‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
अष्टपैलू सिनेतारका!
‘आर्मी किड’ असलेल्या अनुष्काला वयाच्या अकराव्या वर्षीपासूनच टीव्हीवर झळकायचे वेध लागले होते. त्याला कारण होतं, एका जाहिरातीत झळकलेली तिची बालमैत्रीण! आर्मीत असलेल्या वडिलांच्या सततच्या बदलीमुळे तिची आई अनुष्का आणि तिच्या भावाला घेऊन अयोध्या सोडून बंगलोरला आली जेणेकरून मुलांच्या शिक्षणावर काही परिणाम होणार नाही. लहानपणापासूनच हुशार आणि चुणचुणीत असलेल्या अनुष्काला वयाच्या पंधराव्या वर्षीच जाहिरातींची आणि मॉडेलिंग करण्याची संधी चालून आली. अनुष्काचा फॅशन इंडस्ट्रीतील वाढता इंटरेस्ट पाहून तिची आई तिला फॅशन गुरु म्हणून नावाजल्या गेलेल्या प्रसाद बिदापांकडे घेऊन आली. अनुष्काचा पोर्टफोलिओ पाहून प्रसादजींनी तिच्यासाठी मॉडेलिंग क्षेत्रातील दारे खुली केली.
वयाच्या अठराव्या वर्षी अनुष्का (Anushka Sharma) आईसोबत मुंबईला स्थायिक झाली आणि विविध ब्रँड्ससाठी आणि फिल्म्ससाठी ऑडीशन्स देऊ लागली पण तिच्या पदरी अपयशच येत राहिलं. अश्यातच तिने एकदा आदित्य चोप्राच्या ‘रब ने बना दी जोडी’साठी ऑडीशन दिली आणि तिच्या सौंदर्याने व अभिनयाने प्रभावित झालेल्या आदित्यने हा रोल तिला देऊ केला. इतकंच नव्हे, तर पुढील तीन फिल्म्समध्ये मध्यवर्ती भूमिका साकारण्यासाठी तिला करारबद्धही केलं. २००८मध्ये रिलीज झालेल्या तिच्या या पहिल्याच चित्रपटात तिला शाहरुख खानची नायिका बनण्याची सुवर्णसंधी लाभली. तिने साकारलेली तिखट स्वभावाची तानी प्रेक्षकांना विशेष भावली. शाहरुखसमोर उठून दिसणाऱ्या या नव्या चेहऱ्याचं सर्वांनीच कौतुक केलं. ‘रब ने बना दी जोडी’ हिट झाला असला तरी अनुष्काला अपेक्षित स्टारडम मिळवण्यासाठी २०१०च्या ‘बँड बाजा बारात’ची वाट पाहावी लागली.
‘बँड बाजा बारात’ येण्यापूर्वी ती शाहीद कपूर, वीर दास आणि मियांग चँग या अभिनेत्यांसोबत ‘बदमाश कंपनी’मध्ये झळकली. या चित्रपटात तिने बुलबुल या ग्लॅमरस आणि महत्त्वाकांक्षी मुलीची व्यक्तिरेखा साकारली होती. चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. त्यानंतर त्याच वर्षी आलेल्या ‘बँड बाजा बारात’मध्ये तिला नवख्या रणवीर सिंगसोबत काम करण्याची संधी मिळाली. ‘रब ने बना दी जोडी’नंतर ती पुन्हा एकदा पंजाबी मुलीच्या भूमिकेत दिसली. तिने साकारलेली वेडिंग प्लानर बनण्याची स्वप्ने पाहणारी श्रुती उत्साहाने फसफसणाऱ्या रणवीरच्या बिट्टूसमोर कणभरही फिकी पडली नाही. या चित्रपटाने तिच्यासोबतच रणवीरचंही नशीब चमकवलं आणि बॉलीवूडला आपली दखल घ्यायला लावली. ‘बँड बाजा बारात’सोबत तिचं ‘यश राज फिल्म्स’सोबतचं पहिल्या तीन चित्रपटांचं काँट्रॅक्ट संपुष्टात आलं असलं तरी बॉलीवूडमधील तिची यशस्वी घोडदौड इथूनच सुरु झाली होती.
२०११ला तिने अक्षय कुमारसोबत ‘पटियाला हाऊस’ आणि रणवीरसोबत ‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’ हे दोन सिनेमे केले. दोन्ही सिनेमे मल्टीस्टारर असूनही अनुष्काने आपल्या वाट्याला आलेल्या भूमिकेतून स्वतःचं वेगळेपण सिद्ध केलं. २०१२ला आलेल्या यश चोप्रा दिग्दर्शित ‘जब तक है जान’मध्ये ती पुन्हा एकदा शाहरुखसोबत दिसली. शाहरुखने साकारलेल्या समर या आर्मी मेजरवर क्रश असलेल्या डिस्कव्हरी चॅनलची इंटर्न अकिरा रायची व्यक्तिरेखा तिने यात साकारली. त्याच्याच पुढच्या वर्षी आलेल्या विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘मटरू की बिजली का मंडोला’ या ब्लॅक कॉमेडी मध्ये तिच्या आणि इम्रान खानपेक्षा पंकज कपूर भाव खाऊन गेला असला, तरी “देखो, मगर प्यार से” म्हणणाऱ्या बिजलीचा बिनधास्तपणा लक्षात राहतो.
