दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
सेलिब्रिटींनी जपली माणुसकी!
कोरोनाच्या प्रादुर्भावाने त्रस्त झालेल्या जनतेला क्रिकेटपटू आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या रूपाने आशेचा नवा किरण दिसू लागला आहे. सरकारी तिजोरीवर पडणारा भार आणि आरोग्यव्यवस्थेची दुर्दशा पाहून कित्येक क्रिकेटपटू तसेच मराठी आणि हिंदी चित्रपट व मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांनी आपापल्यापरीने आर्थिक व वैद्यकीय मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासोबतच, लोकांचं मनोधैर्य खचू नये, यासाठीही कित्येक कलाकार प्रेरणादायी आणि मनोरंजक असे व्हिडीओ बनवून सोशल मिडीयावर अपलोड करत आहेत. मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर आणि सोशल डिस्टंसिंगचे नियम तसेच प्लाझ्मा आणि रक्तदानाच्या आवश्यकतेबाबतही जनजागृती करण्याची जबाबदारी काही कलाकारांनी उचलली आहे.
पडद्यावरची हिरोगिरी प्रत्यक्षातही!
अभिनेते सुनील शेट्टी, अक्षय कुमार पासून अभिनेत्री सोनम कपूर, तापसी पन्नू यांनी कोरोनाच्या काळात कामगारांना योग्य वेतन देण्याची जबाबदारी घेतली असून, कियारा आडवाणी, रकुल प्रीत सिंह, आयुष्मान खुराणा, दिया मिर्ज़ा, सिद्धार्थ मल्होत्रा आणि दिया मिर्झा इत्यादींनी सढळ हाताने मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. या मोहिमेमध्ये करन जोहर, मधुर भांडारकर, जावेद अख्तर, आनंद राय अश्या लेखक आणि दिग्दर्शकांनीही सहभाग घेतला आहे.
अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) स्वखर्चाने मागच्या लॉकडाउनमध्ये अनेक मजुरांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवलं होतं. याही वर्षी तो पुन्हा कंबर कसून तयार असून, सध्या ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर औषधांचा पुरवठा करण्याची जबाबदारी त्याने आपल्या खांद्यावर घेतली आहे. अजय देवगणने आणखी काही कोव्हीड सेंटर्स उभारण्याची घोषणा केली असून यात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचाही सहभाग असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अभिनेता सलमान खानने (Salman Khan) बिईंग ह्युमनच्या माध्यमातून फूड पॅकेजेस देण्याचं काम हाती घेतलं असून, त्याचबरोबर ईदनिमित्त तो इंडस्ट्रीतील सुमारे २५००० कामगारांना अर्थसहाय्य पुरवणार आहे.
मराठी कलाकारांची #mahacovid मोहीम!
ट्विटरवर #mahacovid हा हॅशटॅग ट्रेंड करत हेमंत ढोमे, स्वप्नील जोशी इत्यादी मराठी कलाकारांनी कोरोनाच्या संबंधित महत्त्वाचे अपडेट द्यायला सुरुवात केली आहे. अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) याने सांस्कृतिक कार्य संचलनालयाशी झालेल्या चर्चेसंबंधित माहिती देताना सांगितले की लोककलावंतांची आबाळ होऊ नये यासाठी सरकारने त्यांच्या कलेचा जनजागृतीसाठी वापर करून योग्य मानधन देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचसमवेत सुबोधने चित्रपटसृष्टीतील अनेक कामगारांच्या दैनंदिन वेतनाची जबाबदारीही उचलली आहे. अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि सोनाली कुलकर्णीनेही मुख्यमंत्री निधीला अर्थसहाय्य पुरवून जनतेला मदतीसाठी आवाहन केलेलं आहे. अभिनेता सुशांत शेलारने खाद्यपदार्थ आणि जीवनावश्यक वस्तूंचे पॅकेजेस पुरवण्याचं कार्य हाती घेतलेलं आहे.
क्रिकेटर्स उतरले मैदानात!
भारतीय क्रिकेट टीमच्या अनेक खेळाडूंनी मदतीसाठी पुढाकार घेतला असून, कित्येकांनी नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये मिळालेल्या बक्षिसांची रक्कमही यासाठी देऊ केली आहे. फलंदाज शिखर धवनने (Shikhar Dhawan) मिशन ऑक्सिजनसाठी भरघोस अर्थसहाय्य पुरवले असून, हार्दिक व कृणाल पांड्याने ग्रामीण भागात २००हून अधिक व्हेंटीलेटर्स पुरवले आहेत. इरफान व युसुफ पठाण (Yusuf Pathan) यांनी फूड पॅकेजेसचं वितरण सुरु केलं असून अजिंक्य रहाणेने महाराष्ट्रातील दुर्गम भागांसाठी ३० ऑक्सिजन सिलेंडर्सची मदत केलेली आहे.
पडद्यावर आणि मैदानावर आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे हे कलाकार आणि खेळाडू कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी देवदूताच्या रूपाने धावून आले आहेत. कलाकृती मिडियातर्फे त्यांना मानाचा मुजरा!