निरुपम अभिनयाची माँ… निरुपा रॉय (Nirupa Roy)!
“स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी.” हे वाक्य आजवर आपण सर्वांनी कधी ना कधी एखाद्या निबंधात किंवा सुविचार फलकावर वाचलं असेल. पण ज्यांनी ज्यांनी यश चोप्रांचा ‘दिवार’ पाहिला असेल त्यांना कल्पना असेल की, हे वाक्य मूर्तिमंत स्वरूपात जर कोणी पडद्यावर साकारलं असेल, तर ते निरुपा रॉयनीच (Nirupa Roy)!
एकाच आईच्या पोटी जन्माला येऊन आयुष्य जगण्याचे भिन्न मार्ग निवडणाऱ्या ‘रवी आणि विजय’ या दोन भावंडांच्या संघर्षाची कथा सलीम – जावेदनी दर्जेदार संवादातून आणि प्रसंगांमधून अमर केली होती.
त्यातल्याच एका प्रसंगात गुन्हेगारी मार्गाला लागलेला विजय आपल्या सदाचारी भावाला उसळून म्हणतो की, “आज मेरे पास गाडी है, बंगला है, बँक बॅलन्स है… क्या है तुम्हारे पास?”
रवी शांतपणे उत्तर देतो “मेरे पास माँ है!”
बस … त्या क्षणाला हिंदी सिनेमाला आईच्या भुमिकेतला एक कायमस्वरूपी चेहरा मिळाला.
सत्तरच्या दशकात आईच्या भूमिकेमध्ये निरुपा रॉयने साकारलेले प्रत्येक पात्र म्हणजे बॉलिवूडचा संस्मरणीय ठेवा आहे. पण केवळ ‘आईच्या भूमिका’ हिच निरुपा रॉयची ओळख नव्हती. निरुपा रॉय मूळच्या वलसाड- गुजरातच्या. त्यांचं खरं नाव कोकिळा बलसारा. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी कमल रॉयशी लग्न करून त्या मुंबईत कारकीर्द करण्यासाठी आल्या आणि कायमच्या इथल्याच झाल्या.
एका गुजराती वृत्तपत्रातील जाहिरातीमुळे निरुपा रॉयला कारकिर्दीतला पहिला चित्रपट ‘रणकदेवी’ (१९४६) मिळाला. योगायोगाने त्याच वर्षी ‘अमर राज’ या चित्रपटातून त्यांचे हिंदीत पदार्पण देखिल झाले. कारकीर्द सुरू झाली खरी पण यशाची चव चाखली ती १९४८ च्या ‘गुणसुंदरी’ ह्या चित्रपटामुळेच! त्यानंतर चित्रपटसृष्टीने निरुपा रॉय हे नाव गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली.
साधारणतः ४० – ५० च्या दशकात पौराणिक चित्रपटांचा स्वतःचा असा प्रेक्षकवर्ग होता. त्या चित्रपटातल्या पार्वती, लक्ष्मी इत्यादी दैवतांच्या भूमिकेत निरुपा रॉय इतक्या चपखल बसत असत की, त्यांच्या घरासमोर त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेण्यासाठी प्रेक्षकांची रांग लागत असे.
महादेवाच्या भूमिकांमध्ये लोकप्रिय झालेल्या त्रिलोक कपूर यांच्यासह जवळपास १८ सिनेमातून निरुपा रॉय झळकल्या. बिमल रॉय यांच्या ‘दो बिघा जमिन’ तसेच ‘गरम कोट’ सारख्या क्लासिक गणल्या जाणाऱ्या चित्रपटात बलराज साहनीसारख्या मातब्बर अभिनेत्यासोबत काम करण्याची सुवर्णसंधी देखिल निरुपा रॉयना मिळाली. कवी कालिदास, सम्राट चंद्रगुप्त किंवा राणी रुपमती’सारख्या चित्रपटांमधून भारत भूषण सारख्या त्यावेळच्या आघाडीच्या अभिनेत्यांची नायिका बनता आले.
या सर्व भूमिका साकारत असताना चेहऱ्यावरचे ‘सात्विक आणि वत्सल’ भाव हा निरुपा रॉयसाठी ‘प्लस पॉईंट’ होता. पण कदाचित त्यामुळेच आघाडीची नायिका बनण्याचं भाग्य मात्र निरुपा रॉयच्या नशिबी आलं नाही.
देवतेच्या भूमिंकामुळे पुजली जाणारी अभिनेत्री हिरोसोबत नाचताना – गाताना पाहणे तत्कालीन प्रेक्षकवर्गाला अवघडच होते. त्यामुळे लवकरच ‘मुनीमजी’ सारख्या चित्रपटांमधून आईच्या भूमिकेकडे निरुपा रॉयला (Nirupa Roy) वळावे लागले. मुलाच्या भूमिकेत असणाऱ्या देवआनंदपेक्षा तेव्हा त्या ७ ते ८ वर्षांनी लहान होत्या.
सत्तरचे दशक मात्र निर्विवादपणे त्यांनी आपल्या दमदार भूमिकांमधून गाजवले. दिवार, अमर अकबर अँथनी, सुहाग, सारख्या चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. मनमोहन देसाईंच्या ‘लॉस्ट अँड फाउंड’ फॉर्म्युलात ‘दुर्दैवी आईच्या’ भूमिकेत त्या एकदम फिट बसायच्या.
हे ही वाचा: बॉलिवूडचा नवा ॲक्शन किंग
चित्रपटसृष्टीला व्यापून राहिलेला कवी…साहिर लुधियानवी!
‘अमिताभची पडद्यावरची आई’ ही त्यांची ओळख प्रेक्षकांच्या इतक्या परिचयाची झाली की, हा सिलसिला नव्वदच्या दशकातल्या ‘लाल बादशाह’ पर्यंत चालूच राहिला. केवळ अमिताभच नव्हे तर ‘धर्मेंद्र आणि सनी देओल’ सारख्या एकाच घरातल्या दोन पिढ्यांमधील नायकांच्या आईच्या भूमिकाही तिने केल्या.
या प्रदीर्घ कारकिर्दीत मुनीमजी, छाया, शहनाई सारख्या चित्रपटातील भूमिकांसाठी त्यांना ३ वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. पुढे त्यांना जीवनगौरव पुरस्काराने देखिल सन्मानित करण्यात आले होते.
हे देखील वाचा: सोशल मीडिया आणि रसिकांच्या उलटसुलट प्रतिक्रिया, सुचना, सल्ले वगैरे वगैरे….
निरुपा रॉयचे वैयक्तिक आयुष्यही त्यांच्या चित्रपटातल्या भूमिकांसारखे दुर्दैवी होते. आयुष्याच्या उत्तरार्धात स्वतःच्या मुलांशी झालेल्या संपत्तीच्या वादातून त्यांना बराच मनस्ताप भोगावा लागला. आज निरुपा रॉय आपल्यात नसल्या तरी, आजही पडद्यावरच्या त्यांचा भूमिका पाहताना “मेरे पास माँ है…..!” हे वाक्य आपसूकच ओठांवर येतं.
– सौरभ रत्नपारखी