दाक्षिणात्य आणि मराठी चित्रपटांचा बोलबाला…. बॉलीवूडला मात्र ठेंगा
रणबीर कपूरच्या बहुचर्चित ‘शमशेरा’ या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पूर्णपणे पाठ फिरवली आहे. या चित्रपटावर अवघ्या दोन तीन दिवसांतच फ्लॉपचा शिक्का बसला. ज्या प्रेक्षकांनी हा चित्रपट बघितला त्यापैकी बहुतेकांनी सोशल मीडियावरही ‘निगेटिव्ह रिव्ह्यू’ पोस्ट केले आहेत.
गेल्या काही दिवसात बॉलिवूडच्या अनेक बिग बजेट चित्रपटांची अशीच दुरावस्था झाली आहे. यामध्ये रन वे 34, अटॅक, धाकड, पृथ्वीराज अशा चित्रपटांचा समावेश आहे. तसं बघायला गेलं तर २०२२ हे वर्ष बॉलिवूडसाठी आतापर्यंत तरी निराशाजनकच ठरलं आहे. वर्षाच्या सुरुवातीला पुष्पा, केजीएक, आरआरआर सारखे चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले, त्यामुळे दाक्षिणात्य चित्रपटांचं वर्चस्व आणि स्पर्धा वाढली आहे, तर दुसरीकडे इतर प्रादेशिक चित्रपटही चांगली कमाई करत आहेत.
महाराष्ट्रात तर परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. मराठी चित्रपटही चांगला प्रेक्षकवर्ग खेचतायत. वर्षाच्या सुरुवातीलाच झिम्मा, पावनखिंड सारख्या चित्रपटांनी बाजी मारली. एकीकडे झुंड, धाकड, पृथ्वीराज चित्रपटांचे खेळ रद्द होत होते, तर त्याचवेळी केजीएफ, आर आर आर, शेर शिवराज, सर सेनापती हंबीरराव, चंद्रमुखी, धर्मवीर सारखे चित्रपट व्यवस्थित सुरु होते. (Bollywood vs Regional movies)
एकामागून एक बॉलिवूडचे बिग बजेट चित्रपट अपयशी ठरत आहेत. एक काळ असा होता की बॉलिवूडच्या बिग बजेट चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असत. पण आता परिस्थिती बदलली आहे. आमिर खानचा बहुचर्चित लाल सिंग चढ्ढा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. पण त्याच्या यशाबद्दल खुद्द आमीरलाच खात्री वाटत नसल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत. अर्थात यामध्ये तथ्य आहे किंवा नाही यापेक्षा यामुळे चित्रपटाची ‘निगेटिव्ह पब्लिसिटी’ होतेय आणि हे निश्चितच चित्रपटाला घातक ठरू शकतं.
बॉलीवूडला एवढी उतरती कळा लागण्याचं कारण काय? काही अपवाद वगळता बहुतेक चित्रपट अपयशी होत आहेत. ओटीटीच्या आगमनामुळे चित्रपटांच्या कमाईवर परिणाम होतोय असं म्हणावं, तर प्रादेशिक चित्रपट मात्र गर्दी खेचतायत, मग बॉलिवूडकडे प्रेक्षक पाठ का फिरवतायत? याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे कंटेंट. (Bollywood vs Regional movies)
ओटीटीमुळे निःसंशयपणे प्रेक्षकांची अभिरुची बदलली आहे. त्यामुळे आता प्रेक्षक इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा ‘कंटेंट’ला महत्त्व देतात. जर तो चांगला असेल, तर प्रेक्षक आवर्जून चित्रपटगृहात येणार अन्यथा नाही. सध्याची पिढी बदलली आहे. प्रॅक्टिकल झाली आहे. ही पिढी व्यक्तिपूजा करत नाही. कलाकार आवडतो म्हणून त्याचा टुकार चित्रपटही डोक्यावर घेणारी, एखाद्या चित्रपटातली गाणी छान आहेत म्हणून तो चित्रपट मल्टिप्लेक्सला किंवा थिएटरला जाऊन पुन्हापुन्हा बघणारी पिढी आता इतिहासजमा झाल्यातच जमा आहे. त्यामुळे बॉलीवूडने आता कंटेंट आणि त्यातही ‘ओरिजिनल कंटेंट’वर विशेष लक्ष केंद्रित करायला हवं. बॉलिवूड म्हणजे साऊथची कॉपी, हॉलिवूडची कॉपी ही संकल्पना प्रयत्नपूर्वक बदलावी लागणार आहे. (Bollywood vs Regional movies)
कंटेंट हे मुख्य कारण आहेच पण त्याव्यतिरीक्त दुसरं कारण म्हणजे बदललेली सामाजिक आणि राजकीय मानसिकता. एकूणच बॉलिवूड बद्दल नकारात्मक भावना निर्माण झालेला एक मोठा गट या समाजात निर्माण झाला आहे. हा गट बॉलिवूडकडे देशद्रोही, जिहादी अशा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघत असतो. त्यामुळे कलाकारांचं एखादं वक्तव्यही त्याचे फॅन्स कमी करायला कारणीभूत ठरू शकतं. प्रेक्षकांनी ठरवलं तर ते एखादा चित्रपट हिट करू शकतात तसंच फ्लॉपही करू शकतात. कोरोनापूर्व काळात CAA च्या पार्श्वभूमीवर दीपिकाने केलेल्या वक्तव्यामुळे तिचा बहुचर्चित ‘छपाक’ चित्रपट फ्लॉप गेला होता.
=====
हे देखील वाचा : अनिल कपूरने केली होती यश चोप्रांची पंचाईत! चक्क सेटवर दिला काम करण्यास नकार…
=====
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर तर बॉलिवूडबद्दलचा असंतोष समाजात अधिकच वाढला. नेपोटीझम सारखे मुद्दे नव्याने चर्चेत आले. त्यानंतर काही महिन्यातच आर्यन खानला झालेली अटक आणि त्याला बॉलिवूडच्या नामांकित कलाकारांनी केलेला सपोर्ट यामुळे या गटाची संख्या आणि बॉलिवूडबद्दलची खदखद वाढतच गेली. या गटाचा उद्रेक तेव्हा झाला जेव्हा ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या प्रमोशनला कपिल शर्माने नकार दिला. कपिल शर्माच्या नकारानंतर बॉलिवूडमधलं नेपोटीझम, अंडरवर्ल्ड कनेक्शन सारखे मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत आले आणि प्रेक्षकांनी हा चित्रपट डोक्यावर घेतला.
=====
हे देखील वाचा: जाने तू… या जाने ना: कॉलेजची मैत्री, मजा, मस्ती आणि एक रोमँटिक प्रेमकहाणी
=====
‘द काश्मीर फाईल्स’ निश्चितच उत्तम चित्रपट होता. कथा, पटकथा, दिग्दर्शन आणि कलाकारांचे अभिनय या सर्वच बाबतीत उजवा होता. तरीही त्याच्या यशाचं कारण कंटेंट इतकंच सामाजिक आणि काही प्रमाणात राजकीयही आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
एकंदरीतच बॉलिवुडपुढे हॉलिवूड, दाक्षिणात्य आणि इतर प्रादेशिक चित्रपटांच्या स्पर्धेसोबतच बदललेली सामाजिक आणि राजकीय परिस्थिती अशी अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. तसंच या साऱ्यासोबत या स्पर्धेत टिकायचं असेल, तर प्रेक्षकांची बदललेली अभिरुची विचारात घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. अन्यथा बॉलिवूडवर “क्या से क्या हो गया…” म्हणायची वेळ येईल.