आमीर खानसोबत आलेला पीके (२०१४) काही काळ मागे पडलेल्या अनुष्काला पुन्हा एकदा प्रकाशझोतात घेऊन आला. यात तिने एलियन असलेल्या पीकेला मदत करणारी पत्रकार जग्गू साकारली होती. पाकिस्तानी सरफराजवर प्रेम करणारी, बुवाबाजीचा पर्दाफाश करणारी आणि पत्रकारितेचं खरं महत्त्व जाणणारी ही बॉब कट केलेली जग्गू इतर कलाकारांच्या भाऊगर्दीत निराळीच छाप सोडून गेली. २०१५ला आलेल्या ‘दिल धडकने दो’ आणि ‘बॉम्बे वेल्वेट’मधील भूमिकांचा अपवाद वगळता ‘NH 10’मध्ये तिने चमकदार कामगिरी केली. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटात तिने साकारलेली मीरा ही तिच्या सर्वोत्कृष्ट भूमिकांपैकी एक मानली जाते. ऑनर किलिंगसारख्या संवेदनशील मुद्द्यावर आधारित असलेला हा चित्रपट आणि यातील अनुष्काचा वास्तवदर्शी अभिनय नक्कीच पाहण्यासारखा आहे.
२०१६मध्ये अनुष्काने सलमानसोबत ‘सुलतान’ आणि रणबीरसोबत ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये मध्यवर्ती भूमिका साकारली. ‘सुलतान’मध्ये ती साकारत असलेल्या आरफा या महिला कुस्तीपटूची पत्नी व आई ही दोन रुपेही तिने तितक्याच ताकदीने साकारली. ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये तिने साकारलेल्या अलिझेहच्या कुणीही प्रेमात पडावं असाच तिचा वावर होता. आयानसोबतच्या नात्याला निखळ मैत्रीच्या दृष्टीकोनातून पाहणाऱ्या अलिझेहने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. ‘ऐ दिल है मुश्किल’नंतर अनुष्का पुन्हा इतकी सुंदर कुठल्या चित्रपटामध्ये दिसली असेल, तर तो होता २०१८ला आलेला राजकुमार हिराणी दिग्दर्शित ‘संजू’! त्या चित्रपटामध्ये तिने निळसर डोळ्यांची, पिंगट कुरळ्या केसांची विनी साकारली होती, जिच्यावर संजय दत्तच्या चरित्रकथेची जबाबदारी सोपवण्यात येते.
‘ऐ दिल है मुश्किल’पासून ‘संजू’पर्यंत प्रवास करताना अनुष्काची गाडी ‘फिलौरी’, ‘जब हॅरी मेट सेजल’ आणि ‘परी’ अश्या चित्रपटांची सैर करत आली. हे तिन्ही चित्रपट तेव्हा फारशी कमाल दाखवू शकले नाहीतच, पण प्रेक्षकांनीही त्यांच्याकडे पाठ फिरवली. अनुष्काने ‘परी’मध्ये साकारलेल्या रुखसाना या पात्राचं जाणकारांकडून कौतुक झालं असलं तरी उथळ पटकथेमुळे या चित्रपटाच्या पदरी अपयशच आलं. ‘संजू’पाठोपाठ आलेल्या ‘सुई धागा’ने मात्र टीकाकारांची बोलती बंद केली. अनुष्काने तिच्या सहजसुंदर अभिनयाने ममताच्या व्यक्तिरेखेला योग्य न्याय मिळवून दिला. पतीला मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीने पेटून उठणारी, सुनेची कर्तव्यं सांभाळताना पतीला नव्या व्यवसायात भक्कम आधार देऊ पाहणारी ममता तिने उत्तमरीत्या साकारली. ‘झिरो’च्या नकारात्मक प्रमोशन्सचा फटका चित्रपटाच्या कमाईला बसला आणि अनुष्काने साकारलेली सेरेब्रल पाल्सीच्या व्याधीने ग्रस्त असलेल्या आफियाची भूमिका अपेक्षित प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचू शकली नाही.
२००८ ते २०१८ या दशकात अनुष्काने उण्यापुऱ्या १९ चित्रपटांमध्ये काम केलं असून तिच्या वैविध्यपूर्ण भूमिकांमधून ती कायमच प्रेक्षकांना खुणावत आलीय. अल्पावधीतच बॉलीवूडच्या तमाम नव्या-जुन्या ‘ए-लिस्टर’ अभिनेत्यांसोबत काम करून तिने स्वतःला सिद्ध केलेलं आहे. गेल्या तीन वर्षांत अभिनेत्री म्हणून तिची कुठलीही फिल्म आली नसली तरी निर्मात्याच्या खुर्चीत बसून तिने ‘पाताल लोक’सारखी वेबसिरीज आणि ‘बुलबुल’सारखा सिनेमा प्रेक्षकांसमोर आणण्यात यश मिळवलं आहे. बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये सामील असलेलं हे नाव या फिल्म इंडस्ट्रीत अजूनही नेपोटीझमऐवजी टॅलेंटला प्राधान्य मिळत असल्याची साक्ष देतं. तिने टीव्हीवर झळकण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते सत्यात उतरवण्यासाठी धडपड करून स्वतःची दुनिया निर्माण केली. यशराज बॅनरच्या टॅलेंट हंटमध्ये सापडलेल्या या रत्नाला प्रेक्षकांनी गेल्या तेरा वर्षांत भरभरून प्रेम दिलं आहे. सिनेजगतातील तिची ही कारकीर्द अशीच बहरत राहो, हीच सदिच्छा!
कलाकृती मिडियातर्फे वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!!
=====
हे देखील वाचा: विरुष्का जेव्हा एकत्र काम करतात…
=====