‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
बॉलीवूडची पहिली डान्सिंग क्वीन
मागच्या काही दशकांपासून आपल्याकडे सिनेमामध्ये आयटम सॉंगला खूप महत्त्व आहे. केवळ एका गाण्यापुरती एन्ट्री घेऊन संपूर्ण चित्रपट खाऊन टाकायचा असा काहीसा तो प्रकार होता. काही हीरोइन्स मग आयटम गर्ल म्हणूनच फेमस झाल्या. पण हा प्रकार अलीकडेच सुरु झाला कां? तर नाही. एकेकाळी आपल्याकडे बॉलिवूडमध्ये सुरुवातीला क्लब डान्सर चा खूप मोठा रोल असायचा. या कॅबरेची सुरुवात नेमकी कधी झाली हे सांगता जरी नाही आलं तरी या नृत्य प्रकाराने त्याकाळी मोठा धुमाकूळ घातला होता. क्लब डान्सला खरी राज मान्यता मिळवन दिली ती अभिनेत्री कुक्कू मोरे हिने ! आज अभिनेत्री कुक्कू हिची आठवण कोणालाही असण्याची सुतराम शक्यता नाही पण एक काळ इतका तिने गाजवला होता की प्रसंगी सिनेमातील नायिकेला संपूर्ण चित्रपटासाठी जेवढे मानधन मिळायचं त्यापेक्षा जास्त पैसे कुक्कूला मिळायचे. कुक्कू चे त्या चित्रपटात एकच गाणे असायचे पण तिचा डान्स, तिची अदा आणि तिची कमनीय लचकदार काया पहायला प्रेक्षक तुडुंब गर्दी करायचे. आजच्या भाषेत सांगायचं तर त्यावेळेला तरुणाईची प्रचंड लाडकी अभिनेत्री होती. हॉट केक होती. कुक्कू ‘जशी चवळीची शेंग कवळी’ अशी नाजूक नार होती. (Bollywood First Dancing Queen)
रसिकांना मेहबूब यांचा ‘अंदाज’(१९४९) हा चित्रपट आठवत असेल. मेहबूब दिग्दर्शित या चित्रपटामध्ये दिलीप कुमार , राजकपूर आणि नर्गीस यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्यातील डान्स नंबर अजूनही रसिकांना आठवतात. ‘तू कहे अगर जीवनभर मे गीत सुनाता जाऊ…’ त्या गाण्याच्या वेळी पार्टीमध्ये कुक्कू ने आपल्या डान्सने आणि आपल्या दिल खेचक अदेने रसिकांचे लक्ष तिने वेधून घेतले होते. ती दिसायला सुंदर होती. ‘ठेंगणे ठुसकी अटकर बांधा गोरा गोरा खांदा….’ असं तिचं एकंदरीत रूप होतं. तिला ‘रबर गर्ल’ म्हणून देखील म्हणायचे कारण तिच्या शरीराचे इतके फोल्ड करून नाचायची की पाहणारा अचंबित व्हायचा. तिच्या डान्स परफॉर्मन्स पाहून सर्व दंग असायचे. १९४६ सालच्या नानूभाई वकील यांच्या ‘अरब का सितारा’ या चित्रपटापासून तिने रुपेरी पडद्यावर प्रवेश केला त्या वेळी ती अवघी अठरा वर्षाची होती. त्यानंतर मुंबईत तयार होणाऱ्या प्रत्येक चित्रपटात तिचा एक तरी डान्स असायचाच.(Bollywood First Dancing Queen)
मेहबूब यांच्या ‘अंदाज’ नंतर बड्या निर्मात्यांचे लक्ष तिचाकडे वेधले गेले. राज कपूर यांच्या ‘आवारा’ (१९५१) या चित्रपटात तिने ‘एक दो तीन आजा मौसम है रंगीन…’ या गाण्यावर जबरदस्त डान्स केला. ‘डरना मोहब्बत करले..’ या गाण्यात नर्गिस सोबत परफॉर्मन्स दिला होता. पन्नास चे दशक हे खऱ्या अर्थाने कुक्कू चे होते. अंग्लो इंडियन परिवारात जन्माला आली होती. त्या मुळे वेस्टर्न टाईप डान्स ला तिला कायम आठवले जायचे. हिंदी सिनेमा तील पहिली डान्सिंग क्वीन अशी पदवी तिने प्राप्त केली. त्या काळात तिच्याकडे प्रचंड पैसा येत होता. तिला मोठी डिमांड होती. मुंबईला तिचा मोठा बंगला होता. तीन आलिशान गाड्या तिच्याकडे होत्या. एक गाडी तर खास तिच्या पाळीव प्राण्यांसाठी ठेवली होती! कुक्कू ला पैसे प्रचंड मिळत होते परंतु ते कसे वापरायचे याची अक्कल तिला नव्हती. त्यामुळे जोपर्यंत पैसा येत होता तोपर्यंत तिच्या घरी खूष मस्काऱ्यांचा/ मित्र-मैत्रिणींचा जमावडा झालेला असायचा. पण हळूहळू कुक्कू ला सिनेमातून कामे मिळणे कमी झाले.
==========
हे देखील वाचा : ‘कटीपतंग’ च्या या गाण्याच्या शूटचा भन्नाट किस्सा !
=========
तिचा खर्च इतका वाढत गेला आणि वैभव आटत गेले. गाड्या गेल्या. बंगले गेले आणि कुक्कू अक्षरशः रस्त्यावर आली. शेवटी तिला कॅन्सर झाला. अभिनेत्री तबस्सुम (फुल खिले है गुलशन गुलशन) यांनी तिच्याबाबत बोलताना सांगितले,” कुक्कूला आयुष्याच्या अखेरीस खूप पश्चाताप होत होता. ती म्हणत होती माझ्या या अवस्थेला मी स्वतःच जबाबदार आहे. माझ्याकडे जेव्हा पाण्यासारखा पैसा येत होता तेव्हा मी त्याचा योग्य वापर केला नाही. मी फाईव्ह स्टार हॉटेल मधून अन्न मागवत होते, वाया घालवत होते आणि उरलेले अन्न फेकून देत होते. आणि आज मी याच अन्नाच्या कणासाठी मी मोताज होते आहे. आयुष्यामध्ये जे पेराल तेच उगवत असते. मी माझ्या तरुण पणे खूप मस्ती केली त्याचे दुष्परिणाम मला उतार वयात बघावे लागत आहेत!” ३० सप्टेंबर १९८१ रोजी वयाच्या ५३ वर्षी कुक्कू निधन पावली. आजही चॅनल सर्फिंग करताना कधी कधी जुनी गाणी अचानक दिसतात आणि त्यात हे कुक्कू दिसते. तिची कॉपी करत पुढे अभिनेत्री हेलन, बिंदू, पद्मा खन्ना, लक्ष्मी छाया, जयश्री टी, अल्पना इयर यांनी स्वतःची ओळख बनवली. परंतु या डान्सिंग क्वीनची शिरोमणी कुक्कू होती.