इरफान: अभिनयाचा ‘साहिबजादा’
एक काळ असा होता की दुबळ्या अंगकाठीच्या इरफानला कुणी खिजगणतीतही धरत नव्हतं. नाव साहिबजादा असलं तरी तो रुबाब मात्र इरफान (Irrfan Khan) कधीच वागवू शकला नाही. तो स्वतःलाच त्याच्या बाह्यरूपावरून दूषणं देत राहिला. त्याचा हा न्यूनगंड NSDने (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) दूर केला. NSD गाठण्यापूर्वी त्याने इतर मार्गाने सेटल व्हायचा प्रयत्न केला होता पण त्याला त्या कामांमध्ये रस नव्हता. लहानपणापासूनच तो मिथुनचा फॅन होता पण घरच्यांसाठी सिनेमा म्हणजे निव्वळ तमाशा. अंगात क्रिकेटचा किडा होता पण ही प्रतिभा जोपासण्यासाठी घरची आर्थिक परिस्थिती सक्षम नव्हती. त्यामुळे त्याने ठरवलं की काहीही करून आता फिल्ममध्येच काम करायचं.
मामाकडून NSDबद्दल कळाल्यावर तिथे प्रवेश घेण्यासाठी त्याने आईच्या मागे लकडा लावला पण तिने दाद दिली नाही. शेवटी तो ‘उच्च शिक्षणासाठी दिल्लीला जातो आणि जयपूरला परत येऊन प्राध्यापक बनतो’ अशी लोणकढी थाप मारून निसटला आणि थेट NSDत दाखल झाला. NSDमध्ये शिकत असताना तो उदरनिर्वाहासाठी एसी रिपेअरिंगची कामेही करू लागला. १९८७मध्ये NSD मधून ग्रॅज्यूएशन पूर्ण झाल्यानंतर तो मालिकांमध्ये छोटेमोठे रोल्स करू लागला आणि तेव्हाच त्याला मीरा नायर दिग्दर्शित ‘सलाम बॉम्बे’ (Salaam Bombay!) मध्ये काम करायची संधी मिळाली. या फिल्ममध्ये उण्यापुऱ्या दोन मिनिटांची भूमिका त्याच्या वाट्याला आली.
त्यानंतर तो ‘कमला की मौत’मध्ये रूपा गांगुलीशी फ्लर्ट करतानाही दिसला. ‘एक डॉक्टर की मौत’मधील त्याने साकारलेला अमुल्यही प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. अल्पावधीतच त्याला ‘चाणक्य’, ‘किरदार’, ‘हमराही’, ‘सारा जहाँ हमारा’ सारख्या मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. मध्यंतरी बऱ्याचश्या फिल्म्समध्येही त्याने काम केलं पण त्यांची कुणी फारशी दखल घेतली नाही. १९९४च्या ‘द ग्रेट मराठा’ आणि ‘चंद्रकांता’सारख्या मालिकांमध्ये त्याला त्याच्या अभिनयातील वैविध्य दाखवण्याची संधी मिळाली. ‘चंद्रकांता’मध्ये तर त्याला चक्क दुहेरी भूमिका साकारायला मिळाली.
इरफान आता फक्त मालिकांमध्ये आणि लहानसहान भूमिका असणाऱ्या चित्रपटांपुरताच मर्यादित राहतो की काय, असं वाटत असतानाच अक्षदीप दिग्दर्शित ‘घात’ आला. यात अनुपम खेर, तब्बू, ओम पुरी आणि ‘सत्या’नंतर नावारूपाला आलेल्या मनोज वाजपेयी इत्यादी कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या तर इरफान मामूच्या खलनायकी भूमिकेत दिसला होता. फिल्म फ्लॉप झाली असली तरी पांडेसाब आणि खैरनारच्या घरात बेदरकारपणे एन्ट्री घेणारा मामू लक्षात राहिला.
