राष्टीय पुरस्कार सोहळ्यात Vidhu Vinod Chopra यांनी लाल कृष्ण अडवाणींसोबत

SS Rajamouli : हैदराबादमध्ये वाराणसीचा भव्य दिव्य सेट
तुमच्यापर्यंत ही बातमी नक्कीच पोहचली असेल, दिग्दर्शक एस. एस. राजमौली हे आपल्या नवीन चित्रपटासाठी हैदराबादला वाराणसी उभारणार आहेत. चित्रपटात महेशबाबू, पृथ्वीराज व प्रियांका चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. साऊथचे चित्रपट निर्माते कायमच मोठा व वेगळा विचार करतात. आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल, आज अतिशय अत्याधुनिक कॅमेरे आहेत, त्यांचा गर्दीतही उत्तम वापर होतो, प्रत्यक्ष वाराणसीत चित्रीकरणास सहाय्य व सुविधाही मिळतील, तर मग हैदराबादला वाराणसी उभारण्याची आणि चित्रपटाची बजेट वाढवायची गरजच काय? ट्रॉली शॉट, झूम शॉट यापासून जिमी जिप असे सगळेच वाराणसीत शक्य असेल तरी हैदराबाद का? (Indian Cinema)

आपल्या देशातील चित्रपट संस्कृतीतील हा सर्वात मोठा असा सेट ठरणार आहे. एक अख्ख शहरच जसेच्या तसे दुसरीकडे उभारले जाणार ही कल्पनाच भन्नाट व आव्हानात्मक आहे. दिग्दर्शक एस.एस.राजमौली याचे आपले एक व्हिजन यामागे असावे.आपल्या चित्रपटाच्या थीमनुसार सेट उभारला जाईल. त्यात कॅमेरा स्पेस विचारात घेतलेली असेल. प्रत्यक्षातील चित्रीकरण आणि त्यात व्हीएफएक्सचा वापर याची काही समीकरणे असतील. चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम, त्यामुळे त्याच्या अपेक्षेनुसार कला दिग्दर्शन असणे स्वाभाविक आहेच.कला दिग्दर्शन हेदेखील चित्रपटाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. प्रत्येक शहराची आपली एक स्वतंत्र ओळख असतेच ती तेच शहर सेट म्हणून उभे करतानाही दिसेल.(Bollywood News)

चित्रपटातील गाजलेली कला दिग्दर्शनं बरीच.राज कपूर हा चित्रपट माध्यम व व्यवसाय यांची अतिशय उत्तम जाण असलेला असा दिग्दर्शक,निर्माता,अभिनेता,स्टुडिओ मालक व संकलक. राज कपूर दिग्दर्शित चित्रपटांतील कला दिग्दर्शन हा एक विशेष वैशिष्ट्यपूर्ण विषय. त्यांच्या अनेक चित्रपटांतून कला दिग्दर्शनाची खासियत दिसली. ‘बरसात’ चित्रपटातील ‘घर आया मेरा परदेसी’ हे गाणे एम.आर.आचरेकर यांच्या अतिशय भव्य दिव्य दिमाखदार कला दिग्दर्शनासाठीही पुन्हा पुन्हा पाहिले जाते.आर.के.स्टुडिओत हा सेट लावला होता. ‘हीना’ हे खरं तर राज कपूरचे दीर्घकालीन स्वप्न. आणि आर.के.फिल्मच्या परंपरेप्रमाणे दोन गाण्यांचे ध्वनिमुद्रणही राज कपूर यांनी संगीतकार रवींद्र जैन यांजकडून केले.त्याचे फोटोही मिडियात आले.त्यानंतर दुर्दैवाने राज कपूरचे निधन झाल्यावर ‘हीना’च्या दिग्दर्शनाची सूत्रे रणधीर कपूरच्या हाती आली. या चित्रपटाची गोष्ट भारत व पाकिस्तान यांच्या सीमाभागातील गावात घडते. (Entertainmant News)
================================
हे देखील वाचा: Sholay : उत्साहाला सलाम!
=================================
आता प्रत्यक्षात तेथे चित्रीकरण कसे करणार? यावर एक चांगला मार्ग काढला.रणधीर कपूर व कला दिग्दर्शक सुरेश सावंत यांनी भारत व पाकिस्तान यांच्या सीमाभागातील बारामुल्ला वगैरे गावांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. तेथील घरे, राहणीमान वगैरे पाहिले आणि मग कुलू मनाली येथे तसेच गाव उभारुन चित्रीकरण केले. ही गोष्ट खुद्द सुरेश सावंत यांनीच मला सांगितली. चित्रपट व्यवसायातील तंत्रज्ञांकडून कायमच वेगळी,चांगली व उपयुक्त माहिती मिळत असते. रमेश सिप्पी दिग्दर्शित शोले’मधील रामगढ हा कायमच अतिशय चर्चेतील सेट. बंगलोर जवळ कला दिग्दर्शक राम येडेकर यांनी ते गाव उभारले. रामगढ हे ‘शोले’तील एक व्यक्तिरेखाच.पटकथेतील एक महत्वाची गोष्ट.चित्रपटाच्या मुहूर्तापासूनच रामगढ महत्वाचे.चित्रपटाला पन्नास वर्ष पूर्ण होत असतानाच ‘आजचे रामगढ’ हा एक्स्युझिव्हज विषय ठरु शकते. (Bollywood untold stories)

