ अप्रतिम भक्तीगीताची चाल सुचली!
=======
या सिनेमाच्या यशात संगीतकार राजेश रोशन यांचा मोठा वाता होता. त्यांचा हा दुसराच सिनेमा होता. (पहिला कुंवारा बाप) यातील ’साचा नाम तेरा तू शाम मेरा’,’ये राते नई पुरानी कहती है कोई कहानी’,’दिल क्या करे कब किसीसे किसीको प्यार हो जाये’ हि गाणी संगीतकाराला स्थिर स्थावर होण्याला उपयोगी पडली. सिनेमाला यश मिळायला आणखी काही नॉन फिल्मी गोष्टी देखील कारणीभूत ठरल्या. सिनेमा १८ एप्रिल १९७५ ला प्रदर्शित झाला. त्याच्या बरोबर एक महिना आधी १९ मार्चला भारताने पाकीस्तानला नमवून हॉकीचा विश्वकरंडक पटकावला होता. आणीबाणीच्या पूर्वीचा काळ असल्याने देशात संपूर्ण ’युथफुल ’ वातावरण होते. त्यामुळे तरूणाई जोशात होती आणि मुख्य म्हणजे ’शोले’ या सिनेमाच्या नंतर तीन महिन्यांनी प्रदर्शित झाला!