पण एव्हाना इरफान कंटाळला होता या सगळ्याला. आपल्या चेहऱ्यामुळे, मोठ्या डोळ्यांमुळे आपल्याला कधीच लीड रोल मिळणार नाही असं वाटत असताना त्याने अभिनय आणि मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला. पण त्याचा मित्र असलेल्या तिग्मांशु धुलियाने त्याची समजूत काढून त्याला थांबवलं. त्याचवेळी त्याला ब्रिटीश दिग्दर्शक असिफ कपाडिया हे त्यांच्या आगामी चित्रपटासाठी हिरोच्या शोधात असल्याची कुणकुण लागली आणि त्याने थेट कपाडियाचं ऑफिस गाठलं. कपाडियांना तर इरफानच्या डोळ्यांतले भाव बघून क्षणभर लॉटरी लागल्याचाच भास झाला. आणि लॉटरीच होती ती! दर्जेदार अभिनयाची घसघशीत लॉटरी!! असिफ कपाडिया दिग्दर्शित ‘द वारियर’ हा इरफानची प्रमुख भूमिका असलेला पहिला चित्रपट ठरला. २००३मध्ये आलेल्या ‘हासिल’ने इरफानला पहिला फिल्मफेअर मिळवून दिला. आशुतोष राणाच्या गौरीशंकरला टशन देणारा त्याचा रणविजय सिंग मस्त जमला होता. मुंबई सोडण्यापूर्वी समजूत काढताना धुलियाने इरफानला नॅशनल अवार्ड मिळवून द्यायचं प्रॉमिस केलं होतं, पण त्यावर्षी त्याला फिल्मफेअरवरच समाधान मानावं लागलं.
कपाडियाने चमकवलेल्या या हिऱ्याला पैलू पाडले दिग्दर्शक विशाल भारद्वाजने. २००४ मध्ये विशालने त्याच्या होऊ घातलेल्या शेक्सपिअर ट्रायलॉजीचा पहिला चित्रपट ‘मकबूल’ इरफानला प्रमुख भूमिकेत घेऊन केला. मकबूलच्या निमित्ताने इरफानला पुन्हा एकदा पंकज कपूर आणि तब्बूसोबत काम करण्याची संधी मिळाली. असं म्हणतात की मकबूलच्या भूमिकेसाठी आधी कमल हसन, अक्षय कुमार, के के मेनन इत्यादींना विचारणा करण्यात आली होती पण इरफानने साकारलेला मकबूल बघता या तिघांपैकी कोणीही त्या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकले असते का, असा प्रश्न उभा राहतो. २००५च्या हिमांशु ब्रम्हभट दिग्दर्शित ‘रोग’मधून बॉलीवूडमध्ये पहिल्यांदाच मुख्य नायकाचा रोल साकारण्यापूर्वी त्याने ‘आन: मेन अट वर्क’मध्ये युसूफ पठाण ही खलनायकी भूमिका साकारली.
मग पुढच्याच वर्षी ‘द नेमसेक’ (The Namesake) आला. ‘सलाम बॉम्बे’मध्ये जाणीवपूर्वक वाया घालवलेल्या इरफानची खरी किंमत मीरा नायरला कळाली होती आणि तिने या चित्रपटात ती चूक सुधारली. इरफानने साकारलेला अशोक गांगुली आधीच्या भूमिकांपेक्षा जास्त प्रगल्भ वाटला. कमीत कमी संवादांमध्येही आपलं अस्तित्व जाणवू देण्याची किमया त्याच्या डोळ्यांनी केली. २०१२ उजाडेपर्यंत इरफानने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं. काही हिट झाले तर काही आपटले पण काही कायमस्वरूपी त्याच्या चाहत्यांच्या मनावर कोरले गेले. ‘लाईफ इन अ मेट्रो’, ‘मुंबई मेरी जान’, ‘स्लमडॉग मिलेनिअर’, ‘बिल्लू’, ‘सात खून माफ’ हे त्यापैकी काही चित्रपट. यांपैकी ‘स्लमडॉग मिलेनिअर’ तर ऑस्कर विजेता ठरला. फिल्मस्टार साहीरचा बालमित्र असलेला बिल्लू, नकार मिळाल्यानंतरही श्रुतीला कन्व्हिन्स करणारा माँटी, मॉलवाल्यांकडून आणि पोलिसांकडून अवहेलना पदरी पडलेला थॉमस इरफानने उत्तम रंगवला.
