बॉलीवूडचे स्टंट मॅन ‘वीरु देवगण’ यांनी असे दिले आपल्या मुलाला ॲक्शन सीनचे धडे…
वीरू देवगण हे अभिनेते म्हणून नावारुपास आले नसले, तरी त्यांनी आपल्या कारकिर्दीत दिग्दर्शकाची भूमिका उत्तम बजावली. जवळपास ८०हून अधिक चित्रपटांमध्ये साहसदृश्ये साकारण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. वीरू देवगण (Veeru Devgan) यांनी साहसी दृश्य दिग्दर्शन आणि दिग्दर्शनाबरोबरच, अभिनय क्षेत्रातही आपले नशीब आजमावले होते.
आज का अर्जुन, राम तेरी गंगा मैली हो गई, विजयपथ, दिलजले, एक ही रास्ता, प्रेम रोग, आखरी रास्ता, सोने पे सुहागा, खून भरी मांग या सिनेमातील स्टंट्सचे दिग्दर्शन केले होते. स्टंट दिग्दर्शनाशिवाय त्यांनी अभिनेता, निर्माता आणि सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलं आहे.
क्रांती, सौरभ आणि सिंहासन या सिनेमात त्यांनी अभिनेता म्हणून काम केलं होतं. तर हिंदुस्थान की कसम, दिल क्या करे आणि सिंहासन सिनेमाची निर्मिती केली होती. यासोबतच विश्वात्मा आणि मेरा पती सिर्फ मेरा है सिनेमात सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका निभावली होती. मुलगा अजय देवगणच्या जिगर सिनेमाचे ते लेखक होते. बॉलिवूडमध्ये ते स्टंट मॅन म्हणून प्रसिद्ध होते. ८०च्या दशकातील अनेक गाजलेल्या चित्रपटांमधील ॲक्शन सीन विरू (Veeru Devgan) यांच्या दिग्दर्शनाखाली चित्रित करण्यात आले होते.
ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा अक्षय कुमार, बॉलिवूडमध्ये चित्रपटात काम करण्यासाठी स्ट्रगल करत होता. त्याकाळी तो मार्शल आर्टच्या सरावासाठी जुहू बीचवर यायचा. तिथे स्टंट आणि ऍक्शनचा तो नियमित सराव करत असे. त्याच जुहू बीचवर वीरू देवगणदेखील स्टंटचा सराव करण्यासाठी आपल्या टीमसोबत येत असत. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा अजय देवगणसुद्धा येत असे. विरु देवगण हे एक स्टंट डायरेक्टर असल्यामुळे लोकं त्यांना जास्त ओळखत नव्हते, आणि त्यावेळी अजयनेसुद्धा बॉलिवूडमध्ये पर्दापण केले नव्हते. त्यामुळे तिथे त्यांना शांतपणे सराव करता यायचा, लोक गर्दी करून त्रास देत नसत.(Veeru Devgan)
अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि वीरू देवगण दोघेही तेव्हा एकमेकांसाठी अनोळखी होते. प्रत्येक दिवशी वीरू देवगण अक्षय कुमारला स्टंटचा सराव करताना पाहत असे. त्याच्या स्टंटच्या पोजिशन्स पाहून वीरू देवगण इम्प्रेस झाले. दोन चार दिवस त्यांनी अक्षयचे निरीक्षण केले. त्यानंतर त्यांनी एके दिवशी अक्षयला आपल्याजवळ बोलावले आणि एका ठराविक स्टंटची पोजिशन करायला सांगितली. अक्षय कुमारने त्यांनी सांगितल्याप्रमाणे स्टंटची ती पोजिशन जशीच्या तशी करून दाखवली.
तेव्हा वीरू देवगण यांनी जवळच उभ्या असलेल्या अजय देवगणला (Ajay Devgn) सांगितले, “हे बघ, हे असं करतात. तू सुद्धा असंच कर. तरच ऍक्शन चित्रपटात स्टार बनशील.” त्या दिवसानंतर वीरू देवगण यांनी अक्षय कुमारला सांगितले की, तू सुद्धा रोज आमच्यासोबत येऊन सराव करत जा. पुढच्याच दिवसापासून अक्षयने वीरू देवगण यांच्या टीमसोबत सराव करायला सुरुवात केली. अजय देवगणसुद्धा याच टीमचा भाग होता. अक्षय कुमारने एका मुलाखतीत ही आठवण सांगितली आहे. (Veeru Devgan)
अजय देवगण जो वीरु देवगण यांचा मुलगा आहे आणि अक्षय कुमार जो वीरू देवगण (Veeru Devgan) यांचा शिष्य आहे… आजच्या तारखेला हे दोघेही सुपरस्टार आहेत आणि आपल्या अफलातून ऍक्शनसाठी ओळखले जातात.
शब्दांकन – शामल भंडारे.