‘शोले’च्या घवघवीत यशानंतर रमेश सिप्पीने ‘शान’ साकारला. त्यात खलनायक शाकाल (कुलभूषण खरबंदा)याचा अड्डा हा देखील एक गाजलेला सेट. ‘शान’च्या जाहिरातीतच म्हटले होते,सहा कोटीची शान.आणि शाकालचा अड्डा बहुचर्चित होता. सगळे कसे इलेक्ट्रॉनिक्स. बटन दाबल्यावर अमूक घडणार, तमूक घडणार. हे पाहून त्या काळातील एका समिक्षकांने म्हटले, शाकाल लिफ्टमन वाटतो. गब्बरसिंगसारखी त्याची दहशत वाटत नाही. देव आनंदला ‘देस परदेस’साठी थीमनुसार लंडनला जावून चित्रीकरण करायचे होते. या चित्रपटाची कथा कल्पना त्याचीच होती.या चित्रपटाचा निर्माता, दिग्दर्शक व अर्थात नायकही तोच.नेमक्या याच काळात देशात आणीबाणी लागू झाली आणि देशाबाहेर जावून चित्रीकरण करण्यावर बंधने आली.

आता करायचे काय? कला दिग्दर्शक टी.के.देसाई यांनी वांद्र्यातील मेहबूब स्टुडिओत लंडनचा रस्ता,इमारती,दुकाने,पब यांचे हुबेहुब सेट लावून त्यावर देव आनंदने चित्रीकरण केले. आपल्या दिग्दर्शनातील प्रत्येक चित्रपटाच्या सेटवर सिनेपत्रकार व फोटोग्राफर्स यायला हवेत ही देव आनंदची सवय व हौस. त्यामुळेच या सेटला भरपूर मिडिया कव्हरेज मिळाले.त्याची भरपूर चर्चा रंगली.चित्रपटातील गाजलेले सेट अनेक. तुम्ही सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित ‘हम आपके है कौन?’,’हम साथ साथ है’ हे सर्वकालीन सुपरहिट चित्रपट अनेकदा पाहिलेत. आणि त्यासह त्यातील प्रशस्त चकाचक घरे देखिल पाहिलीत. वांद्र्यातील मेहबूब स्टुडिओ, गोरेगावचा फिल्मीस्तान स्टुडिओ येथे हे दिमाखदार सेट लागले होते आणि त्या एकेका सेटवर किमान दीड दोन महिने चित्रीकरण असे. (Bollywood Masala)

दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा याने ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटाचे हिमाचल प्रदेशातील डलहौसी येथे बरेच मोठे चित्रीकरण सत्र पार पाडण्याची भरपूर चर्चा रंगली. मुंबईत आल्यावर लक्षात आले आणखीन काही दृश्ये तेथे चित्रीत करायला हवी होती. आता परत सगळे युनिट घेऊन डलहौसीला जा, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ , मनिषा कोईराला, अनुपम खेर यांच्या तारखा मिळवा व जुळवा हे मोठेच दिव्य आले.यावर मार्ग काय?तर कला दिग्दर्शक नीतिन चंद्रकांत देसाई यांनी गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत आऊटडोअर्सला हुबेहुब डलहौसी उभे केले आणि चित्रीकरण सुरु झाले. एकदा दिग्दर्शक विजय आनंद यांनी या सेटला भेट देऊन सगळ्याच गोष्टींचे कौतुक करताच हा सेट जास्तच चर्चेत आला. काही महिन्यांनी हा चित्रपट पडद्यावर येताच त्यात खरे डलहौसी ओळखता आले,पण त्यात चित्रनगरीतील सेट कसा अधेमधे वापरला हे लक्षातच आले नाही. यालाच चित्रपट माध्यमातील हुशारी म्हणतात. (Latest Entertainment News)
================================
हे देखील वाचा: Mili Movie : प्रेमाची वेगळी परिभाषा
=================================
असाच एक गाजलेला सेट ‘मजनून’ या चित्रपटाचा. राजेश खन्नाने आशीर्वाद फिल्म अशी आपली चित्रपट निर्मिती संस्था स्थापन करुन आपल्या वाढदिवसानिमित्त २९ डिसेंबर १९८० रोजी वांद्र्यातील मेहबूब स्टुडिओत मेणबत्त्यांचा भव्य दिमाखदार सेट लावून ” मजनून ” चा क्लासिक मुहूर्त केला.चित्रपटाचे दिग्दर्शक कमाल अमरोही होते आणि राजेश खन्ना व राखी हे लैला मजनू होते.या मुहूर्तावर प्रचंड पैसा खर्च झाला.सेट तर कम्माल होता. पण दुर्दैवाने हा चित्रपट मुहूर्तालाच बंद पडला. राजेश खन्नाचा हा पडता काळ होता व फोकसमध्ये राहण्यासाठीच त्याने हा जंगी मुहूर्त घडवला. लक्षात राहिला तो त्याचा महागडा सेट. चित्रपटात एकाच वेळेस अनेक गोष्टी असतात, त्यात त्याचे सेटही असतात. कधी जुना काळ हुबेहुब उभा करणे, कधी एखादे शहर उभे करणे तर कधी चित्रपटाच्या थीमनुसार सेट लावणे हेच कला दिग्दर्शनाचे हेच तर वैशिष्ट्य असते. हैदराबादमध्ये वाराणसी उभारणार या रंजक गोष्टीने उत्तम कला दिग्दर्शनाच्या अनेक गोष्टी आठवल्या. फ्लॅशबॅकमध्ये गेलो….