२०१२ हे वर्ष इरफानच्या करिअरला कलाटणी देणारं ठरलं. ‘लाईफ ऑफ पाय’ (Life Of Pi) आणि ‘पान सिंग तोमर’सारख्या चित्रपटांमध्ये मध्यवर्ती भूमिका साकारण्याचं भाग्य त्याला मिळालं. देशासाठी मेडल मिळवूनही न्यायव्यवस्थेकडून धिक्कारला गेलेला पान सिंग तोमर आणि बदल्याच्या आगीने पेटून उठलेला ‘सुभेदार’ पान सिंग तोमर हा फरक इरफानने आपल्या अभिनयातून पडद्यावर जिवंत केला. तोमरच्या भूमिकेसाठी त्याला त्या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. ‘द अमेझिंग स्पायडर मॅन’ आणि ‘लाईफ ऑफ पाय’नंतर इरफानला हॉलीवूडमध्येच स्थायिक होण्यासाठी ऑफर्स येऊ लागल्या पण आगामी ‘डी-डे’ आणि ‘द लंचबॉक्स’साठी त्याने या सर्व ऑफर्स नाकारल्या, ज्यात नोलनच्या ‘इंटरस्टेलर’चाही समावेश होता. हॉलीवूडच्या फिल्म्स सोडल्याचा किंचितही परिणाम त्याच्या कामगिरीवर झाला नाही. प्रत्येक फिल्मगणिक तो आपल्या अभिनयसामर्थ्याच्या जोरावर यशाची नवनवी शिखरे गाठत राहिला.
‘पिकू’, ‘तलवार’, ‘हैदर’, ‘गुंडे’सारख्या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका नसल्या तरी त्याने आपल्या संयत अभिनयशैलीचं प्रदर्शन करून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. मुंबईतून पळ काढू पाहणारा इरफान एव्हाना महानगरांमधील मध्यमवर्गीयांचा चेहरा बनला होता. भ्रष्ट सरकारी यंत्रणा, न्यायव्यवस्थेचा पक्षपातीपणा आणि या सगळ्यांत भरडला जाणारा मध्यमवर्गीय, हतबल बाप त्याने ‘मदारी’मध्ये साकारला. इरफान जितक्या सहज त्याच्या डोळ्यांतले भाव बदलण्यात निष्णात होता, तीच सहजता त्याने वेगवेगळी पात्रं साकारताना कायमच दाखवली. ‘कारवाँ’मध्ये एका क्लोजपमध्ये इरफान “उन्होने हमें जिंदा दफन कर दिया..” असं धीरगंभीर वाक्य बोलताना दिसतो आणि ती फ्रेम मोठी होताच तो हे वाक्य एका झुडपाशी बोलत आहे असं कळतं. क्षणात त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलून जातात. ‘हिंदी मिडीयम’, ‘अंग्रेजी मिडीयम’ असो वा ‘करीब करीब सिंगल’, इरफानच्या कॉमिक टायमिंग आणि संवादशैलीचा वेगळाच नमुना प्रेक्षकांना यात पाहायला मिळतो.
दुर्दैवाने, ‘अंग्रेजी मिडीयम’ (Angrezi Medium) त्याचा शेवटचा चित्रपट ठरला. २०१८मध्येच त्याने आपण कॅन्सरग्रस्त असल्याचं जाहीर केलं होतं आणि वर्षभराच्या उपचारानंतर तो पुन्हा एकदा आपल्या अभिनयाचा जलवा दाखवायला सज्जही झाला. पण, गेल्या वर्षी हा आजार पुन्हा बळावला आणि इरफान त्यातून सावरू शकला नाही. अनेक नव्या कलाकारांसाठी प्रेरणास्थान बनलेला इरफान आता या जगात नाही, हे कटू सत्य अजूनही त्याच्या चाहत्यांकडून स्वीकारलं जात नाही. भाषेच्या आणि प्रांताच्या मर्यादेत कधीही न अडकणारा हा कलाकार त्याच्या समृद्ध अभिनयशैलीचा वारसा मागे ठेवून गेला. तो गेल्यानंतर देशभरातील कलाकारांनी त्याला वेगवेगळ्या पद्धतीने आदरांजली वाहिली. प्रत्येकाला इरफान वेगळाच भासला आणि वेगळाच दिसला. तो कधीही साचेबद्ध भूमिकांमध्ये न अडकता प्रत्येक कलाकृतीचा आस्वाद घेत राहिला. इरफान नक्की काय होता हे फक्त त्याने ‘हैदर’मध्ये साकारलेला ‘रूहदार’च सांगू शकला,
“दरियाभी मैं, दरख्तभी मैं । झेलमभी मैं, चेनाबभी मैं । दैर हूँ, हरमभी हूँ । शियाभी हूँ, सुन्नीभी हूँ । मैं हूँ पंडित । मैं था, मैं हूँ, और मैं ही रहूँगा ।”
तू कायमच आमच्या मनात राहशील, रूहदार.. कलाकृती मिडीयातर्फे मानाचा मुजरा!!
=====
हे देखील वाचा: दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मुलगा “या” चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहे.
=====